Tarun Bharat

डॉ. सतीश नाईक अपूर्व संस्कृत सोहळा!

दरवर्षी सरणाऱया वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अनेकविध संमेलनांचे आयोजन केले जाते. काव्य, नाटय़, नृत्य, साहित्य, कौटुंबिक अशी अनेक संमेलने होतात. यावर्षी 2020 च्या नवीन वर्षाच्या प्रारंभी नागपूरच्या रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने धुरा घेतली ती, संस्कृत सोहळय़ाची. 10 ते 12 जानेवारी या त्रिदिवशीय प्राच्य विद्या परिषदेचा शताब्दी महोत्सव व सुवर्ण महोत्सवी संस्कृत अधिवेशन सोहळा या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता.

माझे कविकुलगुरु कालिदासाच्या ‘मेघदूता’चे अध्ययन पीएचडीच्या प्रबंध लेखनामुळे झाले होते. या मेघदूताचा जन्म या रामगिरीवर (रामटेक) झाला होता. श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या त्या दिव्यभूमीचे दर्शन घेण्याची खूप दिवसांची इच्छा या अधिवेशनाच्या निमित्ताने पूर्ण होणार म्हणून मी मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले.

नागपूरचे हवामान नेहमी विषम. उन्हाळय़ात चटके बसवणारे ऊन तर हिवाळय़ात हुडहुडी भरवणारी थंडी. त्यात 8, 9 जानेवारीला गारपीट झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता पण तरीही भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या विविध राज्यांतून सुमारे 1300 संस्कृतप्रेमी या सोहळय़ात सहभागी झाले होते.

शुक्रवार दि. 10 जानेवारी रोजी रेशीमबागच्या डॉ. हेडगेवार स्मारक परिसरातील सर्व वातावरण ‘नमोनमः सुप्रभातम् अपि कुशलम् अस्ति?’ या संस्कृत संवादांनी भारून गेले होते. नावनोंदणीनंतर ‘प्रसादगृहम्’मध्ये नाश्ता घेऊन कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटन समारंभ सुरू झाला. अतिशय भव्य अशा त्या सभागृहाचे व्यासपीठ विविध पुष्परचनांनी सुशोभित केले होते. या मंगलप्रसंगी माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, प्राच्य विद्या परिषदेचे अध्यक्ष गौतम पटेल, कार्यकारी सचिव सरोजा भाटे, कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी, स्थानिक सचिव मधुसूदन पेन्ना हे मान्यवर उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.

प्राच्य विद्या परिषदेतर्फे दर दोन वर्षांनी भारताच्या विविध राज्यांत अधिवेशन आयोजित करण्यात येतात. या 50 अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणांचा संग्रह असलेले ‘Orienta Legacy’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या चार भाषांमध्ये साहित्य, न्याय, वेदांत दर्शन, ज्योतिष, योग, शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील संशोधनपर 111 ग्रंथांचे डिजिटल प्रकाशनही झाले. या प्रकाशनाचे आकर्षण ठरली ती या ग्रंथांची दिंडी. सभागृहात टाळ-मृदंगांच्या गजरात या गंथांची दिंडी फिरविण्यात आली. प्रेक्षकांनी टाळय़ांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. ग्रंथ प्रकाशनाची ही एक वेगळी पद्धत मनाला भावली. यावेळी उपराष्ट्रपतींनी ‘संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. त्यामुळे संस्कृत असो, योगाभ्यास असो, या सर्वांकडे जाती-धर्माच्या चष्म्यातून न पाहता ज्ञान व आरोग्य संवर्धन या दृष्टिकोनातून पाहावे. माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे. इंग्रजीतूनच शिक्षण घेतल्यास माणूस मोठय़ा पदापर्यंत जाऊ शकतो, हा समज दूर करण्याची गरज आहे’, असे उद्बोधक विचार व्यक्त केले.

