Tarun Bharat

टोलनाके, महामार्ग शेतकऱयांनी रोखले!

वाहतुकीची कोंडी : करवसुली बंद पाडल्याने दिवसाला 3 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱयांनी आपले आंदोलन अधिक धारदार केले आहे. शेतकऱयांनी हरियाणा व पंजाबमध्ये टोल फ्री केले आहेत. टोल कर्मचाऱयांना करवसुली करण्यास अडथळा निर्माण केला जात आहे.   दरम्यान, एकीकडे टोलवसुली बंद करतानाच जयपूर-दिल्ली आणि आग्रा-दिल्ली हे दोन महामार्गही शनिवारी शेतकऱयांनी रोखल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.

शेतकरी आंदोलन आता 17 दिवसांवर येऊन ठेपले आहे. या आंदोलनादरम्यान टोलवसुली बंद पाडल्यामुळे सरकारचे प्रत्येक दिवसाचे 3 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पंजाब राष्ट्रीय महामार्गावर एकूण 25 टोलनाके आहेत. आंदोलनाची वाढती दाहकता लक्षात घेत फरीदाबाद पोलिसांनी दिल्ली-हरियाणाच्या मार्गावरील टोलप्लाझावर 3,500 पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. बदारपुर, गुरुग्राम, फरिदाबाद, कुंडली गाझियाबाद व धौजटोल प्लाझावरील शेतकरी आंदोलकांवर नजर ठेवली जात आहे.

राकेश टिकैत यांचा ‘घुसखोरां’वर हल्लाबोल

शेतकरी आंदोलनात देशविरोधी लोक घुसल्याच्या सरकारच्या आरोपावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी गुप्तचर यंत्रणा लावून त्यांना पकडा. जर बंदी असलेल्या संघटना आमच्या आंदोलनात घुसल्या असतील तर त्यांना पकडून जेलमध्ये घातले पाहिजे. आम्हाला आतापर्यंत असे कोणी आढळून आले नाही, आढळल्यास त्यांना बाहेर काढूया असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱयांच्या समस्या व मागण्या सरकारने ऐकल्या पाहिजेत. मात्र सरकार शेतकऱयांची बाजू ऐकून घेण्यापेक्षा त्यांच्यावरच दाबाव आणताना दिसून येत असल्याचे मत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखाबीर सिंह बादल यांनी व्यक्त केले आहे.

महामार्ग रोखण्याचा आंदोलकांना प्रयत्न

आंदोलनाच्या 17 व्या दिवशी शेतकऱयांनी ‘दिल्ली-जयपूर महामार्ग’ रोखण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांमध्ये शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. भेटी-गाठींचे सत्र सुरू आहे मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱयांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करत आता चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीöजयपूर राष्ट्रीय महामार्गासोबतच दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे देखील जाम करण्याचा प्रयत्न शेतकऱयांनी केला. या पार्श्वभूमीवर पोलीस फौजफाटा मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आला होता. सोबतच ड्रोनच्या मदतीने देखील आंदोलनावर लक्ष ठेवले जात होते.

सोमवारपासून उग्र स्वरुप

14 डिसेंबरपासून जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयांसमोर, भाजप नेत्यांच्या घरांसमोर तसेच रिलायन्स, अदानी टोल प्लाझावर शेतकरी आंदोलन करणार आहेत. तसेच रेल्वेमार्गावरही आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, कायदे मोडणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल, असा पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.

क्रीडापटूंचा वाढता पाठिंबा

शेतकऱयांच्या या आंदोलनात आता आघाडीचे कबड्डीपटू आणि कुस्तीपटूही सहभागी झाले आहेत. मुष्टीयुद्धातील भारताचा पहिला ऑलिम्पिक पदकविजेता विजेंदरसिंग 6 डिसेंबरला आंदोलनात सहभागी झाला होता. विजेंदरप्रमाणेच अनेक कबड्डीपटू आणि कुस्तीपटूही आता शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. सुखजीतसिंग हे ख्यातनाम कबड्डीपटूही आंदोलनात सहभागी झाले आहेत. ते हरियाणातील आहेत. त्यांचा सहकारी मोनिकरसिंहदेखील आंदोलनात सहभागी झाला आहे.

17 दिवसांत 11 शेतकऱयांचा मृत्यू : राहुल गांधी

शेतकऱयांच्या आंदोलनादरम्यान मागील काही दिवसांमध्ये 11 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याचा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यानिमित्ताने त्यांनी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणखी किती शेतकरी बांधवांना बलिदान द्यावे लागणार आहे, असा प्रश्न विचारला आहे. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही ‘17 दिवसांमध्ये 11 शेतकरी बांधवांच्या मृत्यूनंतरही मोदी सरकारला दया येत नाही. सरकार अजूनही अन्नदात्यांसोबत नव्हेतर धनदांडग्यांसोबत का उभी आहे?’ असे ट्विट केले आहे.

कायद्यातील बदलांवरच प्राधान्याने चर्चा व्हावी : शेतकरी नेते

आंदोलनाची धग वाढत असल्याने सरकारकडून शेतकरी नेत्यांना वारंवार चर्चेचे आमंत्रण देण्यात येत आहे. मात्र, नव्या कृषी कायद्यात बदल करण्याला प्राधान्य दिले जाणार असले तरच आम्ही बैठकीत सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. नवे कायदे शेतकऱयांसाठी मारक असून त्यावरच सर्वप्रथम चर्चा व्हायला हवी. त्यानंतर अन्य मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात यावी, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी शनिवारी स्पष्ट केली आहे.

Related Stories

सरकारने न्याय व्यवस्थेची स्थिती सुधारावी : प्रियांका गांधी

Tousif Mujawar

खर्गेंच्या वादग्रस्त विधानावर गदारोळ

Patil_p

31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद

Patil_p

सेक्सेक्स तब्बल 1,688 अंकांनी गडगडला

Patil_p

देशाला 35 ऑक्सिजन प्रकल्प समर्पित

Amit Kulkarni

37 वर्षे जुनी शासकीय कंपनी बंद

Patil_p