Tarun Bharat

टायपिस्टच्या कन्येची युपीएससी-सीएमएस परीक्षेत गरुडझेप

देशात 700 वा क्रमांक घेऊन बेंगळूर शहराची वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत

गंगाधर पाटील/ बेळगाव

न्यायालयात टायपिस्ट म्हणून नियुक्त झाल्यानंतर सतत वेगवेगळे अनुभव मिळत गेले. आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित करण्याचे ध्येय मनात बाळगले आणि त्या दिशेने आपल्या मुलांवर संस्कार करत त्यांना उच्चशिक्षण दिले. एका मुलीने तर युपीएससी-सीएमएस परीक्षेत देशात 700 वा क्रमांक घेऊन संपूर्ण बेंगळूर शहराची वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.

डॉ. शोभाराणी मनोहर बडवाण्णाचे असे तिचे नाव आहे. तिचे वडील मनोहर अनंतराव बडवाण्णाचे हे न्यायालयामध्ये टायपिस्ट म्हणून तब्बल 35 वर्षांहून अधिक सेवा बजावली. हे काम करत असताना आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी मुलांना नेहमीच मार्गदर्शन केले. डॉ. शोभाराणी बडवाण्णाचे ही पहिल्यापासूनच एक हुषार मुलगी म्हणून ओळखली जात आहे. न्यायालयात नोकरी असल्यामुळे नेहमी बदली होत होती. त्यानुसार हे कुटुंबही काही दिवस बेळगाव तर काही दिवस चिकोडी तसेच इतर भागात वास्तव्यास होते.

बारावी विज्ञान शाखेत 96 टक्के गुण

शोभाराणी हिने चिकोडी येथील के. के. इंग्रजी शाळेमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीमध्ये 89 टक्के गुण मिळविले. त्यानंतर चिकोडी तालुक्मयातील  मजलट्टी गावातील पि. यु. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत 96 टक्के गुण मिळविले. ग्रामीण भागातील या कॉलेजमध्ये म्हणाव्या तशा सुविधा नसल्या तरी त्यावर मात करत तिने यश संपादन केले.

त्यानंतर सीईटीमध्ये तिने रँक मिळविला. याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांनी तिचे विशेष कौतुक करून गौरव केला होता. हुबळी येथील किम्स वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. त्या अभ्यासक्रमातही चांगले गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर राजीव गांधी हेल्थ सायन्स विद्यापीठाच्या बेंगळूर इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (कस्तुरबा हॉस्पिटल) डीएनबी ही बालरोगतज्ञ पदवी घेतली. तसेच तेथे प्रशिक्षणही घेतले.

या पदवीनंतर बेंगळूर, हुबळी, शिरशी येथे काही दिवस वैद्यकीय सेवा बजावली. त्यानंतर युपीएससी-सीएमएस परीक्षा दिली. त्यामध्ये घवघवीत यश संपादन केले. देशामध्ये 700 वा क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर शोभाराणी हिची थेट राष्ट्रपती कार्यालयाकडून बेंगळूर येथील सीजीएचएस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बेळगाव जिल्हय़ातून अशाप्रकारे उच्चपदापर्यंत मजल मारणारी ती पहिली महिला ठरली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई अरुणा मनोहर बडवाण्णाचे या गृहिणी आहेत. पती मनोहर यांना त्यांनी मोलाची साथ दिली. याचबरोबर आपल्या मुलांचे संगोपन केले. त्यांची आणखी एक कन्या मनोरमा ही न्यायालयातच टायपिस्ट म्हणून सेवा बजावते आहे.

डॉ. शोभाराणी यांचा विवाह विनय यांच्याशी झाला असून ते देखील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. युपीएससी-सीएमएस परीक्षेसाठी त्यांनी तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन केले आहे. अत्यंत चिकाटीने हे यश संपादन केले आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Stories

बाजारपेठेतील गाळय़ांसाठी चढाओढ

Amit Kulkarni

आयपीएस अधिकाऱयांच्या नावे वसुलीचा फंडा

Patil_p

निपाणीत 10 कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

रिकाम्या बाटल्यांच्या पुनर्वापराने कर्करोगाचा धोका

Omkar B

बीपीएल रेशनकार्डधारकांना आता माणसी 10 किलो तांदुळ मोफत

Patil_p

सीमाहद्दीवरील रस्ता… नको रे बाबा…

Amit Kulkarni