Tarun Bharat

तमाशाचा फड रंगू लागला… ऑकेस्ट्रालाही अच्छेदिन

दोन वर्षाच्या खंडानंतर गावोगावच्या सुपाऱया मिळू लागल्या,कलाकारात चैतन्य

संग्राम काटकर / कोल्हापूर

कोरोनामुळे गेली 2 वर्षे हालाखीचे दिवस काढलेल्या तमाशा व ऑकेस्ट्रा पथकांना आता अच्छेदिन येऊ लागले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पथकांकडे गावोगावी होत असलेल्या उरुस, यात्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंडळांकडून सुपाऱया येत आहेत. त्यामुळे पैशाअभावी हिरमसून गेलेल्या कलाकारांमध्ये आनंदाची लहर आली आहे. तमाशाच्या रंगीत तालमीत घुंगरु तर ऑकेस्ट्रामधील वाद्ये आता वाजू लागली आहे. सुपारीनुसार पथके वाद्यवृंदासह गावोगावी नाईट-शो करु लागले आहेत. कलाकारांनाही नाईट-शोमधून चार पैसे मिळूही लागले आहेत. आता लवकरच गावोगावच्या उरुस-यात्रांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नाईट-शोचे निमंत्रण देण्यासाठी मंडळांची पाऊले तमाशा, ऑकेस्ट्रांकडे वळणार आहेत.

रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीचे जनत, संवर्धन करण्याची जबाबदारी गेल्या अनेक दशकांपासून तमाशा व ऑकेस्ट्रा पथके पार पडत आहेत. नाईट-शोवेळी हुल्लडबाज प्रेक्षकांनी टोमणे मारले तरी ते सहन करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही पथके कलाकार शो करत असतात. कार्यक्रमासाठी मिळणाऱया पैशातूनच पथक मालक व कलाकारांचा उदरनिर्वाह होत असतो. एका शोसाठी कलाकारांना 800 पासून 2500 रुपयांपर्यंत पैसे मिळत होते. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याने गेल्या दोन वर्षापूर्वी सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे कार्यक्रमांच्या सुपाऱया येणे बंद झाले. शिवाय कोरोना यायला आणि गावांच्या उरुस, यात्रांना सुरुवात व्हायला अशी ही विचित्र परिस्थिती निर्माणही झाली होती. तेंव्हापासून पुढील 23 महिन्यात कोरोनाच्या 3 लाटा आल्या आणि गेल्या. पण तरीही पथकांना कार्यक्रम करण्यास परवानगी मिळाली नाही. परिणामी पथकांच्या दैनंदिन रंगीत तालमीही थांबल्या. कार्यक्रम होणेच बंद झाल्याने कलाकारांचा आर्थिक स्त्रोतच थांबला. घरगुती कामांसाठी काढलेली कर्जे कशी फेडायची, असा प्रश्नही उभा राहिला. तमाशा, ऑकेस्ट्राची घडीच विस्कटली. तब्बल 23 महिने ही घडी विस्कटलेली राहिली. शिवाय तमाशासाठी ज्या कलाकारांना पगारावर नेमले असते त्यांना पगार देताना पथक मालकांना कसरत करावी लागली आहे.

कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आल्याने गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. त्यामुळे तमाशा व ऑकेस्ट्रा पथकांकडे उरुस, यात्रांमध्ये कार्यक्रम करण्यासाठी सुपाऱया येऊ लागल्या. सोबत गाणी म्हणण्याच्या, नृत्याच्या आणि लघूनाटिकाच्या रंगीत तालमीही वेग घेतला. गेल्या पंधरा दिवसांत पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकात तमाशा व ऑकेस्ट्राचे नाईट-शो देखील झाले. त्यामुळे पथकांच्या मालकांसह कलाकारांनाही चार पैसे मिळू लागले आहेत. गुढीपाडवा झाल्यानंतर गावोगावच्या उरुस-यात्रांना प्रारंभ होऊन त्यात कार्यक्रम करण्यासाठी सुपाऱया येऊ लागल्या तर मात्र पथकांना गतवैभव लाभणार हे निश्चित आहे.

गेल्या दोन आठवडय़ापासून शोच्या सुपाऱया येत असल्या तरी पैशावरुन बारगेनिंगचा करावे लागले आहे. सध्या महागाईमुळे ऑकेस्ट्रा पथकाला शोसाठी 80 हजार ते 1 लाख रुपये मिळाले तरच परवडणार आहे. कलाकारही शोचे पैसे वाढून मागत आहेत. याचा शो आयोजकांनी विचार करणे गरजेचे आहे. – मुकुंद सुतार (झंकार ऑकेस्ट्रा)

तमाशाच्या एका शोसाठी 35 ते 40 हजार रुपयांची सुपारी घेतली जाते. महिला आणि त्यांच्या आदाकारीवर तमाशाचे प्रसिद्धी ठरत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मात्र महिला कलाकारांना फार आर्थिक ताण सोसावा लागला. हा ताण भरुन निघायचा असेल तर मात्र तमाशाच्या सुपारीत आयोजकांना वाढ करावी लागले. रेखा पाटील-कोल्हापूरकर (रेखा पाटील-कोल्हापूरकर लोकनाटय़ तमाशा मंडळ)

Related Stories

मँचेस्टरनगरी इचलकरंजी राज्यातील २८ वी महापालिका: राज्य सरकारची घोषणा

Rahul Gadkar

कर्नाटक बिटकॉइन घोटाळा: भाजपने नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

Abhijeet Khandekar

शिवसेनेचा रास्ता रोको, कर्नाटकच्या वाहनांना काळे फासले

Abhijeet Khandekar

शिक्षकांचे बाह्य मूल्यमापन थांबवा अन्यथा आंदोलन

Archana Banage

पानसरे हत्या प्रकरण : अंदूरे व कुरणेच्या जामीन अर्जावर २१ ऑगस्टला सुनावणी

Archana Banage

‘रासप’च्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!