नागपूर येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना ही माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक व माजी खासदार स्व. डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या प्रयत्नांतून झाली, याचे स्मरण श्री. गडकरी यांनी करून दिले. भारतीय प्राच्य विद्येचा व संस्कृतचा अभ्यास व गौरव इतर देशांमध्ये विशेषत्वाने केला जात आहे. भारतीय संस्कृती ही मूल्याधिष्ठित परिवार पद्धतीवर उभी आहे. भारताचे मूल्याधिष्ठित विचार व ज्ञान खजिना अनमोल असून तो पुढील पिढय़ांमध्ये संक्रमित करण्यात संस्कृत विद्यापीठे आघाडीवर आहेत, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अखिल भारतीय प्राच्य विद्या परिषदेचा 100 वर्षांच्या इतिहासाचा वेध घेणाऱया लघुपटाचे प्रदर्शनही माहितीपूर्ण ठरले. व्यंकय्या नायडू यांचा तैलचित्र व शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

उद्घाटनाच्या दुसऱया सत्रात परिषदेच्या शताब्दी समारोहानिमित्त मुंबई पोस्ट मास्तर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले. संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार, विकास तसेच संशोधनासाठी आयुष्यभर सेवा केली, त्या संस्कृत पंडितांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वेदभाष्यकार श्री. देवीसहाय पाण्डेय, व्याकरणशास्त्र पंडित कंदाडे रामानुजाचार्य, न्यायवेदान्त पंडित मणिशास्त्री द्रविड यांना ‘महाकवी कालिदास संस्कृतव्रती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार कालिदास विश्वविद्यालयाने पुरस्कृत केले.

दुपारच्या सत्रात संस्कृत अभ्यासकांनी विविध विषयांवर संशोधन करून तयार केलेल्या शोधनिबंधांचे वाचन विविध दालनातून करण्यात आले. या शोध निबंध वाचनात अनेक तरुण अभ्यासकांचा समावेश होता. अधिवेशनातही तरुण संस्कृत अभ्यासक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हे चित्र पाहिल्यावर मनात प्रश्न उभा राहिला, संस्कृतला ‘मृतभाषा’ का म्हटले जात आहे. जिचा अभ्यास व वापर देश-विदेशात जोमाने केला जात आहे, ती आमची मातृभाषा आहे. आईला जसं गृहीत धरलं जातं तसंच या मातृभाषेलाही गृहीत धरलं आहे. ती सर्वांत पूर्णपणे सामावलेली आहे. म्हणून तिला वेगळं काढणंच शक्य नाही. ती आमच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. म्हणूनच आज तरुणवर्ग पुन्हा या ज्ञानाच्या मूळ स्रोताकडे वळलेला दिसत आहे.

शास्त्रार्थ परिषद फक्त ग्रंथातूनच वाचली होती पण तिचं प्रत्यक्ष दर्शन इथं झालं.  पं. मणिशास्त्री द्रविड यांच्या अध्यक्षतेखाली खंडन-मंडनातून शास्त्रार्थ परिषद रंगली. न्याय, ज्योतिष, व्याकरण, दर्शनशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा झाली. प्रो. नारायण पुजारी यांनी ‘द्वैतöअद्वैत सिद्धांत’, प्रो. व्रजभूषण ओझा यांनी ‘व्याकरण’, पं. गणेशजी भट यांनी ‘अद्वैत वेदांत’ विषयांवर आपले विचार मांडले. यदुपती हा बाल अभ्यासक आकर्षण केंद्र ठरला. त्याने ‘नवन्याय’ विषयावर मतप्रदर्शन केले. प्रो. मधुकर यांनी या परिषदेला पाच लाख रुपयांचा मदतनिधी अर्पण केला.

या बौद्धिकाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांनी पण रंगत आणली. मुंबईच्या डॉ. नंदापुरेचा व त्यांच्या सहकाऱयांनी कवी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ कलाकृतीवर भरतनाटय़म् सादर केले. ऋतुनुसार निसर्गाचे बदलणारे रुप, त्यांचा पशु-पक्ष्यांवर होणारा परिणाम भावमुद्रांच्या माध्यमातून आविष्कृत केला. बंगळूर येथील अभिनव इन्स्टिटय़ूटच्या निरुपमा राजेंद्र ग्रुपने कवी कालिदासाच्या ‘मालाविकाग्निमित्रम्, शाकुंतलम्, रघुवंशम्’ या साहित्यातील प्रसंगांवर भावपूर्ण नृत्य सादर केले. निरुपमा राजेंद्र यांच्या पदलालित्याच्या जुगलबंदीने रसिकांची दाद मिळविली. दोहा येथून आलेले एम.पी. राधाकृष्णन यांचे ‘प्रतिमा’ नाटक, क्षीरसागर यांचे ‘स्त्रियश्चरितम्’ हम्पीहोळी दाम्पत्याची ‘आम्रपाली’ नृत्यनाटिका अशा विविध संस्कृत कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने रिझविली.

