चकदा एक्सप्रेसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार


अभिनेत्री अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’ची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती अनुष्काने सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर शेअर करत दिली आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ हा भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामीचा बायोपिक आहे. चित्रपटात अनुष्का वेगवान गोलंदाज झूलनच्या व्यक्तिरेखेत तिच्याप्रमाणे विकेट घेताना दिसून येणार आहे.
प्रतीक्षा राव यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार असून याचे चित्रिकरण लवकरच सुरू केले जाणार आहे. कर्णेश शर्मा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्का 3 वर्षांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटाची कथा अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिलेली आहे.
अनेक वर्षांपासून झूलन यांच्या बायोपिकवर काम सुरू आहे, परंतु अभिनेत्रीचे नाव अद्याप जाहीर झाले नव्हते. अनुष्का ‘चकदा एक्सप्रेस’मधून बाहेर पडल्याचे यापूर्वी बोलले जात होते. पण आता अफवांना विराम देत अनुष्काने नव्या वर्षातील मोठय़ा चित्रपटाची घोषणा केली आहे.