प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री, फिल्मस्टार कपिल जवेरी तसेच भोजे पाटील, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांच्या बरोबर बैठकीचा प्रसिद्ध झालेला फोटो हा नेमका कुठचा? मुख्यमंत्र्यांच्या पॅबिनमध्ये बैठक झालेल्याचा तो फोटो आहे की नाही, हे आता भाजपच्या कोअर समितीने व भाजपच्या संघटनमंत्र्याने जाहीर करावे असे आव्हान मगोनेते सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे. त्यांनी सरकारला 10 प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच ड्रग्स व्यवहारात गुंतलेल्यांची गय करणार नाही, गुन्हेगारांना त्वरित कोठडीत डांबण्यात येईल अशी घोषणा केली त्याचे सुदिन ढवळीकर यांनी स्वागत केले, मात्र हे खरोखरच शक्य आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?
प्रसिद्ध झालेल्या फोटोत मुख्यमंत्री वगळता इतर सर्वजण आहेत. पणजीत विवांता हॉटेलमध्ये सायंकाळपर्यंत जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले? दुपारपासून सायं 4.30 पर्यंत बैठक झाली की नाही? त्यानंतर 4.45 वा. हे सर्वजण खाली उतरले त्यावेळी ते सर्वजण सुदिन ढवळीकर यांना भेटले होते की नाही? पाहिजे तर सीसीटिव्ही फुटेजवर पहा, असे ढवळीकर यांनी सूचविले आहे.
कॅनडात लिलावाच्यावेळी कोणकोण होते उपस्थित
डॉ. केतन भाटीकर यांनी एक फोटो जाहीर केला, तो फोटो पॅनडाचा आहे. तिथे लिलाव झाला. ज्यामध्ये पॅनडाच्या लिगमध्ये पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना घेण्यात आले. त्यावेळी खासदार विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर तसेच क्रिकेट टीम घेऊन जाणारे विलास देसाई तिथे आहेत, असे त्या फोटोमध्ये दिसतात. प्रत्यक्षात ही मंडळी लिलावाच्या वेळी उपस्थित होती काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका भाषणात युवा पिढीला वाचविणे गरजेचे आहे, त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
जवेरीबरोबरच्याला अटक झाली होती काय?
जो कपिल जवेरी याच्याबरोबर बैठक घेतो त्याला रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाली होती हे खरे आहे काय? असा सवाल सुदिन ढवळीकर यांनी सरकारला केला आहे. त्या दिवशी झालेल्या बैठकीत गोव्यात 8 ठिकाणी सनबर्न पार्टीसारख्या आयोजित करणे, रेव्ह पार्टी आयोजित करणे वगैरे चर्चा त्यात झाली होती की नाही? एक राज्यसभा सदस्य त्या बैठकीत उपस्थित राहतो, याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहे.
विनय तेंडुलकर यांना आम्हीही मत दिले
विनय तेंडुलकर यांना आम्ही मत दिलेले आहे. त्यामुळे आम्हाला याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. प्रसिद्ध झालेला फोटो खरा आहे काय? मोठमोठे फिल्मस्टार्स घेऊन विविध ठिकाणी गोव्यात पाटर्य़ा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता की नाही? असा सवालही सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी व जे कोणी यात गुंतलेले आहे त्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
जनतेचे व डॉक्टरांचेही आभार कोविडची बाधा झाली होती त्या काळात आपल्याला अनेकांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेचे, मतदारांचे आशीर्वाद, देवीची कृपा. मणिपाल हॉस्पिटलातील डॉक्टर्संनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट. तसेच सर्व मित्रांनी दिलेला धीर या सर्वांमुळे आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो, त्यामुळे आपण सर्वांचे आभार मानतो असेही ते म्हणाले