Tarun Bharat

ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सलग सहावा विजय

वृत्तसंस्था/  पोर्ट ऑफ स्पेन

केरॉन पोलार्डच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या हिरो पुरस्कृत कॅरेबियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने आपला सलग सहावा विजय नोंदविताना बार्बाडोस ट्रायडेंट्सचा दोन गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात जमैका तलावाह संघाने सेंट किटस्-नेव्हीस पॅट्रीओट्सचा 37 धावांनी पराभव केला.

नाईट रायडर्स आणि बार्बाडोस ट्रायडेंट्स यांच्यातील सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. नाईट रायडर्स संघातील केरॉन पोलार्डने 28 चेंडूत 72 धावांची वादळी खेळी करताना 9 षटकार आणि 2 चौकार ठोकले. या स्पर्धेतील नाईट रायडर्सचा हा सलग सहावा विजय असून आता ते स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहेत. या सामन्यात नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून बार्बाडोस टायडेंट्स संघाला प्रथम फलंदाजी दिली. बार्बाडोसने 20 षटकांत 7 बाद 148 धावा जमविल्या. बार्बाडोस संघातील शाय होप 4, जॉन्सन चार्ल्सने 47 तर मेयर्सने 42 धावा जमविल्या.

प्रत्त्युत्तरादाखल खेळताना नाईट रायडर्सच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांचे पहिले दोन फलंदाज केवळ 6 धावांत बाद झाले. वेबस्टर 5 तर मुनरो शून्य धावावर बाद झाले. दरम्यान रशीद खानने ब्रॅव्होला पायचीत केले. सिफर्ट 4 धावांवर झेलबाद झाला. यावेळी नाईट रायडर्सची स्थिती 4 बाद 48 अशी होती. पोलार्ड मैदानात आला त्यावेळी नाईट रायडर्सला विजयासाठी 39 चेंडूत 87 धावांची जरूरी होती. पोलार्डने रशीद खानच्या पहिल्या चेंडूवर षटकार तसेच दुसऱया चेंडूवरही षटकार ठोकला. दरम्यान सिमॉन्स बाद झाल्याने नाईट रायडर्सला विजयासाठी 24 चेंडूत 66 धावा नोंदविणे जरूरीचे होते. डावातील 17 व्या षटकांत पोलार्डने रिफेरच्या षटकांत सलग चार षटकार ठोकले. यामुळे नाईट रायडर्सला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 31 धावांची जरूरी होती. होल्डरच्या गोलंदाजीवर पोलार्डने आणखी दोन षटकार ठोकले. डावातील शेवटच्या षटकांत पोलार्डने 15 धावा झोडपल्या. या शेवटच्या षटकात पोलार्डने षटकार ठोकल्यानंतर पुढील चेंडूवर तो धावचीत झाला. नाईट रायडर्सला शेवटच्या चार चेंडूत विजयासाठी 8 धावांची गरज होती. नाईट रायडर्सच्या पिरे आणि सिलेस या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण करत आपल्या संघाला दोन गडी राखून विजय मिळवून दिला.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात जमैका तलावाहने सेंट किटस् पेट्रीओट्सचा 37 धावांनी पराभव केला. या सामन्यात जमैका संघातील सलामीचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने 61 चेंडूत नाबाद 79 धावा जमविल्या. प्रथम फलंदाजी करताना जमैका तलावाहने 20 षटकांत 6 बाद 147 धावा जमविल्या. त्यानंतर सेंट किट्स पेट्रीओट्सचा डाव 19.4 षटकांत 110 धावांत आटोपला. जमैका तलावाहतर्फे कार्लोस बेथवेटने 11 धावांत 3 गडी बाद केले. आता या स्पर्धेत जमैका तलावाह आणि ट्रिनबॅगो नाईट रायडर्स यांच्यातील सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.

Related Stories

महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतून हॉलंडची माघार

Patil_p

कोको गॉफला दुहेरी मुकुटाची संधी

Patil_p

बोस्टनमधील स्पर्धेत तेजस्विन शंकरला सुवर्ण

Patil_p

निर्बंध टाळण्यासाठी एमसी मेरी कोम इटलीला रवाना होणार

Patil_p

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा

Patil_p

भारत-बांगलादेश उपांत्य लढत आज

Patil_p