मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची वरिष्ठ अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून यापुढेही कठोर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच ग्रामीण भागात संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ‘डॉक्टरांची वाटचाल खेडय़ांकडे’ हा उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी बेंगळूरमधील आपले शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असणारे सहा मंत्री आणि प्रमुख वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध जिल्हय़ांमधील कोरोना परिस्थितीची माहिती अधिकाऱयांकडून घेतली. तसेच कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानंतर प्रोटोकॉलनुसारच डिस्चार्ज देण्यात यावा. प्रोटोकॉलचे पालन वैद्यकीय अधिकाऱयांकडून होत आहे का, याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली.
ऍम्फोटेरिसीन-बी खरेदी करा!
ब्लॅक फंगसवरील परिणामकारी औषध असणारे ऍम्फोटेरिसीन-बी कोठेही उपलब्ध होत असेल तर ते त्वरित खरेदी करावेत. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांची वाटचाल खेडय़ांकडे हा उपक्रम यशस्वी होत आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱया अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा याकामी सदुपयोग करून घ्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजनपुरवठा सुरळीत करा. जिल्हा इस्पितळांमध्ये ऑक्सिजनचा साठा पुरेसा आहे का, याकडेही लक्ष द्या, अशी सूचनाही त्यांनी दिली.