Tarun Bharat

डीसीसीच्या मुरगोड शाखेत 6 कोटींची चोरी

Advertisements

शटरपासून लॉकरपर्यंत बनावट चाव्यांचा वापर : सीसीटीव्हीचे डीव्हीआर लांबविले: रखवालदार होता गैरहजर, पोलीस तपास सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

मुरगोड, ता. सौंदत्ती येथील डीसीसी बँकेच्या शाखेत सहा कोटींची चोरी झाली आहे. रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या चोरीच्या या प्रकाराने संपूर्ण जिल्हय़ात एकच खळबळ माजली आहे. 4 कोटी, 37 लाख रुपये रोख रक्कम तसेच 3 किलो 148 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लांबविले आहेत.

रविवारी पहाटे 6 वाजता चोरीची घटना उघडकीस आली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील आदी वरिष्ट अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक (बीडीसीसी) मुरगोड शाखेत ही घटना घडली आहे. शाखा व्यवस्थापक प्रमोद यलीगार (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भादंवि 457, 380 कलमान्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून जिल्हय़ात झालेली आजवरची ही मोठी चोरी असल्याची नोंद झाली आहे. या चोरीच्या प्रकरणामुळे पोलीस दलासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे बनावट चाव्यांचा वापर करून शटर, दरवाजा, स्ट्राँगरुम व लॉकर उघडण्यात आले आहेत. त्यामुळे चोरटय़ांकडे बँकेच्या चाव्या कशा पोहोचल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात असून या प्रश्नांभोवती तपासाची चपे फिरविण्यात येत आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

शनिवार दि. 5 मार्च रोजी सायंकाळी 7.15 ते रविवारी सकाळी 6 या वेळेत ही घटना घडली आहे. चोरटय़ांनी लॉकरमधील 4 कोटी, 37 लाख, 59 हजार रुपये रोख रक्कम, 1 कोटी 63 लाख 72 हजार 220 रुपये किमतीचे 3 किलो 148.504 ग्रॅम सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर पळविले आहेत. एकूण 6 कोटी 1 लाख 37 हजार 220 रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे.

रखवालदार गैरहजर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुरगोड शाखेसमोर रोज रात्री रखवालदार असतो. या परिसरातील शेतकऱयांनी तारण ठेवलेले सोने व मोठय़ा प्रमाणात रोकड लॉकरमध्ये असल्यामुळे कायमस्वरुपी रखवालदार नेमलेला असतो. शनिवारी मात्र मंत्राप्पा वीरभद्रप्पा मंत्र्यान्नावर, राहणार मुरगोड हा रखवालदार कामावर आला नाही, अशी माहिती मिळाली आहे. याचाच फायदा घेत चोरटय़ांनी मोठा डल्ला मारला आहे.

यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता चोरटय़ांनी डीव्हीआर पळविले आहेत. त्यामुळे फुटेज सापडले नाही. बँक परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डीव्हीआरही पळविले

आश्चर्याची गोष्ट म्हणजे शटरपासून लॉकरपर्यंत बनावट चाव्यांचा वापर करून ही चोरी करण्यात आली आहे. कुठेही कुलूप तोडण्यात आलेले नाही. बँकेत सीसीटीव्हीचे कॅमेरे आहेत. चोरटय़ांनी डीव्हीआर पळविल्यामुळे सीसीटीव्हीतून धागेदोरे मिळविण्याचा मार्गही बंद झाला आहे. बँकेतील स्ट्राँगरुम व लॉकरच्या चाव्या कॅशियरकडे असतात. शिपाई व सेक्मयुरिटी गार्डकडे शटर व दरवाजाच्या चाव्यांचा संच असतो. अत्यंत नियोजनबद्धरित्या ही चोरी करण्यात आली आहे.

554 ग्रॅम दागिने वाचले

बँकेत एकूण 3 किलो 693.51 ग्रॅम सोने तारण ठेवण्यात आले आहे. यापैकी 3 किलो 148.504 ग्रॅम दागिने चोरटय़ांनी पळविले असून 554 ग्रॅम सोन्याचे दागिने व 4 लाख 30 हजार 996 रुपये रोकड बँकेतच राहिली आहे. यासंबंधी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांच्याशी संपर्क साधला असता मुरगोड शाखेत चोरीची घटना घडली आहे, ही गोष्ट खरी आहे. अधिकाऱयांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

देसूर जवळ अपघातात चिकोडीचा तरुण ठार

Patil_p

गो-शाळेतील गायींसाठी दत्तक योजना

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीतर्फे सामाजिक संघटनांना धान्याचे वितरण

Omkar B

वर्षा पर्यटनस्थळी पोलिसांकडून खबरदारी

Amit Kulkarni

लोकसेवा फौंडेशनतर्फे असोगा येथे बेल रोपांची लागवड

Amit Kulkarni

खोदाईसत्रामुळे अनगोळमध्ये वाहतूक कोंडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!