Tarun Bharat

…तर आणखी उचित सांगता झाली असती!

मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीवर अनिल कुंबळे यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीबाबत कोणत्याही प्रकारची खंत नाही. पण, त्याची आणखी उचित सांगता झाली असती, असे त्यांना आवर्जून वाटते. 49 वर्षीय अनिल कुंबळे यांनी 2017 चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या मतभेदानंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणे पसंत केले होते.

‘वास्तविक, एका वर्षाच्या कालावधीत आम्ही अतिशय उत्तम प्रदर्शन साकारले होते. अतिशय उत्तम योगदान देत असल्याचे समाधान मला होते. आजही मला त्या कारकिर्दीबद्दल काहीही खंत वाटत नाही. अर्थात, तेथून पुढे जात असताना देखील मी आनंदीच होतो’, असे कुंबळे माजी झिम्बाब्वे क्रिकेटपटू पोमी बांग्वाशी ऑनलाईन सत्रात बोलताना म्हणाले.

‘मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची सांगता आणखी उत्तम, आणखी सरस पद्धतीने करता आली असती. पण, तरीही ठीक आहे. प्रशिक्षक या नात्याने जे काही करणे शक्य होते, ते करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. पण, प्रशिक्षक ही अशी व्यक्ती असते, ज्यांना केव्हा तरी पुढील प्रवासाकडे आगेकूच करावीच लागते. वर्षभराच्या कालावधीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकलो, याचा मला मनस्वी आनंद आहे’, असे कुंबळे यांनी पुढे नमूद केले. ‘प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली, त्याचा मला आनंद आहे. तो वर्षभराचा कालावधी मोहित करणारा होता. भारतीय संघासमवेत प्रशिक्षक या नात्याने व्यतित केलेला वेळ नेहमी स्मरणात राहील’, असे कुंबळे यावेळी म्हणाले.

‘जंबो’ या टोपण नावाने ओळखले जाणारे अनिल कुंबळे यांनी एक वर्ष प्रशिक्षकपद सांभाळले, त्यावेळी भारतीय संघ विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवण्यात कमालीचा यशस्वी ठरला. त्या कालावधीत झालेल्या 17 कसोटी सामन्यात भारताला केवळ एकच पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय, चॅम्पियन्स चषक स्पर्धेत संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. अर्थात, त्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कुंबळे यांचे कर्णधार विराटशी मतभेद चव्हाटय़ावर आले आणि कुंबळे यांनी त्यावेळी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन बाजूला होणे पसंत केले होते.

अव्वल फिरकीपटू राहिलेल्या कुंबळेंनी आपल्या कारकिर्दीत भारतीय संघातर्फे 132 कसोटीत 619 व 271 वनडेत 337 बळी घेतले. सध्या आयपीएल स्पर्धेत ते किंग्स इलेव्हन पंजाब प्रँचायझीचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Related Stories

सुपर सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, मेरी कोम स्पर्धेबाहेर

Amit Kulkarni

कर्णधार अगरवालचे शानदार द्विशतक

Amit Kulkarni

डेव्हिस चषक स्पर्धेत व्हिसिनीचे सामन्यांचे शतक

Patil_p

भारताचा स्वप्नभंग, जर्मनी अंतिम फेरीत

Patil_p

न्यूझीलंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Omkar B

कोरोनाबाधित मिल्खा सिंग इस्पितळात

Patil_p