Tarun Bharat

टू बी ऑर नॉट टू बी!

थरार आंबोलीतील कावळेसाद चा..

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

टू बी ऑर नॉट टू बी! मनाची अवस्था अशीच काहीशी झाली होती. धोका पत्करायचा निर्धार केला होता. परंतु धाडस होत नव्हते. मनातला पत्रकार सारखा सांगत होता ‘शेखर, अभी नही तो कभी नही…’ सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेली ती महाकाय कावळेसाद दरी अलीकडे बदनामीचा कलंक घेऊन वावरत होती. कोणी म्हणत होता तिला मृतदेहाची दरी, तर कोणी म्हणत होता शापित दरी. त्याला कारणही तसच होतं. मागील तीन-चार वर्षांत या दरीत घातपात करून फेकलेले, अपघाताने मृत्यू ओढवलेले, आत्महत्या करून जीवन संपवलेले असे अनेक मृतदेह सापडून आले होते. मध्यंतरी तर अशा बऱयाच अफवा उठत होत्या, त्या म्हणजे असे अनेक अज्ञात मृतदेह या दरीत सडत पडले आहेत म्हणून. एक पत्रकार म्हणून मला या खळबळजनक माहितीची वास्तवता तपासून पाहायची होती.

त्याचबरोबर या दरीत रेस्क्यूसाठी उतरणाऱया स्थानिक बचाव दलांना नेमके कोणते धोके पत्करावे लागतात, याची स्वत:ला जाणीव करून घ्यायची होती.  तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे धाडसाच्या बाबतीत स्वत:ची क्षमता आजमावणे आणि हे करीत असताना घनदाट जंगलाने व्यापलेल्या त्या महाकाय दरीत बचावाचे धडे गिरवणे. एका संधीतच हे सर्व साध्य करायचे होते. सिंधु-सहय़ाद्री ऍडव्हेंचर क्लबतर्फे नुकत्याच पार पडलेल्या मोहिमेच्या माध्यमातून अखेर हे सर्व साध्य झाले.

सिंधु-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लबतर्फे प्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कावळेसादच्या दरीत रेस्क्यू प्रशिक्षण शिबीरासाठी जी थरारक मोहीम हाती घेण्यात आली, त्यात एक पत्रकार म्हणून सहभागी होण्याची संधी मला मिळाली. वरून नजरेतही न मावणारा, तीन टप्प्यात तब्बल 700 ते 800 फूट खोल असलेल्या त्या उभ्या सरळसोट कातळ कडय़ाला दोर लावून उतरणे आणि तेही कुठल्याही प्रकारचे रॅपलिंगचे प्रशिक्षण न घेता, हे माझ्यासाठी फार मोठे आव्हान होते. केवळ आणि केवळ रामेश्वर सावंत यांच्यासारख्या कसलेल्या गिर्यारोहकावर भरवसा ठेवून हे आव्हान मी स्वीकारले आणि आश्चर्य म्हणजे रामेश्वर सावंत यांनी मला त्या दरीत सुरक्षितपणे उतरवले देखील.

सरळसोट कातळकडय़ावरचा तो रॅपलिंगचा अनुभव खरोखरच थरारक होता. ज्यावेळी दोराला लटकत त्या उभ्या कडय़ाला पाय लावत लावत अखेर त्या दरीतील जमिनीला पाय लागले, त्यावेळी आयुष्यात सर्वप्रथम पायाखालच्या जमिनीचे महत्व समजले. अक्षरश: अंगावर येणाऱया त्या राक्षसी कडय़ावर नजर टाकली, तेव्हा मला कडय़ावरून अलगद सोडणारी ती माणसे अगदी इंचा-इंचा एवढी दिसत होती. आपण एवढ धाडस करू शकलो, यावर विश्वासच बसत नव्हता. पण लगेचच स्वत:ला सावरले आणि त्या दरीतील कडेकपारीवरून माझी नजर भिरभिरू लागली.

ना मानवी सांगाडे दिसले, ना आक्षेपार्ह काही!

दोन वर्षांपूर्वी दरीच्या ज्या टोकावरून मद्याच्या नशेत मस्ती करीत असताना दोन युवक दरीत कोसळले होते, नेमक्या त्याच ठिकाणी मी उतरलो होतो. पावसात तब्बल 500 ते 600 फुटांवरून जलप्रपात कोसळण्याचे हे ठिकाण. मध्यंतरीच्या काळात चर्चेत आलेले सडलेले मृतदेह वा मानवी सांगाडे, कपडे वा पुरावे कुठे दिसतात का, हे पाहण्यासाठी माझी नजर अगदी घारीसारखी फिरत होती. सोबत सहकारी होतेच. त्यात महिला देखील होत्या. पण मला कुणाला घाबरवायचे नव्हते वा माझ्या मनातील वादळाचा थांगपत्ता लागू द्यायचा नव्हता. धनदाट जंगल आणि दरीच्या पायथ्याच्या दिशेने निमुळती होत गेलेली तीव्र घसरण यामुळे खूप शोधाशोध करणं जमलं नाही. पण नजरेच्या टप्प्यात आलं, त्यात मात्र आक्षेपार्ह असं काही दिसलं नाही.

