राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक
ऑनलाईन टीम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात सुरुक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकींच्या मार्गात देखील बदल करण्यात आले आहेत. तर, गोविंदपुरी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे या मार्गावर ट्रॅफिक जॅम झाल्याने रुग्णालयात जाणाऱ्या एका महिलेचा ट्रॅफिकमध्ये अडकून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. वंदना मिश्रा (वय-५०) असे या मृत महिलेचे नाव आहे. भारतीय उद्योग संघटनेच्या स्थानिक महाविद्यालयाच्या महिला शाखेच्या त्या अध्यक्ष होत्या.
मिश्रा यांना मळमळ आणि उलट्या झाल्यानंतर रुग्णालयात जाण्यासाठी त्या निघाल्या. मात्र नंदलाल चौक ते गोविंदपुरी उड्डाणपूल दरम्यान झालेल्या ट्रॅफिकमध्ये त्या अडकून पडल्या. रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बरीच रहदारी असल्याने, त्यांना उशीर झाला आणि गाडीमध्ये असताना त्यांना उलट्या झाल्या. यातच त्यांचा अखेर मृत्यू झाला. गोविंदपुरी पुलावर तैनात असलेल्या पोलिसांना वारंवार विनंती करूनही रस्ता उघडला गेला नाही, असा आरोप परिवाराने केला आहे. त्यानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हेड कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे.
कानपूर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलने मिश्रा यांच्या मृत्यूबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “महामहिम राष्ट्रपती, बहीण वंदना मिश्रा यांच्या अकाली निधनामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी पोलिस आयुक्तांना व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली आणि शोकग्रस्त कुटुंबापर्यंत आपला संदेश पोहचविण्यास सांगितले. दोन्ही अधिकारी अंत्यसंस्कारात हजर झाले आणि शोकसंतप्त कुटुंबाला राष्ट्रपतींचा संदेश दिला,”असे ट्विटमध्ये म्हटले आहे.


previous post
next post