Tarun Bharat

…तर झुवारी पुलावरीलही डांबरीकरणावर परिणाम!

Advertisements

अटल सेतूवरील उखडणाऱया डांबरीकरणाचा आयआयटी करणार अभ्यास : जीएसआयडीसीचा पत्रव्यवहार वरिष्ठ अधिकाऱयाची माहिती

प्रतिनिधी /पणजी

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बांधण्यात आलेल्या ’अटल’ सेतूवरील हॉटमिक्स डांबरीकरण उखडून रस्ता खराब होण्याचे वारंवार घडणारे प्रकार पाहता याच तंत्रज्ञानाद्वारे झुवारी पुलावरही करण्यात येणाऱया डांबरीकरणावर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने चेन्नई आयआयटीची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने पत्रव्यवहारही करण्यात आला आहे, अशी माहिती जीएसआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. असे असले तरीही अटल सेतूच्या बांधकाम दर्जाशी याचा काहीही संबंध नसल्याचेही सदर अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे.

दि. 29 जानेवारी 2019 रोजी उद्घाटन करण्यात आलेला अटल सेतू हा केबल स्टेड पूल म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार समजला जात होता. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न असलेल्या या प्रकल्पाचे नंतर त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या पुलाचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यापूर्वी काँक्रिट आणि डांबर यांच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्रिस्तरीय वॉटरप्रुफिंग (एमएमए रेझिन बेस कोटिंग) करण्यात आले आहे. हे विदेशी तंत्रज्ञान असून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार त्याचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत देशातील मोजकेच महामार्ग, पूल आदींच्या बांधणीत त्याचा वापर करण्यात आला आहे.

गोव्याच्या हवामानामुळे परिणाम

परंतु गोव्यात खारट हवामान आणि अन्य बाबींमुळे सदर डांबरीकरण वारंवार उखडण्याचे प्रकार घडत आहेत. वॉटरप्रुफिंगचा स्तर आणि हॉटमिक्स यांचा योग्य संयोग होत नसल्याने डांबर उखडत असून त्यातून मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्या खड्डय़ात पावसाचे पाणी साचून किंवा धावत्या वाहनांमुळे त्यांचा आकार वाढत जाऊन वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक बनत आहे.

पावसाळय़ात रस्ता उखडण्याचे प्रकार

वैशिष्ठय़पूर्ण बाब म्हणजे हे प्रकार पावसाळ्यातच जास्त प्रमाणात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून हा तांत्रिक दोष असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही अज्ञानपणातून लोक काहीही आरोप करत असल्याने पूल वादाच्या भोवऱयास सापडला आहे, असे सदर अधिकाऱयाने सांगितले.

एल अँड टी स्वतः करणार सारा खर्च

या समस्येवर कामयस्वरुपी उपाय काढण्यासाठी आता जीएसआयडीसीने चेन्नई आयआयटीशी पत्रव्यवहार केला असून योग्य अभ्यासांती त्यांनी सूचविलेल्या उपायांनुसार दुरुस्तीकाम करण्याचे आदेश पुलाची कंत्राटदार असलेल्या एलएण्डटी कंपनीस देण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या हमी करारानुसार सदर काम एल अँड टी कडून स्वखर्चाने करून देण्यात येईल, अशी माहिती सदर अधिकाऱयाने दिली.

या अभ्यासाचा फायदा सध्या निर्माणाधीन असलेल्या आठ पदरी झुवारी पुलावर डांबरीकरण करतानाही होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या पुलाच्या एका बाजूने खचत असलेल्या एका भागाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून तीन महिन्यांच्या निर्धारित कालावधीत ते काम पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर पुलाच्या पणजीला जोडणाऱया तिसऱया टप्प्याचे बांधकामही याच कालावधीत पूर्ण करून नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही सदर अधिकाऱयाने सांगितले.

Related Stories

न्यायालयाने पंचायतींना पुन्हा घेतले फैलावर

Amit Kulkarni

मागील निवडणुकीत काँग्रेसचा घात केलेल्या पक्षांशी युती नको : सार्दिन

Amit Kulkarni

मनपाच्या अटीमुळे लोकोत्सव आयोजकांपुढे पेचप्रसंग

Patil_p

मडगावात लाखो रुपयांच्या इलेक्ट्रीक यंत्रणेची चोरी

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी- रोहन खंवटे

Amit Kulkarni

भाजपने एसटी समाजाला खऱया अर्थाने प्राधान्य दिले

Amit Kulkarni
error: Content is protected !!