Tarun Bharat

ट्रक-कार अपघातात मायलेकासह तीन ठार

अंजणारी पुलावरुन दोन्ही वाहने नदी पात्रात कोसळली

लांजा / चिपळूण

लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर ट्रक व कार यांच्यात झालेल्या अपघातात रिक्टोली गावातील आयटी इंजिनिअर व त्याची आईचा रविवारी  मृत्यू झाला. सोमवारी या मायलेकावर रिक्टोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, यामध्ये गंभीर जखमी असलेल्या वडिलासह त्यांची सून यांच्यावर अद्यापही रत्नागिरी येथे उपचार सुरु आहेत.

  शाडूची माती घेऊन जाणाऱया ट्रकचे ब्रेक निकामी होऊन समोरून येणाऱया कारला धडक बसून झालेल्या अपघात दोन्ही वाहने आंजणारी पुलावरून 30 ते 35 फूट नदीपात्रात कोसळली. यात ट्रक चालक व कारमधील दोघे अशा तिघांचा मृत्यू झाला. या अपघात रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर अंजणारी पुलावर घडला.

 या अपघातातमध्ये ट्रक चालक विजय सावंत (35, पुनस-सावंतवाडी, लांजा) व कार चालक समीर प्रदीप शिंदे (35) यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाची आई सुहासिनी (60) यांचा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झाला.   पत्नी समृद्धी (30) आणि वडील प्रदीप (65) अपघातात गंभीर जखमी झाले. ट्रकमधील क्लिनर जयेश जयराम तांबे (24, लांजा) ट्रक मधून बाहेर फेकला गेल्याने बचावला. मात्र त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमी व मृत प्रवाशांना लांजा पोलीस व ग्रामस्थांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

चिपळूण येथील शिंदे कुटुंबीय रविवारी रात्री मालवण येथून कारने (एमएच 02 एफआर 0015) चिपळूणकडे निघाले होते. ट्रकचालक विजय विलास सावंत आपल्या ताब्यातील ट्रकमधून (एमएच 08 एपी 5056)  हा गणपती मूर्तीसाठी शाडू माती घेऊन गुजरातकडून कुडाळच्या दिशेने निघाला होता. रविवारी रात्री 8. 30 च्या सुमारास आंजणारी घाटात तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र महामार्गावर मोठय़ा प्रमाणात लक्झरी गाडय़ांची रहदारी होती. अशा स्थितीत त्यांनी आंजणारी पुलापर्यंत ट्रक आणला. मात्र पुलावर समोरून येणाऱया कारला ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेने दोन्ही वाहने अंजणारी पुलावरून नदी पात्रात 30 ते 35 फूट खाली कोसळली.

रात्री 8.30 च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मात्र काळोखामुळे नेमके काय घडले याचा अंदाज त्यांना आला नाही. काही तरुणांनी नदीत उतरून पाहिले असता अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले व मदत कार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या चौघांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून बाहेर काढले. अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

समीर हे आयटी इंजिनिअर

अपघातात मृत झालेले समीर हे आयटी इंजिनिअर आहेत. त्यांचा मालवण येथे सॉफ्टवेअरचा व्यवसाय आहे व त्याठिकाणीच त्यांचे वास्तव्य आहे. समीर यांचे घराणे उच्चशिक्षित असून त्यांचे वडील प्रदीप शिंदे हे पोलीस खात्यामधून सेवानिवृत्त झाले आहेत, तर त्यांचे अन्य दोन भाऊ हे पोलीस खात्यात सेवेत आहेत. समीर यांचा समृध्दी यांच्याशी 6 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. अपघाती मृत्यू झालेल्या समीर व आई सुहासिनी यांचे मृतदेह सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास रिक्टोली येथे आणल्यानंतर त्यांच्यावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण कुटुंबासह ग्रामस्थ उपस्थित होते. समीर हे शांत व मनमिळावू स्वभावामुळे वाडीसह गाव परिसरात परिचित होते. त्यांनी रिक्टोली येथील घर परिसरात वृक्षलागवड केली असून सोमवारी गावी आल्यानंतर ते पुन्हा वृक्षांची लागवड करणार होते. मात्र त्यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण रिक्टोली गावावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

दहा दिवसांचे क्वारंटाईन कायम

Patil_p

विनाअनुदानित तुकडय़ांचा मुद्दा ऐरणीवर

NIKHIL_N

गुहागर येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

Archana Banage

एसटी चालक-वाहकांना प्रवाशांकडून धक्काबुक्की!

Patil_p

घनकचरा व्यवस्थापनासाठी बांदा शहराची निवड

Anuja Kudatarkar

महामार्गावर रखडलेल्या पुलाचे काम नव्याने सुरु

Patil_p