शोधाशोध करेपर्यंत व सर्व सहकारी त्या कडय़ावरून उतरेपर्यंत अंधार झाला. आणि मग त्या भयाण दरीत कोसळलेल्या दगडधोंडय़ांच्या कपारीत आम्ही सुरक्षित आश्रय घेतला. रात्रीच्या अंधारात जंगली श्वापदांचा हल्ला होऊ नये, यासाठी तेथील जंगलाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेत विस्तव पेटवला. एकमेकांना धीर देत, सावरत, जंगलाच्या नियमांचा आदर करीत, कडाक्याच्या थंडीचा सामना करीत ती रात्र काढली. ही रात्र देखील विसरायचं म्हटलं, तरी विसरता येणार नाही अशीच होती. दुसऱया दिवशी सकाळी रामेश्वर सावंत व त्यांच्या सहकाऱयांनी माझ्यासह सर्वांकडून बचाव प्रशिक्षणाचा परिपूर्ण असा पाठच करून घेतला. कावळेसादच्या त्या दरीत तब्बल दोन दिवस शिबिरार्थींना हे थरारक प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्या कावळेसादच्या दरी पायथ्यापासून त्या घनदाट जंगलातून तब्बल 11 किलोमिटरची अत्यंत खडतर अशी पायपीट करीत मी व माझे सहकारी शिरशिंगे-मळईवाडी येथे सुरक्षित पोहोचलो.

शारीरिक क्षमतेची परीक्षा पहाणारी मोहीम

शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी एकंदर ही मोहीम होती. या मोहिमेत जंगल पर्यावरणाचा आदर कसा राखायचा, घनदाट जंगलात पायवाटा कशा शोधायच्या, खाद्यपदार्थ आणि पाण्याचा कमीत कमी वापर कसा करायचा, सुरक्षित आसरा कसा शोधायचा, जंगलात छोटा-मोठा अपघात झाला, तर काय करायचं, प्राण्यांची, पक्षांची भाषा कशी ओळखायची, त्याच्या नोंदी कशा घ्यायच्या आणि या सर्वातून स्वत:ला आणि सहकाऱयांना सुरक्षित कसे ठेवायचे, हे सर्व शिकता आले. हे सर्व शिकत असताना आंबोलीच्या दऱयाखोऱयांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात घालून उतरणारी आल्मेडा टिम, आंबोली टिम, एन. डी. आर. एफ. चे जवान आपले जीव पणाला लावून किती कष्ट घेत असतात, याची कल्पना आली. खरोखरच मानलं पाहिजे, या मंडळींच्या त्यांच्या सामाजिक योगदानाला.

पोलीस, होमगार्ड व स्थानिक युवकांसाठी प्रशिक्षण हवे

एकंदर या मोहिमेतून हे लक्षात आले की, खरं तर अशा ऍडव्हान्स रेस्क्यू मोहिमांचा लाभ पोलीस, होमगार्ड वा स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक घाटमार्गावर स्थानिकांचा सहभाग असलेले असे पथक तयार झाले पाहिजे. शासनाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच या दरीतील जैवविविधता संशोधनाला प्रचंड वाव आहे. यासाठी आता स्थानिक युवकांनी पुढे आले पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे या दरीत दुर्मिळ, अतिदुर्मिळ अशी जी जैवविविधता आहे, त्याचे संशोधन जरुर व्हावे. पण, त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत वा येथील जैवविविधतेस हानी पोहचणार नाही याची पुरेपूर काळजी वनखात्याने घ्यायला हवी.

पत्रकारितेतील थ्रील

आतापर्यंत अनेकवेळा ‘तरुण भारत’च्या माध्यमातून वृत्तांकनाच्या संधी साधताना थ्रिलिंग पत्रकरिता अनुभवता आली. यापूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवर जाऊन वृत्तांकन करताना काश्मिरमध्ये दहशतवादाची धगधग अनुभवली. त्यानंतर भारत-चीन सीमेवर वृत्तांकन करताना सियाचीनसारख्या जगातील सर्वात उंच रणभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया अतिथंड प्रदेशात उणे 30 अंश सेल्सीयसमध्ये वृत्तांकनाचा अनुभव घेतला. घनदाट जंगलात जाऊन वृत्तांकनाचा अनुभव घेतला. थेट समुदात पाण्याखाली जाऊन वृत्तांकन करता आले. नाईट पेट्रोलिंगसारखे मध्यरात्रीचे वृत्तांकनाचे अनुभव घेतले. अमावास्येच्या रात्री स्मशानभूमीत मुलाखती घेण्याचेही धाडस केले आणि आता थेट दरीत उतरून वृत्तांकन करण्याचा थरारक अनुभव घेण्याचा योग या मोहिमेदरम्यान आला.

Related Stories

काजू शेतकऱयांच्या हाती या वर्षीही धुपाटणेच

NIKHIL_N

लांजात छुप्या पद्धतीने गावठी दारुधंद्याना ऊत

Patil_p

आंबा बागायतींना ‘ऍव्होकॅडो’ उत्तम पर्याय!

Patil_p

सांगेलीत आज रात्रीपासुन आठ दिवसांचा जनता कर्फ्यू

NIKHIL_N

रिक्षा चालकांना खासदारांचा मदतीचा हात

NIKHIL_N

प्रभावती कोरगावकर यांचे निधन

Anuja Kudatarkar