Tarun Bharat

झुंजार पंत, लढवय्या गिल…कांगारुंची बत्ती गुल!

ब्रिस्बेन / वृत्तसंस्था

विदेशी भूमीत अभूतपूर्व झुंजार खेळ साकारणाऱया भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या  व शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून फडशा पाडला आणि 2-1 फरकाने मालिका जिंकत आपल्या दुर्दम्य जिद्दीची आणखी एकदा प्रचिती दिली. वास्तविक, अव्वल, दिग्गज खेळाडू विविध कारणांमुळे संघाबाहेर असताना रोहित, अजिंक्य व पुजारा यांचा अपवाद वगळता भारतीय संघ आपल्या दुसऱया फळीतील खेळाडूंनाच खेळवत होता. पण, या संघानेच ऐतिहासिक, संस्मरणीय पराक्रम गाजवत अवघ्या क्रिकेट विश्वाला स्तिमित करुन सोडले.

विजयासाठी चौथ्या डावात 329 धावांचे आव्हान असताना ऋषभ पंतने 138 चेंडूत 89 धावांची झुंजार खेळी साकारली आणि या लढतीतील हा टर्निंग पॉईंट ठरला. त्यापूर्वी, शुभमन गिलची (146 चेंडूत 91) खेळी या विजयासाठी जणू भक्कम पायाभरणी करुन गेली. या निकालासह टीम पेनची ऑस्ट्रेलियन नेतृत्वाची कारकीर्दही संपुष्टात आली. पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला घरच्या भूमीत भारताविरुद्ध सलग दोन मालिका गमवाव्या लागल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लियॉन येथे आपली 100 वी कसोटी खेळत होता. पण, भारतीय विजयाचा शिल्पकार ऋषभ पंतने लियॉनलाच मुख्य लक्ष्य केले आणि त्याच्या जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा सिलसिला सुरु करत त्याने लियॉनच्या आनंदावर चांगलेच विरजण घातले. पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदरने जगातील सर्वोत्तम जलद गोलंदाज पॅट कमिन्सला खेचलेला षटकार तर निव्वळ डोळय़ात साठवून ठेवण्यासारखा ठरला.

ऋषभ पंत कट, ड्राईव्ह, पूलचे नजाकतदार फटके लगावत असताना विजय भारताच्या आवाक्यात येत गेला आणि जिथे ड्रॉची भाषा बोलली जात होती, त्या परिस्थितीत विजय खेचून आणण्याचा निर्धार भारताने प्रत्यक्षात साकारुन दाखवला. शुभमन गिलने 91 धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय आगमनाची वर्दी दिली तर दुसरीकडे, चेतेश्वर पुजाराने सर्व वेदनांना दूर सारत ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर जणू शक्य तितके मीठ चोळले.

या कसोटी सामन्यात एकवेळ 11 खेळाडूंचा संघ कसा उभा करायचा, हा प्रश्न भारतीय व्यवस्थापनासमोर होता. पण, जो संघ उतरवला, त्या संघाने ऑस्ट्रेलियाची खोड चांगलीच जिरवली आणि मालिकाविजयावरही अगदी थाटात शिक्कामोर्तब केले.

विराट कोहली, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन व जसप्रित बुमराह काही टप्प्यांवर उपलब्ध नसताना घरच्या भूमीवर पूर्ण ताकदीने खेळणाऱया ऑस्ट्रेलियाला नमवणे सोपे अजिबात नव्हते. पण, पराक्रम गाजवणाऱयांनाच विजयाचा हकदार होता येते, हे या निकालाने दाखवून दिले. यापूर्वी, 2018-19 मध्ये भारताने मालिकाविजय संपादन केला, त्यावेळी स्मिथ-वॉर्नर हे अव्वल खेळाडू त्या संघात नव्हते, अशी आरोळी दिली गेली. पण, यंदा स्मिथ-वॉर्नर संघात असतानाही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत मात देण्याचा भीमपराक्रम अजिंक्यसेनेने गाजवला.

