प्रतिनिधी/ सातारा
प्रत्येकालाच नैसर्गिक सौंदर्याची भुरळ असते, त्यामुळे अनेकजण पर्यावणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याकरीता लांब पल्ला गाठतात. सध्याच्या वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा नैसर्गिक सौंदर्यावर ही तितक्याच प्रमाणात होत आहे. त्यामुळे सध्याच्या पिढीला अनेक प्रत्यक्षात पहाण्यात येत नाही. असाच एक प्रकार म्हणजे काजवा महोत्सव, अनेकांनी काजव्यांसंबंधी केवळ ऐकुन माहिती होती. पण सातारकरांनी या लुकलुकणाऱया काजव्यांचा महोत्सव प्रत्यक्षात अनुभवला आहे. डोळय़ांचे पारणे फेडणारे हे काजवे पाहुन अनेकांच्या अंगावर खरोखरच शहारे आले असल्याचे अनुभव व्यक्त केले.
प्रतिवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा पावसाळय़ाच्या सुरुवातीस हे लुकलुकणारे काजवे पहावयास मिळतात. साताऱयातील कास, बामणोली या पश्चिम भागात अशाच प्रकारच्या काजव्यांच्या महोत्सवाचा अनुभव साताऱयातील काही निसर्ग प्रेमींना अनुभवता आला आहे. येथील राण भैरी ग्रुपचे धनंजय अवसरे, हेमंत लंगडे, प्रशांत इनामदार व प्रज्ञा अवसरे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.
साताऱयातील जवळपास 40 हुन अधिक निसर्गप्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती. या दरम्यान पर्यावरणाला कोणतीही हाणी होणार नाही याची दक्षता घेत हे काजवे पाहण्यात आले. एकाच वेळी असंख्य असे आकाशात तसेच परिसरात लुकलुकणारे काजवे, हे येथे उपस्थित असणाऱया अनेकांनी पहिल्यांदाच पाहिले होते. काजवे पाहुन जणु काही रंगिबेरंगी विद्युत रोषणाई आहे की काय असा भास वाटत असल्याचे येथे उपस्थित निसर्गप्रेमींनी सांगितले. जंगल परिसरात न जाता डांबरी रस्त्यावरूनच हा काजव्यांच्या महोत्सवाचा लाभ यावेळी उपस्थित नागरिकांनी घेतला.