Tarun Bharat

डॅनियल पर्ल यांचा मारेकरी विश्रांतीगृहात

पाकिस्तानकडून अमेरिकेची पुन्हा फसवणूक – दहशतवादी अहमद शेखला स्वतःच्या कुटुंबीयांना भेटता येणार

वृत्तसंस्था /  रावळपिंडी

बायडेन प्रशासनाच्या धमकीनंतर पाकिस्तानने अमेरिकेचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या मारेकऱयाच्या सुटकेचा निर्णय बदलल्याचे दर्शविले आहे. अहमद उमर सईद शेख याला सर्वोच्च न्यायालयाने आता तुरुंगाऐवजी विश्रांतीगृहात ठेवण्याचा आदेश दिला आहे. या विश्रांतीगृहात त्याला सर्वप्रकारच्या सुविधा मिळणार असून तो कुटुंबीयांनाही भेटू शकणार आहे.

2002 मध्ये झालेल्या पर्ल यांच्या हत्येप्रकरणी शेख तुरुंगात होता. मागील आठवडय़ातच सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या मुक्ततेचा आदेश दिला होता. यामुळे नाराज अमेरिकेने इम्रान खान सरकारला सईदचा ताबा देण्यास सांगितले होते. या घडामोडीनंतर सिंध प्रांताच्या सरकारने शेखच्या सुटकेच्या विरोधात दाद मागितली होती. या याचिकेवर शेखला तुरुंगातऐवजी विश्रांतीगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

2002 मध्ये अटक झाल्यावर शेखला डेथ सेल (मृत्यू कोठडी)मध्ये ठेवण्यात आले होते. या कोठडीत मृत्युदंड ठोठावण्यात आलेल्यांना गुन्हेगारांना डांबले जाते. काही दिवसातच सईद आणि त्याच्या चार सहकाऱयांना जनरल बॅरकमध्ये हलविण्यात आले होते. तर आता त्याला आलिशान सुविधा असलेल्या विश्रांतीगृहात ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने शेख आणि अन्य गुन्हेगारांना कुटुंबीयांची भेट घेण्याची मंजुरी देत अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

न्याय मिळवून देऊ

इस्लामाबादमध्ये सोमवारी डॅनियल पर्ल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अमेरिका स्वतःचा नागरिक आणि वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियल पर्ल याला न्याय मिळवून देणारच. गुन्हेगारांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. पर्लच्या मारेकऱयांची सुटका सहन केली जाणार असल्याचे पाकिस्तान सरकारला बजावण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकिस्तानला तंबी

अमेरिकेचे नवे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांना फोनवरून तंबी दिली होती. पाकिस्तानला पर्लच्या मारेकऱयांना शिक्षा देता येत नसल्यास त्यांना अमेरिकेच्या हवाली केले जावे, असे ब्लिंकेन यांनी स्पष्ट केले होते.

आयएसआयकडून हत्येचा कट

2002 साली वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल पाकिस्तानात गेले होते. पर्ल हे अल-कायदा ही दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांच्यातील संबंधांची माहिती जमवत होते. त्यांनी अनेक पुरावे हस्तगत केले होते. पण याचदरम्यान त्यांचे अपहरण करण्यात आले, तेथे अनेक दिवस छळ केल्यावर पर्ल यांचे शिर धडावेगळे करण्यात आले होते. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान सरकारने चार जणांना याप्रकरणी अटक करण्याचे नाटक केले होते.

Related Stories

ब्रिटनमध्ये सप्टेंबरमध्ये वेगवान लसीकरणावर प्रशासन देणार भर

Patil_p

लिबियात सात भारतीयांचे अपहरण

datta jadhav

दफनभूमी परिसरात केला विवाह

Patil_p

कोरोनामुळे मृत्यू होण्यास अन्य आजार जबाबदार – संशोधकांचा दावा

Patil_p

अमेरिकत हिमवादळाचा तडाखा

Patil_p

हवाई दलाचे C-17 गुजरातमध्ये दाखल; 120 भारतीयांची सुटका

datta jadhav