Tarun Bharat

डॉ. सुरेश आमोणकरांच्या पार्थिवावर आमोणेत अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री, आयुषमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

आमोणे / वार्ताहर

आमोणे गावचे सुपुत्र, गोवा राज्याचे माजी आरोग्यमंत्री व गोवा प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश कुसो आमोणकर यांच्या पार्थिव देहावर, भंडारवाडा आमोणे येथील स्मशानभूमीत काल मंगळवारी दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. डॉ. आमोणकर यांची द्वितीय कन्या कु. युती आमोणकर हिने पुरोहित ब्रह्मण परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थिवाला अग्नी दिला.

 आमोणे भंडारवाडा येथील स्मशानभूमीत डॉ. आमोणकर यांच्या पार्थिव शरीरावर मंत्रोच्चाराद्वारे अंतिम संस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, साखळीचे माजी सरपंच प्रवीण ब्लेगन, नगरसेविका सौ. ज्योती ब्लेगन, नगरसेवक रियाज खान, समाजसेवक नरेश दातये, आमोणेचे सरपंच काशिनाथ म्हातो आणि सरपंच संदेश नाईक आमोणे तसेच अन्य ठिकाणच्या प्रतिष्ठीत नागरिकांनी स्मशानभूमीत डॉ. आमोणकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

 आमोणे या जन्मगावी अंत्यसंस्कार

 डॉ. सुरेश आमोणकर यांना 22 जून रोजी मडगाव कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काल रात्री त्यांच्या निधनाची वार्ता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कळविल्यानंतर या भागात शोककळा पसरली. डॉ. आमोणकर यांच्या पार्थिवावर आमोणे या त्यांच्या जन्मगावी अंतिम संस्कार करण्यासंबंधीच्या त्यांच्या कुटुंबियांच्या विनंतीस सरकारने मान्यता देण्यात आल्यानंतर भंडारवाडा येथील स्मशानभूमीत महामारीच्या सर्व नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.  आमोणे सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल नाईक, संदेश नाईक, संजय आमोणकर, देवानंद म्हातो, नारायण सावंत, आदी मंडळींनी तयारी केली. असंख्य कार्यकर्ते हितचिंतक मंडळींनी डॉ. आमोणकर यांचे अंतिम दर्शन घेतले.

 डॉ. आमोणकर हे एक नम्र स्वभावाचे व सामाजिक जिव्हाळा जपणारे आदर्श नेते होते, अशा शब्दांत आयुषमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनीही अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की डॉ. आमोणकर यांचे गोव्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी लोककल्याणाच्या योजना राबविल्या. तसेच एक आदर्श राजकारणी व समाजसेवक अशी त्यांची ओळख होतीच. डॉक्टर म्हणूनही घराघरात त्यांची चांगली ओळख होती, असेही ते म्हणाले.

Related Stories

कळंगूट येथे नायजेरियनकडून पाच लाखांचे कोकेन जप्त

Amit Kulkarni

1961 चा रेकॉर्ड मोडण्यास मान्सून सज्ज

Patil_p

गौतम सिरसाट यांच्या लघुपटाची इफ्फीत निवड

Patil_p

वीज आंदोलनाची कोपरा बैठक वाळपई पोलिसांनी उधळली

Patil_p

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

GAURESH SATTARKAR

यंदा स्वरमंगेश संगीत व नृत्य महोत्सव होणार नाही

Patil_p