Tarun Bharat

डॉ. देश प्रभुदेसाई यांच्यावर मित्र परिवाराचा निवडणूक न लढविण्यासाठी दबाव

भावना पक्षाच्या नेत्यांना कळविल्या

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव मतदारसंघात भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी नव्या चेहऱयाला संधी दिली होती व डॉ. जगन्नाथ उर्फ देश प्रभुदेसाई यांचे नाव जवळपास नक्की केले होते व त्यांनी आपल्या कार्याला देखील सुरवात केली होती. मात्र, मडगावात पक्षाचे संघटीत कार्य नसल्याने डॉ. प्रभुदेसाई यांच्या मित्र परिवाराने तसेच हितचिंतकांनी ही निवडणूक लढवू नये यासाठी जोरदार दबाव टाकला आहे. त्यामुळे डॉ. प्रभुदेसाई हे निवडणुकीत उतरण्याची शक्यता आत्ता जवळ संपुष्टात आली आहे.

डॉ. प्रभुदेसाई यांनी हल्लीच केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे तसेच अन्य पदाधिकारी गैरहजर राहिले होते व त्यांची गैरउपस्थिती नजरेत भर होती. त्याचवेळी पत्रकारांनी मडगावातील भाजपच्या गटबाजी संदर्भात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी श्रीपाद नाईक यांनी मडगावात भाजप एकसंघ असल्याचे सांगून वेळ मारून नेली होती.

डॉ. प्रभुदेसाई यांनी देखील मडगावातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेतल्या, तेव्हा त्यांना पक्षाचे कार्य संघटीत नसल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाणे कठीण असल्याचे त्यांच्या मित्र परिवाराला व हितचिंतकांना लक्षात येताच त्यांनी निवडणूक लढवू नये यासाठी दबाव टाकण्यास सुरवात झाली. त्यानंतर डॉ. देश प्रभुदेसाई यांनी पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांची भेट घेऊन आपल्या भावना कळविल्या. त्याच बरोबर मडगावात भाजपच्या संघटणेची कल्पना देखील दिली.

डॉ. प्रभुदेसाई यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की, पक्षाने उमेदवारीसाठी आपल्या नावाची शिफारस केल्याने सर्वांत अगोदर आपण पक्षाचे आभार मानतो. आज पक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. त्यातून आपल्या नावाची शिफारस करणे हीच आपल्यासाठी गर्वाची बाब होय. पण, मडगाव मतदारसंघात भाजप एकसंघ नाही हे आपल्याला कळून चुकले आहे. त्याची कल्पना आपल्या मित्र परिवाराला तसेच हितचिंतकांना असून आपण निवडणूक लढू नये यासाठी आपल्यावर दबाब आलेला आहे व आपण आपल्या भावना पक्षाच्या नेत्यांना कळविल्या आहेत.

पक्षाचे कार्यकर्ते असलेले पांडुरंग उर्फ भाई नायक यांनी तर उघडरित्या आपण मडगाव व फातोडर्य़ात भाजपला पाठिंबा देणार नसल्याची घोषणा केली आहे व त्यासंदर्भातील व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाले आहेत. पक्षाने मडगावात कुडतरीतील उमेदवार लादल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यामुळे पक्षात दुफळी असल्याचे उघड झाले होते.

पक्ष नवीन उमेदवाराच्या शोधात

डॉ. देश प्रभुदेसाई हे आत्ता निवडणूक लढविणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून पक्षाने नव्या उमेदवाचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. सद्या चित्रपट निर्माते व बिल्डर राजेंद्र तालक यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पूर्वी भाई नायक यांचा नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी उघडरित्या मडगाव व फातोडर्य़ातील उमेदवारांसाठी काम करणार नसल्याचे सांगितल्याने, पक्ष आत्ता त्यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता मावळली आहे. मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे व शर्मद पै रायतूरकर, नवीन पै रायकर यांची नावे देखील चर्चेत आहेत. यातून कुणाला उमेदवारी मिळते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related Stories

फोंडा नगराध्यक्षपदी अपूर्व दळवी निश्चित

Patil_p

कथाकथन स्पर्धेत जीव्हीएमच्या सावईवेरे शाळेचे यश

Amit Kulkarni

झवेरीच्या रेव्ह पार्टी सहभागाची न्यायालयीन चौकशी करावी

Omkar B

वास्को-पाटणा रेल्वे मार्गावर उद्यापासून ‘हमसफर एक्स्प्रेस’

Omkar B

रेल्वे सिग्नल समोरील फांद्या छाटण्याची जनतेची मागणी

Amit Kulkarni

मुख्यमंत्री सावंत यांनी आपली खुर्ची सांभाळण्यासाठी म्हादई विकली का ?

Amit Kulkarni