फोंडय़ातील परिसंवादात उमटला आशावादी सूर : अ.का. प्रियोळकर स्मृतीदिन कार्यक्रम
सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा
ई माध्यम हे विविध विषयांवरील योग्य माहिती देणारे प्रभावी माध्यम असून ताज्या घडामोडी व्यापक जनमुदायापर्यंत क्षणात पोहोचविण्याची किमया या माध्यमाने साधली आहे. कोटय़वधी रुपयांचे व्यवहार ई माध्यमाच्या साहाय्याने घरबसल्या करता येऊ शकतात. त्यामुळे या तत्पर अशा माध्यमाचा वापर मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी केल्यास मराठीच्या वृद्धीसाठी ते वरदानच ठरेल, असा आशावाद दै. तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी व्यक्त केला.
मराठी राजभाषा समिती, प्रतिभा प्रेन्ड्स सर्कल, बोरी आणि प्रागतिक विचारमंच, गोवा यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘ई माध्यमे व मराठी भाषेसमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात अ. का. प्रियोळकर स्मृतिदिन कार्यक्रमानिमित्त हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. साहित्यिक डॉ. अशोक मणगुतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात माजी आमदार व मराठीप्रेमी मोहन आमशेकर यांचा सहभाग होता.
सागर जावडेकर पुढे म्हणाले, विधानसभेतील कामकाज आज ई माध्यमामुळे घरबसल्या बघायला मिळते. लोकांच्या मतपरिवर्तनासाठी किंवा राजकीय पक्षांच्या भवितव्यासाठीही या अगोदर ई माध्यमांचा प्रभावी वापर झालेला आहे. त्यामुळे अशा माध्यमांचा सदुपयोग झाल्यास ते योग्य आहे. मराठीतील सगळे ग्रंथ, सगळय़ा प्रतिभावंतांची माहिती, व्याख्याने, गाणी हे सर्वच आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्षणात उपलब्ध होत आहे. ई माध्यम आपल्या हाताशी नसते तर कोरोनाच्या काळात माणसे घरात राहून भ्रमिष्ट झाली असती. मराठीच्या विकासासाठी या माध्यमांचा अधिकाधिक उपयोग व्हायला हवा. तसे झाल्यास मराठी भाषेपुढील ते आव्हान ठरणार नाही.
मोहन आमशेकर म्हणाले, देवस्थान, सहकार खाते, ग्रामपंचायत, पोलीस खाते या सगळय़ांचे व्यावहार मराठीतून होत आहेत. काळ बदलला तशी शिक्षणपद्धती बदलत गेली. मराठी शिक्षणाचा ओघ कमी झाला. परिणामी कार्यालयीन दस्तऐवजांची जागा इंग्रजीने घेतली. म्हणून ई माध्यमांना दोष देता येणार नाही. मराठी भाषेतर शिक्षणाच्या प्रभावामुळे मराठी भाषेच्या प्रसारावर आणि विकासावर परिणाम झाला. मराठी भाषिकांचे अंतरंग हे मराठी माणसापर्यंत योग्य तरेने पोहोचविण्याचे कार्य घडल्यास ई माध्यम हे मराठी भाषेसाठी वरदानच ठरेल, असा आशावाद आमशेकर यांनी व्यक्त केला. समाजाची वैचारिक भूक भागविण्यासाठी मराठीचा सर्रास वापर ई माध्यमातून झाल्यास या माध्यमांचे अस्तित्त्व मराठीसाठी फलदायी ठरेल, असे मतही त्यांनी मांडले.
आपल्या अध्यक्षीय विश्लेषणात डॉ. अशोक मणगुतकर यांनी ई माध्यमांमुळे विविध घटकांचे बाजारीकरण झाल्याने मूळ उद्देश बाजूलाच राहिल्याचे मत मांडले. गैर गोष्टींसाठीही या नवीन माध्यमांचा वापर होत आहे. हा अतिरेक होता कामा नये. मराठीच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी ई माध्यमांची आव्हाने स्वीकारली पाहिजेत. मराठी भाषेतील वैविद्यपूर्ण आणि सर्वमान्य साहित्याचा ई माध्यमाद्वारे प्रसार आणि प्रचार शक्य असल्याचे डॉ. मणगुतकर म्हणाले. एकूणच तिन्ही वक्त्यांनी आशावादी सूर व्यक्त केला. ई माध्यमांचा योग्य वापर झाल्यास मराठी भाषेला त्यापासून कुठलाच धोका संभवत नसल्याचे मत या परिसंवादातून व्यक्त झाले. गो. रा. ढवळीकर यांनी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन तर जयवंत आडपईकर यांनी आभार मानले.