Tarun Bharat

टी-20 मानांकनात कोहलीचे स्थान कायम, केएल राहुल सहावा

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने जाहीर पेलेल्या जागतिक टी-20 च्या ताज्या मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाचवे स्थान कायम राखले आहे तर एका स्थानाची प्रगती करीत केएल राहुलने सहाव्या स्थानावर मजल मारली आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत 762 गुणांसह कोहलीने इंग्लंडचा डेव्हिड मलान (888), ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच (830), पाकचा कर्णधार बाबर आझम (828), न्यूझीलंडचा सलामीवीर देव्हॉन कॉनवे (774) यांच्यानंतर स्थान मिळविले आहे. सहावे स्थान मिळविणारा केएल राहुल (743) व ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांनी एकेक स्थानाची बढत मिळविली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली व राहुल या दोनच भारतीयांना टॉप टेनमध्ये स्थान मिळाले आहे. गोलंदाजीत आणि अष्टपैलूंमध्ये टॉप टेनमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.

वनडे मानांकनात कोहली व रोहित शर्मा यांनी टॉप पाचमधील स्थान राखले असून ते अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानावर आहेत. पाकचा बाबर आझम या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये स्थान मिळविणारा एकमेव भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर कायम राहिला आहे. गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स तिसऱया स्थानावर पोहोचला असून त्याने मिळविलेले हे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे. लंकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने चांगले प्रदर्शन करताना दोन सामन्यांत 6 बळी मिळविले. त्यापैकी पहिल्या सामन्यात त्याने 18 धावांत 3 बळी मिळविले. या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत तीन स्थानांची बढती मिळाली. गोलंदाजांत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या व बांगलादेशचा मेहिदी हसन मिराझ दुसऱया स्थानावर आहे. 

यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संघसहकारी बेन स्टोक्सला मागे टाकत वोक्सने चौथे स्थान मिळविले होते. इंग्लंडचे अन्य दोन वेगवान गोलंदाज डेव्हिड विली व टॉम करन यांनीही मानांकनात प्रगती केली आहे. विलीने 13 स्थानांची प्रगती करीत 37 वे आणि करनने 20 स्थानांची प्रगती करीत 68 वे स्थान मिळविले आहे. विलीने त्या मालिकेत 9 बळी मिळविले तर करनने दोन सामन्यात 4 बळी मिळविले. टी-20 मानांकनात दक्षिण आफ्रिकेचा क्विन्टॉन डी कॉक 9 स्थानांनी पुढे सरकत 13 वे स्थान मिळविले असून विंडीजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने 255 धावा फटकावल्या. तसेच त्यांच्या ऐडन मार्करमनेही 19 वरून 23 वे,  गोलंदाजीत जॉर्ज लिन्डेने 30 स्थानांची प्रगती करीत 43 वे, लुंगी एन्गिडीने 25 स्थानांची प्रगती करीत 56 वे स्थान मिळविले आहे. द.आफ्रिकेने ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. विंडीजच्या एविन लुईसने नववे, निकोलस पूरनने 87 वे, हेतमेयरने 99 वे स्थान मिळविले तर अष्टपैलू ड्वेन बॅव्होने या मालिकेत 10 बळी मिळवित 95 वरून 44 व्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाज ओबेद मकॉयने एकदम 65 स्थानांची बढती मिळवित 53 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

सांघिक क्रमवारीत इंग्लंडने लंकेविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकून क्रिकेट वर्ल्ड कप सुपरलीगमध्ये अग्रस्थानावर झेप घेतली आहे. जो रूटने फलंदाजीत दोन स्थानांची प्रगती करीत 13 तर कर्णधार इयॉन मॉर्गनने 26 वरून 25 व्या स्थानावर बढती मिळविली आहे. लंकेच्या कुसल परेराने 41 वे, धनंजया डिसिल्वाने दहा स्थानांची बढती मिळवित 74 वे स्थान मिळविले आहे.

Related Stories

भारतीय बुद्धिबळ संघाला संमिश्र दिवस

Patil_p

डेव्हिस चषक प्रशिक्षक अख्तर अली कालवश

Patil_p

गुजरात टेटे संघाचे लक्ष्य सुवर्णपदकावर

Patil_p

‘खेलो इंडियाच्या’ सहा केंद्रांना क्रीडा मंत्रालयाकडून आर्थिक मदत

Patil_p

करीम बेन्झेमाचे 6 वर्षांनंतर पुनरागमन

Patil_p

के. प्रशांतचा चेन्नईन संघाशी करार

Patil_p