Tarun Bharat

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

वृत्तसंस्था /टोकियो

Tokyo: Chungneijang Mery Kom Hmangte and Manpreet Singh, of India, carry their country’s flag during the opening ceremony in the Olympic Stadium at the 2020 Summer Olympics, Friday, July 23, 2021, in Tokyo, Japan. AP/PTI(AP07_23_2021_000238B)

नॅशनल स्टेडियमवरील इंडिगो व व्हाईट आतषबाजीने बहुप्रतीक्षित 32 व्या टोकियो ऑलिम्पिकचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना महामारीमुळे एक वर्ष लांबणीवर पडल्यानंतर अखेर शुक्रवारी या स्पर्धेचे प्रेक्षकांच्या गैरहजेरीत शानदार उद्घाटन केले गेले. नेहमी होणारे सामूहिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, बडय़ा सिलेब्रेटिंची उपस्थिती यांच्याशिवाय हा सोहळा पार पडला.

टोकियोमध्ये कोरोना रुग्णांची वाढू लागल्याने आणीबाणी जाहीर केली गेली आणि त्यामुळे उद्घाटन सोहळय़ाला प्रेक्षकांना दूर ठेवण्याचा निर्णय घेणे आयोजकांना भाग पडले होते. नेहमी या सोहळय़ाला अनेक महनीय व्यक्ती व स्टार्सची उपस्थिती असते. यावेळी मोजक्या महनीय व्यक्ती वगळता एक हजारपेक्षा कमी माणसांची उपस्थिती या सोहळय़ाला होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रीडापटूंसाठी हा भावनिक क्षण होता. कोरोना महामारीमुळे स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे नंतर त्यांना तयारी करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. जपानमधील जनतेनेदेखील महामारीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली, तेव्हा सर्वच क्रीडापटूंमध्ये आपली तयारी वाया जाते की काय, अशी भीती निर्माण्ण झाली होती. त्यामुळेच शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर त्यांना हायसे वाटले. उद्घाटनावेळी कोरोना संबंधित सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. याशिवाय उपस्थित मोजक्या प्रेक्षकांनाही शांतता व संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.

असे असले तरी क्रीडा विश्वातील या सर्वात मोठय़ा महोत्सवात जगभरातील करोडो लोक टीव्हीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. टोकियो ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये इंडिगो व पांढऱया रंगाचा वापर करण्यात आला आहे. उद्घाटनाच्या प्रारंभी जपानला यजमानपद मिळाल्यापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची व्हिडिओ फीत दाखवण्यात आली. 2013 मध्ये यजमानपदाची घोषणा झाल्यापासून विश्वाला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले, त्याचे चित्रणही या व्हिडिओत करण्यात आले होते. मागील वर्षीच या स्पर्धेचे आयोजन होणार होते. पण कोरोना महामारीचा संपूर्ण जगालाच फटका बसल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र अजूनही त्याचा बहर कमी झालेला नसल्याने यावर्षीही त्याच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाली होती. आयोजन समिती व आयओसी व जपान सरकार यांनी निर्धाराने या सर्वांवर मात करीत स्पर्धेला यशस्वीपणे सुरुवात केली आहे.

टोकियोमध्ये यापूर्वी 1964 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱया महायुद्धात पराभव झाल्यानंतर जपानने या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर त्यावेळी पुनरागमन केले होते. यावेळच्या आयोजनाआधी जपानला 2011 मध्ये मध्ये भूकंप, त्सुनामी आणि अणू संकटाचा सामना करावा लागला होता. आकर्षक आतषबाजी झाल्यानंतर स्टेडियममधील एकमेव महिला ऍथलिटवर स्पॉटलाईट केंद्रित करण्यात आला. मैदानावर एक बीज ठेवण्यात आले होते, त्यावर तिने हात ठेवला होता. ती उभे राहील तसे तिची बिजाच्या आकारातील प्रतिमा मोठी होत गेली. कोरोना महामारी आणि 2011 मध्ये झालेल्या दुर्घटनानंतर जपानचे पुनज्जीवजन झाल्याचे त्यातून प्रतिबिंबित करण्यात आले. उद्घाटनानंतर सर्व देशांच्या क्रीडापटूंचे पथसंचलन घेण्यात आले, मात्र त्यातही प्रत्येक देशाने निवडक क्रीडापटूंनाच सामील केले होते. कोव्हिडची धास्ती असल्याने अनेक  क्रीडापटूंनी त्यांच्या इव्हेंटच्या आधी दाखल होऊन तो संपल्यानंतर लगेचच मायदेशी प्रयाण करण्याची योजना आखली आहे. या सोहळय़ास जगभरातील निवडक 15 बडय़ा महनीय व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यात जपानचे सम्राट नारुहितो, अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बिडेन यांचा समावेश आहे. नारुहितो यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र जपानचे पंतप्रधान शिंजो अबे या सोहळय़ास उपस्थित नव्हते. याशिवाय पुरस्कर्ते आणि अर्थजगतातील अनेक जाणकार यांनीही या सोहळय़ापासून दूर राहणे पसंत केले. 8 ऑगस्टपर्यंत स्पर्धा होणार असून 204 देशांतील 11,000 हून अधिक स्पर्धकांनी त्यात भाग घेतला आहे.

Related Stories

मेदवेदेव्हच्या पराभवामुळे जोकोविच पुन्हा अग्रस्थानी

Patil_p

सुशीलकुमारला निलंबित करण्यासाठी रेल्वे खाते सज्ज

Patil_p

हार्दिक पंडय़ाचा अर्धशतकी झंझावात

Amit Kulkarni

बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रांचीत दाखल

Amit Kulkarni

स्लोअन स्टीफेन्स, अझारेन्का, हॅलेप, ओसाका तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

आरसीबीला चेन्नईकडूनही पराभवाचा शॉक

Patil_p