Tarun Bharat

टॉम मुडी लंकेचे क्रिकेट संचालक?

लंका क्रिकेट समितीकडून शिफारस

वृत्तसंस्था/ कोलंबो

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मुडी यांची लंका क्रिकेट मंडळाकडून क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

लंकन मंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला चार सदस्यीय श्रीलंका क्रिकेट समितीची नियुक्ती केली असून त्यात माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन, माजी कर्णधार कुमार संगकारा, अरविंद डीसिल्वा, रोशन महानामा या चौघांचा समावेश आहे. या समितीने नव्याने निर्माण केलेल्या क्रिकेट संचालकपदासाठी मुडी यांच्या नावाची शिफारस केली आहे. ‘मुडी यांना ऑस्ट्रेलियातील क्रिकेट आणि तेथील संरचना, आयपीएल आणि त्याची संरचना, इंग्लिश कौंटी क्रिकेट आणि त्यांची संरचना तसेच कॅरिबियन प्रिमियर लीग यांचा मोठा अनुभव असल्याने लंकन क्रिकेटसाठी तो उपयुक्त ठरणारा आहे,’ असे अरविंद डीसिल्वा यांनी म्हटल्याचे एका क्रीडा वेबसाईटने वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक असलेल्या मुडी यांनी 2005 आणि 2007 या कालावधीत लंकेचे प्रशिक्षकपदही सांभाळले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लंकेने 2007 साली विंडीजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या पदासाठी त्रयस्थ व्यक्ती असण्याचे महत्त्वही डीसिल्वा यांनी विशद केले आणि त्यांना लंकन संस्कृती, खेळाडू यांची बऱयापैकी माहिती आहे. त्यामुळे प्रशासकीय बाजू आणि क्रिकेटची बाजू ते उत्तमरीत्या सांभाळू शकतील, असे वाटत असल्याचे डीसिल्वा यांनी सांगितले. इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेली कसोटी मालिका 2-0 अशी गमविल्यानंतर गेल्या महिन्यात लंकन निवड समितीचे प्रमुख असंथा डी मेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सरावाच्या अभावामुळेच द.आफ्रिका व इंग्लंडविरुद्धच्या मालिका लंकेला गमवाव्या लागल्या, असे डी मेल यांनी त्यावेळी म्हटले होते.

Related Stories

स्कॉटलंडचा अमिरातवर शानदार विजय

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ‘व्हर्च्युअल’ वितरण

Patil_p

न्यूझीलंडचा वनडे मालिकाविजय

Patil_p

होबार्ट हरिकेन्सची विजयी सलामी

Patil_p

महाराष्ट्र कॅरम संघटनेकडून मदत

Patil_p

मिशेल-ब्लंडेलने न्यूझीलंडचा डाव सावरला

Patil_p