या अधिवेशनाचे आणखी एक खास वैशिष्टय़ म्हणजे राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन. दिल्ली, हैद्राबाद, मुंबई, कोलकाता, पुणे, नागपूर येथील नामवंत प्रकाशकांनी 20-25 दालनातून दुर्मीळ पुस्तके उपलब्ध केली होती. त्याचबरोबर एका दालनात संस्कृत ध्येयवाक्ये छापलेले टी-शर्ट्सही विक्रीला होते. या तीन दिवसात सकाळी 9 पासून रात्री 8 पर्यंत विविध विभागांतून विविध कार्यक्रम चालू होते. ‘देणाऱयांचे हात हजारो’ होते पण आमचे हात दोनच होते. या सर्वांचा आस्वाद थोडय़ाफार प्रमाणात घेता आला, हेही नसे थोडके! समारोपाच्या सत्रात कवी संमेलनही खूप छान रंगले. उद्घाटक ज्ञानवृद्ध ज्येष्ठ कवी पं. रमाकांत शुक्ल व अध्यक्ष पं. राजेंद्र मिश्रा यांनी खणखणीत आवाजात कविता गायिल्या. राधावल्लभ त्रिपाठी, नंदा पुरी, लीना रस्तोगी, मधुसूदन पेन्ना अशा अनेक कविवर्यांनी गायिलेल्या रचनांचा आस्वाद घेत रसिक काव्यानंदात न्हाऊन निघाले.

दि. 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील ‘हितवाद’ या दैनिकाचे संपादक डॉ. विजय फणशीकर यांच्या व्याख्यानातून विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार ऐकायला मिळाले. पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, सत्यव्रत शास्त्री, प्रो. राधावल्लभ त्रिपाठी या मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाच्या अभ्यासकांनी पाली भाषेत प्रार्थना सादर केली. सत्यव्रत शास्त्री यांना ‘प्राच्य विद्याभास्कर’ आणि गौतम पटेल यांना ‘सनातनविद्या भास्कर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या तीन दिवसांच्या सोहळय़ाचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले ते, कालिदास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली! ‘विद्या विनयेन शोभते’ या सुक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वरखेडी सर! संपूर्ण सोहळय़ात अथपासून इतिपर्यंत ते स्वतः लक्ष देत होते. एवढे उच्च विद्याविभूषित पण अहंमन्यता नाही. उलट विद्यापीठातील इतर प्राध्यापकांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणण्याची त्यांची वृत्ती खरंच कौतुकास्पद वाटली. डॉ. मधुसूदन पेन्ना, डॉ. पराग जोशी, डॉ. दिनकर मराठे, डॉ. रेणुका बोकारे हे सर्वच सेवाव्रती. त्यांच्या प्रेरणेने, उत्साहाने या अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी अविरत कार्यमग्न होते. प्रत्येकजण नेमून दिलेले काम चोखपणे हसतमुखाने करीत होता. डॉ. मृदुला काळे व त्यांच्या विद्यार्थिनी इतक्या थंडीतही सकाळपासून अभ्यागतांचे स्वागत करीत होत्या. चौकशीसाठी येणाऱया प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करीत होत्या.

कविकुलगुरु कालिदास विद्यापीठामुळे नागपूर संस्कृतचे माहेरघरच वाटले. इथे वाहणाऱया संस्कृत मंदाकिनीत मनसोक्त न्हाऊन निघाले. नवीन वर्षातील हा संस्कृत सोहळा माझ्या जीवनातील एक अपूर्व संस्मरणीय सोहळा ठरला.

– डॉ. गीता काळे

पर्वरी-गोवा  (9881774870)

Related Stories

लक्झरी घरे झाली स्वस्त

Patil_p

मागणी घटली, किमतीवर वाढता दबाव

Patil_p

सातारा : १५० जणांचे अहवाल आले निगेटिव्ह ; तर ७७ जण विलगीकरण कक्षात दाखल

Archana Banage

रक्तगट

Patil_p

याला म्हणतात ‘प्रजा’सत्ताक

Patil_p

भावनांपेक्षा भाववाढीकडे लक्ष द्या!

Patil_p