Tarun Bharat

टय़ुनिशियाचा फ्रान्सला धक्का, तरीही स्पर्धेबाहेर

डेन्मार्कवर मात करीत ऑस्ट्रेलिया बाद फेरीत

वृत्तसंस्था/ कतार

विश्वचषक स्पर्धेत बुधवारी आणखी एक धक्कादायक निकाल पहावयास मिळाला. तरीही हरणाऱया संघाने आगेकूच केली तर जिंकणाऱया संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागले. विद्यमान विजेत्या फ्रान्सला टय़ुनिशियाने गट ड मधील सामन्यात 1-0 असा पराभवाचा धक्का दिला तर याच गटातील दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचाही याच फरकाने पराभव करून 16 वर्षांच्या खंडानंतर बाद फेरीत स्थान मिळविले.

एज्युकेशन सिटी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टय़ुनिशियाने फ्रान्सला 1-0 असे चकित केले. अखेरच्या मिनिटात ऍटॉईन ग्रीझमनने फ्रान्सचा गोल नोंदवला होता. पण व्हीएआरनंतर हा गोल रद्द करण्यात आल्याने टय़ुनिशियाचा विजयही निश्चित झाला. मात्र या विजयाचा त्यांना काहीही फायदा झाला नाही. या विजयानंतरही त्यांना गटात तिसरे स्थान मिळाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. फ्रान्सने मात्र दोन विजय मिळविले असल्याने त्यांचे बाद फेरीतील स्थान याआधीच निश्चित झाले होते. पण विश्वचषकातील सलग सहा विजयाची त्यांची मालिका या पराभवाने खंडित झाली. सरस गोलसरासरीमुळे 6 गुण मिळविणाऱया ऑस्ट्रेलियाला मागे टाकत त्यांनी गटात अग्रस्थान मिळविले. टय़ुनिशियाचा एकमेव गोल 58 व्या मिनिटाला वाहबी खाझरीने नोंदवला. सुरुवातीलाही टय़ुनिशियाच्या नादेर घांद्रीने फ्लिक करीत चेंडू जाळय़ात मारला होता. पण पंचांनी तो ऑफसाईड ठरवित गोल रद्द केला. टय़ुनिशियाचा हा सहा विश्वचषकातील तिसरा विजय होता.

ऑस्ट्रेलिया विजयी

ऑस्ट्रेलियानेही डेन्मार्कला 1-0 असा धक्का देत शेवटच्या सोळा संघांत स्थान मिळविले. यापूर्वी 2006 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाद फेरी गाठली होती. मॅथ्यू लेकीने एकमेव निर्णायक गोल केला. अल जनौब स्टेडियमवरील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बराच काळ डेन्मार्कवर रोखले होते. 60 व्या मिनिटाला मात्र प्रतिआक्रमणात लेकीने जोरदार हल्ला चढविला आणि लो फटका मारून गोलरक्षक कॅस्पर श्मीचेलला चकवा देत गोल नोंदवला. हाचा गोल शेवटी निर्णायक ठरला. डेन्मार्कच्या प्रशिक्षकांनी आक्रमक खेळाडूंची फळी उतरवली. त्यांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण शेवटी त्यांना गोलने हुलकावणीच दिली. डेन्मार्कला या स्पर्धेत एकही गोल नोंदवता आला नाही. एक गुणासह ते तळाच्या चौथ्या स्थानावर राहिले.

Related Stories

प्रिमियर लीगमधील चार फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p

अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा टेनिसला निरोप

Patil_p

लकी मैदानावर राजस्थान दिल्ली कॅपिटल्सला रोखणार?

Patil_p

न्यूझीलंडचा पाकवर नऊ गडय़ांनी विजय

Patil_p

आयपीएलमध्ये चेन्नईचा पहिला विजय

Patil_p

पाक संघातून शान मसूद, सोहेलला डच्चू

Patil_p