भारताने मंगळवारी बिनबाद 4 या धावसंख्येवरुन 328 धावांचा पाठलाग सुरु केला आणि गिलची धुवांधार फटकेबाजी भारतीय संघाला नवा विश्वास देणारी ठरली. स्टार्कसारख्या अव्वल गोलंदाजाला गिलने बॅकवर्ड पॉईंट व डीप मिडविकेटवरुन जे उत्तूंग षटकार खेचले, ते निव्वळ देखणे ठरले. पुजाराला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कधी हेल्मेटच्या रोखाने, कधी छातीच्या रोखाने तर कधी दुखऱया बोटाच्या रोखाने तेजतर्रार, तिखट मारा केला. पण, पुजाराने यानंतरही ठाण मांडून राहत ऑस्ट्रेलियाचे डाव-प्रतिडाव निकामी करण्यावर भर दिला. दुसरीकडे, गिलने उसळत्या माऱयावरही पूलचे दमदार फटके खेळत सर्व दडपण झुगारुन देण्यावर लक्ष केंद्रित केले. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 114 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.

रोहित (7) स्वस्तात बाद झाल्याने भारताला जरुर धक्का बसला होता. पण, पुजारा व गिल यांनी शतकी भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले. कमिन्सने पुजाराला (56) पायचीत केले व नंतर रहाणेला (22 चेंडूत 24) देखील तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (29 चेंडूत 22), ऋषभ पंत (नाबाद 89) यांनी लढवय्या खेळ साकारत विजय खेचून आणला. वॉशिंग्टन विजयाचे सोपस्कार पूर्ण होण्यापूर्वी बाद झाला. मात्र, ऋषभने खणखणीत चौकार वसूल केला आणि ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलियातच जिरवत जणू नवा अध्याय जोडला.

कोटस

भारतीय क्रिकेट संघाचा विजय आपल्या सर्वांसाठीच आनंददायी क्षण आहे. संघातील खेळाडूंची उर्जा व तळमळ यामुळेच हा पराक्रम गाजवण्यात यश आले. संयम, निर्धार, जिद्द यांचा उत्तम मिलाफ म्हणजे हा मालिकाविजय. भारतीय संघाचे खास अभिनंदन.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऐतिहासिक मालिकाविजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे विशेष अभिनंदन. तुम्ही जो पराक्रम गाजवला, त्याचा अवघ्या देशवासियांना अभिमान आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन!

-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. ब्रिस्बेन, गब्बा येथे 32 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर विजय खेचून आणला, त्याची कसोटी इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.

-बीसीसीआय, आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार

मालिकेतील एका डावात केवळ 36 धावांमध्ये डाव खुर्दा होण्याची नामुष्की आल्यानंतरही तीच मालिका जिंकून दाखवण्याचा पराक्रम या संघाने गाजवला आहे. प्रयत्न सोडून देणे, हे आमच्या शब्दकोशातच नाही, हे येथे दिसून आले. पंत आमच्यासाठी मॅचविनर आहे आणि म्हणूनच आम्ही त्याला येथे खेळवण्याचा निर्णय घेतला.

-भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री

मालिका कोणत्याही संघात असो, विजय, पराभव हा दुसरा भाग असतो. पण, येथे कसोटी क्रिकेट खऱया अर्थाने जिंकले आहे. मी या मालिकेपासून एकच धडा शिकलो आहे, तो म्हणजे भारताला कधीही, कोणत्याही परिस्थितीत अजिबात कमी लेखू नका.  

-ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर

या विजयाचे वर्णन करण्यासाठी मला आज शब्दही सूचत नाहीत. मालिकाविजयाचे श्रेय कर्णधार या नात्याने मला दिले जात आहे. पण, हा सांघिक विजय आहे, प्रत्येक खेळाडूने लक्षवेधी योगदान दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे, याची आपण नोंद घ्यायला हवी.

-भारतीय संघाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे

फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर भारताविरुद्ध वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला अनेकदा संधी होती. पण, आम्ही त्याचा लाभ घेऊ शकलो नाही. दुसरीकडे, भारताने प्रत्येक सत्रागणिक वर्चस्व प्रस्थापित केले आणि याचा त्यांना मोक्याच्या क्षणी फायदा झाला.

-ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन

Related Stories

भारत-दक्षिण आफ्रिका आज दुसरा वनडे सामना

Amit Kulkarni

बेल्जियमचा स्पेनवर विजय

Patil_p

कोरोनामुळे युरोपियन पात्र फेरीच्या तीन क्रिकेट स्पर्धा रद्द

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

Patil_p

विदेशी खेळाडूंच्या ‘रिटर्न जर्नी’साठी बीसीसीआय पुढाकार घेणार

Patil_p

उपांत्य फेरीत गाठत नादिया पोडोरोस्काचा विक्रम,

Patil_p