Tarun Bharat

ठकसेनांची जप्त मालमत्ता बँक-सरकारजमा

Advertisements

41 टक्के कर्जवसुलीचा अंदाज – विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सीला दणका

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

विविध बँकांना कोटय़वधींचा गंडा घालून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठा झटका दिला आहे. तिन्ही उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पोबारा केला आहे. या प्रकरणात ईडीने त्यांची 18 हजार 170 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी 9 हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे. या संपत्तीच्या माध्यमातून ठकसेनांनी घेतलेल्या कर्जापैकी 41 टक्के रकमेची वसुली होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची 18 हजार 170 कोटींची संपत्ती निवारण अधिनियम 2002 अर्थात पीएमएलए कायद्यांतर्गत जप्त केली होती. या संपत्तीपैकी 9 हजार 371.17 कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ईडीने ट्विट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी काही बँक अधिकाऱयांना हाताशी धरून पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तुरुंगात तर मेहूल चोक्सी डोमिनिकातील तुरुंगात आहे. दोघांविरुद्धही सीबीआय चौकशी करत असून, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे मद्यसम्राट विजय मल्ल्याची चौकशी सुरू असून त्याच्या मालमत्तेवर तपास यंत्रणांची करडी नजर आहे.

आतापर्यंत 18 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त

विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी आणि नीरव मोदींसारख्या फरार आरोपींची आतापर्यंत एकूण 18 हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त किंवा सील करण्यात आली आहे. ही रक्कम बँकांच्या एकूण नुकसानीच्या 80 टक्के आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण संपत्तीपैकी 969 कोटी रुपयांची संपत्ती विदेशात आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्या एकत्रित आर्थिक गैरव्यवहाराचा विचार केल्यास त्यांनी सरकारी बँकांना 22 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान पोहोचवले आहे.

Related Stories

भारतात मागील 24 तासात 28,637 नवे कोरोना रुग्ण, 551 मृत्यू

datta jadhav

…अन्यथा गुजरातमध्ये समील होऊ; नाशिकमधील 55 गावांचा राज्य सरकारला इशारा

datta jadhav

मान्सूनची आगेकूच, मुसळधारेची शक्यता

Patil_p

भारतात 1.51 लाख कोरोनाबाधित, 4337 मृत्यू

datta jadhav

RSS मुख्यालयाची रेकी करणारा ‘जैश’चा दहशतवादी नागपूर ATS च्या ताब्यात

datta jadhav

35 वर्षांमध्ये 200 वेळा रक्तदान

Patil_p
error: Content is protected !!