Tarun Bharat

डुकरांमुळे हैराण; शेतकऱयाचा गळफास घेण्याचा प्रयत्न

नंदगड ग्राम पंचायत आवारात प्रकार, ग्रामस्थांनी वेळीच वाचविले : डुकरांकडून शेतवाडीतील ऊस-भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

वार्ताहर /नंदगड

नंदगड (ता. खानापूर) येथे पाळीव डुकरांनी मोठय़ा प्रमाणात हैदोस माजवला आहे. घरांच्या परिसरात अस्वच्छता करण्याबरोबरच आता सदर डुकरांनी गावच्या लगत असलेल्या शेतवाडीतील ऊस व भातपिकात घुसून नुकसान करण्याचे सत्र सुरू केले आहे. या प्रकाराला शेतकरीवर्ग वैतागला असून शुक्रवारी नारायण निंगाप्पा पाटील या शेतकऱयाने ग्राम पंचायत आवारातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच ग्रामस्थांनी त्याला परावृत्त केल्याने तो यातून
बचावला.

नंदगड येथे गेल्या अनेक वर्षांपासून काही व्यक्तींनी डुक्करे पाळली आहेत. सदर डुक्करे गावातील घरच्या आसपास व परसात फिरतात. सांडपाण्यात लोळून दुर्गंधी करतात. त्यामुळे त्या ठिकाणी डासांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. शिवाय सदर डुकरे परसातील भाजीपाला पिकांबरोबरच बागायतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान करत आहेत. सदर डुकरे लहान मुलांवर हल्ले करीत आहेत. शिवाय कळपाने रस्त्यावरून फिरत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आता ही डुकरे गावच्या परिसरात असलेल्या भात व ऊस पिकात शिरून नुकसान करत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

ज्यांनी डुक्करे सोडलेली आहेत, अशा व्यक्तींना डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना देण्यासाठी ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीला यापूर्वीच अनेकवेळा कळवले आहे. परंतु ग्राम पंचायतीकडून म्हणावा तसा बंदोबस्त करण्यात आला नाही. त्यामुळे डुक्करे पाळणाराही मोकाट आहे. गतवषी एका शेतकऱयाने सदर डुक्करे पाळलेल्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार केली. परंतु त्याला तेवढय़ापुरतीच सूचना देऊन पाठवण्यात आल्याचे समजते. आता पुन्हा डुकरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. सदर डुकरांकडून भात व ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मुळातच पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱयांवर पुन्हा कुऱहाड कोसळली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी वैतागले
आहेत.

नंदगड जुन्या गावातील नारायण निंगाप्पा पाटील यांच्या शेतातील भातपिकाचे डुकरांनी नुकसान केले. त्यामुळे नारायण यांनी शुक्रवारी ग्राम पंचायतीला जाग आणण्यासाठी हातात दोरी घेऊन आपण गळफास घेणार असल्याचे ओरडत घरापासून ग्राम पंचायतीकडे धूम ठोकली. ग्राम पंचायत कार्यालय गाठले व आवारात गळफास घेण्यासाठी दोरीही बांधली. दरम्यान पाठीमागून अनेक नागरिक ग्राम पंचायतीकडे धावून आले आणि त्यांनी नारायण पाटील यांना गळफास घेण्यापासून परावृत्त केले.

 ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

नंदगड ग्राम पंचायत आवारात हा सर्व प्रकार सुरू असतानाच ग्राम पंचायतीकडे मात्र एकही सदस्य फिरकला नाही. अखेर ग्रामस्थांनीच गळफास घेणाऱया नारायण नागेंद्र पाटील यांना समजावून घरी नेले. डुकरांच्या त्रासाने शेतकरी गळफास घेण्याचा प्रकार नंदगडमध्ये घडल्याने ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षाबद्दल चर्चा सुरू होती.

Related Stories

विकेंड कर्फ्यूसाठी प्रशासन सज्ज

Amit Kulkarni

मानवी जीवनावर वास्तुशास्त्राचा प्रभाव

Patil_p

शिवभक्त अवलियाची घरासमोरील प्रांगणात प्रतिष्ठापना

Patil_p

पंपहाऊससाठी सपाटीकरणाच्या कामास शेतकऱयांचा विरोध

Patil_p

कंग्राळी ग्रा.पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर यांचे आदरातिथ्य करणाऱया सिद्धव्वा यांचे निधन

Patil_p