Tarun Bharat

…तर काँग्रेसचे पतन निश्चित

ज्येष्ठ काँग्रेसमन मारियो पिंटो, विजय पै यांचा दावा

प्रतिनिधी /पणजी

काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड सावळा गोंधळ सुरू असून कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही, जो तो स्वतःच्या मर्जीनुसार वावरून निर्णय घेत आहे, ज्येष्ठांना डावलण्यात येत आहे तर पक्षाची ध्येयधोरणेसुद्धा माहित नसलेल्या नवख्या, अननुभवी लोकांना मोठय़ा प्रमाणात प्रवेश देण्यात येत आहे, अशी जोरदार टीका ज्येष्ठ काँग्रेसमन तथा गोलती-नावेलीचे सरपंच मारियो पिंटो आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय पै यांनी केली आहे. हे प्रकार असेच चालू राहिल्यास काँग्रेसचे पतन होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षात अधिकाधिक लोकांनी प्रवेश करावा, पक्ष बळकट व्हावा, ही आमचीही मनिषा आहे. परंतु एखाद्यास प्रवेश देतेवेळी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी यांना विचारात आणि विश्वासात घेतले पाहिजे. सध्या त्यातील काहीच होत नाही. गत सुमारे 28 ते 35 वर्षांपासून आम्ही निष्ठेने काँग्रेससाठी काम करत आहोत. परंतु सध्या पक्षात जे काही प्रकार सुरू आहेत, ते पाहता या पक्षाचे भवितव्य अंधःकारमय दिसू लागले आहे, असे पे म्हणाले.

सध्या हा पक्ष म्हणजे काही जणांना स्वतःची घरगुती मालमत्ता बनविली असून मनमानी आणि स्वमर्जीने निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे निष्ठावान आपसूकच बाजूला सारले गेले असून पक्षात अक्षरशः खोगीरभरती व्हावी तशा प्रकारे लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. यातील दुःखद प्रकार म्हणजे हे सर्वकाही निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होत असून त्यातील बहुतेकजण हे उमेदवारीच्या लालसेनेच प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा पिंटो आणि पै यांनी केला.

पक्षातील मनमानी सध्या एवढय़ा विकोपाला पोहोचली आहे की सीएलपीच्या बैठकासुद्धा घेतल्या जात नाही. शेवटची बैठक कधी झाली होती त्याचेही स्मरण होत नाही, यावरून कार्यकारिणीत कसा आणि किती गोंधळ सुरू आहे ते लक्षात यावे, असे ते म्हणाले.

या मनमानीला कंटाळूनच डझनभर आमदारांनी एका रात्रीत पक्षत्याग केला. एवढेच नव्हे तर सध्या असलेल्यांमधील प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईझीन फालेरो यांच्यासारखे दिग्गज, ज्येष्ठ नेतेही पक्षापासून दूर जाऊ लागले आहेत. सदर प्रकार गोवा प्रभारी पी. चिदंबरम, निरीक्षक दिनेश गुंडूराव, आदी श्रेष्ठींच्या माध्यमातून आम्ही दिल्लीश्वरांपर्यंत सुद्धा पोहोचविला. तरीही परिस्थितीत कोणताही फरक पडत नाही. यावरून ज्येष्ठांना डावलणे हेच काँग्रेसचे विद्यमान धोरण आहे की काय? असा संशय घेण्यास वाव मिळत आहे, असे पिंटो म्हणाले.

सध्या पक्षात प्रवेश मिळविण्यासाठी ज्या प्रकारे लोकांच्या रांगा लागत आहेत, ते पाहता राज्यात काँग्रेसप्रेमींची संख्या अफाट असल्याचे दिसून येते. पक्षहितासाठी ही चांगलीच गोष्ट असली तरीही ही गर्दी आताच का? एवढी वर्षे हे लोक कुठे होते,  त्याचबरोबर फेब्रुवारीनंतर ते काँग्रेसमध्येच राहतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, असे ते म्हणाले.

हेची फळ काय मम तपाला?

आम्ही आमचे अर्धे आयुष्य काँग्रेससाठी वाहिले. कोणतीही अपेक्षा न धरता निष्ठेने वावरत राहिलो. परंतु आज स्वतःमध्ये निवडून येण्याची कोणतीही क्षमता सुद्धा नसलेले काहीजण पक्षात मोठमोठी पदे अडवून बसले आहेत, तर दिग्गज ज्येष्ठांना दूर ठेवले जात आहे. यावरून ’हेची फळ काय मम तपाला?’, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आली आहे, असे अत्यंत उद्विग्न मनःस्थितीत पिंटो आणि पै यांनी सांगितले.

Related Stories

‘त्या’ कंडक्टरची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Amit Kulkarni

…तर माध्यान्ह आहार बंद करु

Amit Kulkarni

covid-19; आता नाकाद्वारे घ्या, करोना प्रतिबंधात्मक डोस

Rahul Gadkar

वाळपई पालिकेसाठी 85.50 टक्के मतदान

Patil_p

गुटखा किंग जोशी यांना 10 वर्षांचा तुरुंगवास; दाऊदशी संबंध असल्याचा आरोप

Abhijeet Khandekar

धडा पैकुळ ग्रामस्थांची पुन्हा मामलेदार कार्यालयावर धडक

Amit Kulkarni