Tarun Bharat

डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव साजरा करणार

मराठी भाषिकांचा निर्धार : 15 रोजी कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी /बेळगाव

केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे हे 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा होणार आहे. बेळगावकरांनी या सोहळय़ात सहभागी व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले.

गुरुवारी सकाळी आरएलएस कॉलेजच्या सभागृहामध्ये याच्या नियोजनाबाबत मराठी भाषिकांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने ते बोलत हेते. व्यासपीठावर आमदार अनिल बेनके, बुडाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, निवृत्त प्राचार्य ए. ए. घोरपडे उपस्थित होते.

प्रारंभी महांतेश कवटगीमठ यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कार्याचा आढावा घेतला. बेळगावमध्ये केएलई हॉस्पिटलची उभारणी त्यांनी केली. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात स्थानिक पातळीवरून त्यांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचले आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेत अनेक राज्यांच्या मंत्र्यांसह पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बेळगावमध्ये कोरे यांनी अनेक कार्यांची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे येथे त्यांचा सत्कार होणे औचित्यपूर्ण असल्याचे कवटगीमठ म्हणाले.

केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा क्रीडांगणावर होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांबरोबरच राज्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.  आमदार अनिल बेनके यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कार्याचा आढावा घेऊन  अमृतमहोत्सव सर्वांनी उपस्थित राहून यशस्वी करायचा आहे, असे सांगितले.

यावेळी सोहळय़ाच्या नियोजनाबाबत निवृत्त प्राचार्य घोरपडे यांनी माहिती दिली. शिवाजी सुंठकर, बाळासाहेब काकतकर, विजय मोरे यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. बैठकीला सुनील अष्टेकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, शिवाजी हंगीरगेकर, प्रदीप अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर, शिवाजी हंडे, मनोज पावशे, नागेश देसाई, नारायण किटवाडकर यांच्यासह मराठी संस्थांचे पदाधिकारी आणि मराठी भाषिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

Patil_p

यमनापूर येथील ती जागा राखीव ठेवा

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

बुसेलोसिस लसीकरण मोहिमेला प्रारंभ

Amit Kulkarni

सलग दुसऱया दिवशी 536 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

कणकुंबी माउलीदेवी यात्रोत्सव आजपासून

Amit Kulkarni