Tarun Bharat

डाटा सेंटर अन्य बँकांना मार्गदर्शक ठरेल!

Advertisements

शरद पवार यांचे गौरवोद्गार : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हा बँकेचा नेटका कारभार, सभासदांचा बँकेवर असलेला विश्वास आणि शेतकऱयांना पैसे परत करण्याची लागलेली सवय यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा एनपीए शून्य टक्क्यावर राहिला आहे. जिल्हा बँकेचे हे फार मोठे यश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सुरू केलेले डाटा सेंटर राज्यातील सहकारी बँकांमधील पहिले सेंटर आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील इतर बँकांना ते मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 38 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या डाटा सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील ऑनलाईन उपस्थित होते. तर माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.

पवार म्हणाले, 1 जुलै हा दिवस शेती आणि सहकाराच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. याच दिवशी जिल्हा बँकेची स्थापना 1983 मध्ये झाली. खऱया अर्थाने शेतकऱयांसाठी ती महत्वाची बाब ठरली. जिल्हा बँकेची स्थापना झाल्यानंतर भाईसाहेब सावंत, शिवराम भाऊ जाधव यांनी जिल्हय़ात सहकार चळवळ रुजवली आणि त्यांच्या विचारधारेवरच जिल्हा बँक आजही चांगल्या पद्धतीने चालवली जात आहे. पतपुरवठा करून शेतकऱयांच्या पाठिशी राहणारी बँक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. यावरून या बँकेची वाटचाल अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे, हे लक्षात येते, असेही ते म्हणाले.

कोकणातील माणसांना कुणाचे पैसे द्यायचे असतील, तर झोप लागत नाही.डोक्मयावर ओझे ठेवायला जमत नाही. निश्चितच पैसे परत करण्याची ही चांगली सवय शेतकऱयांना आहे. म्हणूनच बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. बँकेचा कारभार अतिशय उत्तम प्रकारे चालला आहे. सभासदांचा बँकेवर विश्वास आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात आघाडीवर आहे. डाटा सेंटर सुरू करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब जिल्हा बँकेने केला आहे. इतर बँकांसाठी तो मार्गदर्शक ठरेल, असेही पवार म्हणाले.

बँकेचे आदर्शवत काम – पालकमंत्री उदय सामंत

राज्यात ज्या काही चांगल्या बँका आहेत, त्यातील सिंधुदुर्ग जिल्हा बँक एक आहे. जिल्हा बँक ज्यांनी उभारली, त्या शिवराम भाऊ जाधव यांना अभिप्रेत असलेले काम सुरू आहे. सर्व व्यवहार व सुविधा चांगल्या पद्धतीने सुरू असून आदर्शवत अशी बँक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सामंत यांनी यावेळी केले.

    ग्राहकांना चांगली सेवा देणारी बँक – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

सिंधुदुर्ग जिल्हा बँक ग्राहकांना चांगली सेवा देणारी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेने साखर कारखान्यासाठीही कर्जपुरवठा केला. ते कधीही विसरता येणार नाही. आता डाटा सेंटर सुरू करून नवीन पर्व सुरू केले आहे, असे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री पाटील यांनी काढले.

यावेळी आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनीही जिल्हा बँकेचे काम आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले. शेतकऱयांशी नाळ जोडणारी ही बँक आहे. राजकारणापलीकडे जाऊन सहकार क्षेत्रात बँकेने काम केले आहे. शेतकऱयांची उन्नती साधण्यात बँकेचा मोठा वाटा असल्याचे सांगत पुढील काळातही सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक मंडळ यावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

सहकारात गुणात्मक वाढ – सतीश सावंत

जिल्हा बँकेने संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानामुळे सहकार क्षेत्रात गुणात्मक वाढ केली आहे. बँकेने शैक्षणिक कर्ज सुरू केल्याने शेतकऱयाच्या मुलांना त्याचा फायदा झाला. 111 कोटीचे शेतीकर्ज एकटय़ा जिल्हा बँकेने दिले आहे. तर इतर बँकांनी मिळून 54 कोटी कर्जपुरवठा केला आहे. जिल्हा बँकेने सर्वसामान्य शेतकऱयांच्या हिताचे काम केले आहे. जिल्हा बँकेने अत्याधुनिक डाटा सेंटर सुरू केले असून पतसंस्था, अर्बन बँका यांना त्याचा फायदा मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

वर्धापन दिनानिमित्त अनेकांचा सत्कार

बँकेच्या वर्षापन दिनानिमित्त जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. गवळी, बजाज राइस मिलचे श्री. चव्हाण, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे श्री. देसाई तसेच जास्तीत जास्त भातपिक घेणारे शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. तर कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या दहा बालकांना मदत देण्यात आली. जांभुळ रोपांची लागवड आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आली.

Related Stories

तिवरे एसआयटी अहवालावर काहीच सांगता येत नाही!

Patil_p

रेशनकार्डला ओळखपत्राचा दर्जा,अनेकांमध्ये संभ्रमावस्था

Archana Banage

गुहागर आगारातच बस पंक्चर, वाहतूक कोंडीत भर

Patil_p

‘त्या’ पर्ससीन नेट नौकांचे परवाने रद्द करा!

NIKHIL_N

प्रिंदावणमध्ये झाड कोसळून महिला ठार

Patil_p

पोयरेत शाळकरी मुलाची आत्महत्या

NIKHIL_N
error: Content is protected !!