Tarun Bharat

ठाकरे-फडणवीस यांच्यातील कलगीतुऱ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याच्या एकमेकांवर दुगाण्या
सोलापूर जिह्यातील शेतकऱ्यांच्या अश्रूचेच केले राजकारण

रजनीश जोशी / सोलापूर

आभाळ कोसळलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर दोषारोप करून दुगाण्या झाडल्या आहेत. आज दोघेही सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, मात्र शेतकऱ्यांच्या अश्रूचे राजकारण ते करत असल्याचे दिसून आले.

पंढरपूरला आलेला महापूर आणि वाहून गेलेली सोलापूर जिल्ह्यातील शेती यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा तर मिळाला नाहीच, पण मुख्यमंत्र्यांची ठाकरी भाषा आणि विरोधी पक्षनेत्यांचे त्याला उत्तर असा कलगीतुरा मात्र रंगला. जनतेच्या दुःखाशी कोणालाच देणेघेणे नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे शनिवारी सोलापुरात सांगितले होते, त्याला मुख्यमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेचा फार्स केला. आपदग्रस्तांना मदतीबाबत घोषणा करण्याऐवजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘देवेंद्र फडणवीसांनी बिहारचे दौरे करण्याऐवजी आपल्या राज्यात लक्ष द्यावे’, असा टोमणा मारला. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ‘मुख्यमंत्री थिल्लर आहेत, सरकार चालवायला दम लागतो,’ अशा शेलक्या शब्दात हल्ला केला. मुख्यमंत्री आज अक्कलकोटला गेले, एरवी दुष्काळी तालुक्यात गणल्या जाणाऱ्या अक्कलकोटमध्ये अतिवृष्टीने नदी-नाल्याला आलेल्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तिथल्या तिथे निर्णय देण्याऐवजी ते सोलापुरात आले. सोलापूरात मदत जाहीर करण्याऐवजी राजकीय चिखलफेक त्यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांना हेच हवे असल्याने त्यांनीही प्रत्युत्तर देऊन गदारोळ उठवला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे हे कर्तेधर्ते जनतेच्या हिताकडे पाहण्याऐवजी शिवराळ पातळीवर उतरले आहेत. आगामी दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टी होईल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आपदग्रस्तांना धडकी भरवण्याचेच काम सरकारने केल्याची चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्यांना मदतीचा चेंडू केंद्राच्या कोर्टात
राज्य कर्जबाजारी आहे, केंद्रानेच शेतकऱ्यांना मदत करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यात सांगितले, तर आज मुख्यमंत्र्यांनीही त्याचीच री ओढली. मुख्यमंत्री ठाकरे सोलापुरात मदतीची घोषणा करतील, असे चित्र उपमुख्यमंत्र्यांनीही रंगवले होते. पण ऐनवेळी केंद्राकडे मदतीची याचना करून ठाकरे यांनी हात झटकले आहेत. ठाकरे यांचा ‘बोलविता धनी’ वेगळाच असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Related Stories

मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, मुख्यसूत्रधार रियाज कोल्हापूरचा

Abhijeet Khandekar

चिंताजनक : महाराष्ट्रात 6,218 नवीन कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

अन्यथा पालिकेच्या दारात कचरा टाकू

Patil_p

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत जाहीर

Archana Banage

सोलापूर : संभाजीराजेंच्या आंदोलनास मराठा बांधवांचा पाठिंबा

Archana Banage

सातवेत पंख्याचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Archana Banage