Tarun Bharat

तरूणांच्या नवसंकल्पनेतूनच देश आत्मनिर्भर होईल

प्रतिनिधी / कोल्हापूर

भारतात प्रशिक्षित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व तज्ञांची मजबूत फळी साकार होण्याची गरज आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन्ही आवडीच्या विषयाचे शिक्षण घेता येते. त्यामुळे वैज्ञानिक क्षेत्र सध्या प्रगतीपथावर आहे. विज्ञान क्षेत्रातील वाढत्या संशोधनाचा जोरावर सर्व क्षेत्रात आघाडी घेतली आहे. तरूणांच्या नवसंकल्पनेतूनच देश भारत आत्मनिर्भर बनेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या 58 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. ऐश्वर्या मोरे यांना राष्ट्रपती सुवर्णपदक तर स्वाती पाटील यांना कुलपती सुवर्णपदक जाहीर केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी ज्ञानदंड हातात घेवून कुलगुरू कार्यालय ते राजर्षी शाहू सभागृहापर्यंत मिरवणूक काढली. या ऑनलाईन समारंभात सुमारे 3500 जण सहभागी झाले.

डॉ. साळुंके म्हणाले, नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्या दृष्टीने वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत, संयुक्तिकता व मूल्य असली पाहिजेत. जागतिक समस्यांचे निराकरण शाश्वत उपाययोजना पाहिजेत. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना ,बौद्धिक चपळता वाढवणे महत्त्वाचे आहे. एखादी नवीन संधी येते, तेंहा ती मिळवण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहता. तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करण्यासाठीही तयार असता. विद्यार्थी म्हणून मिळवलेले शिक्षण आणि ज्ञानावर आधारित स्वतःचा मार्ग तयार केला पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, तेथे प्रामाणिकपणा आणि बांधिलकी या दोन गुणांच्या बळावर सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहावे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी म्हणाले, भारताची वाटचाल आणि प्रगतीमध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हा देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे. सध्या जग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यावर उपाय योजना युवा पिढीच सक्षमपणे करु शकते. आयुष्यात प्रत्येक कामात सर्वोत्तम ध्यास असला पाहिजे. दर्जेदार उपक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी आग्रही असले पाहिजे. शिवाजी विद्यापीठाने केलेली प्रगती राज्यात अव्वल आहे. भविष्यातही विद्यापीठाने आपली कामगिरी उंचावत अधिकाधिक लौकिक प्राप्त करावा.

कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, संशोधनातून उद्योगनिर्मिती, नाविन्यपूर्ण व अभिनव संशोधन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाच्या जोरावर विद्यापीठाने यशस्वी वाटचाल केली आहे. प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. तृप्ती करेकट्टी आणि धैर्यशील यादव यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. एम. व्ही. गुळवणी, डॉ.आर. जी. सोनकवडे, डॉ. ए. ए. गुरव, डॉ. पी. टी. गायकवाड, अजित चौगुले, डॉ. अलोक जत्राटकर आदी उपस्थित होते.

Related Stories

ऐतिहासिक दसरा चौकात रंगला `शाही दसरा’

Archana Banage

आस्मानी संकटात मदतीचा हात : श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी

Archana Banage

छत्रपती संभाजी महाराज’ नामकरणच अधिकृत करा

Archana Banage

Kolhapur : आरे- सावरवाडी जवळील नदीपात्रात आढळला बेवारस मृतदेह

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : अंधार रात्री सात तासांचा थरार… अन् अथक प्रयत्नातून अखेर त्या तिघांची जंगलातून सुटका

Archana Banage

बोलोली येथील अपघातात सातार्डेची महिला जागीच ठार

Abhijeet Khandekar