Tarun Bharat

…तर महाविकास आघाडीचा डोलारा ढासळेल !

राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून व्यक्त केली भिती

Advertisements

महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या फार मोठ्य़ा अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांना तडे जाऊ लागले आहेत. कर्जमाफीचा मुद्दा वगळता एकही गोष्ट शेतकरी हिताची नाही. शेतकऱ्यांच्या विषयांवर सर्व घटकांशी सखोल चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी हे सरकार सचिन वाझे प्रकरण, आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा पेपर फुटी, टीईटी घोटाळा, कोरोना काळातील जंबो कोविड सेंटर व औषध खरेदी घोटाळा यामध्येच गुरफटून गेले आहे. त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. आघाडीचे प्रमुख या नात्याने या सर्व गोष्टी वेळीच सावराव्यात, अन्यथा महाविकास आघाडीचा डोलारा ढासळायला वेळ लागणार नाही, अशी भिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे.

पत्रामध्ये शेट्टी यांनी म्हटले आहे, धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती व इतर छोट्य़ा, मोठ्य़ा पक्षांना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत. आघाडीच्या स्थापनेपासून या छोट्य़ा पक्षाबरोबर एकही बैठक झालेली नाही. मात्र ज्या विषयावर या छोट्य़ा पक्षांनी हयातभर संघर्ष केला त्यांचे मतही विचारात घेतले जात नाही हे दुर्दैव. वैचारिक बांधिलकीमुळे हे छोटे पक्ष भाजपला पाठिंबाही देऊ शकत नाहीत व तिसरी आघाडीही करू शकत नाहीत. त्यांच्या या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना गृहित धरले जात आहे.

पत्रात म्हटले आहे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उद्देशून शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे, ऑक्टोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप सरकारच्या पराभवासाठी पायाला भिंगरी लावून तुम्ही महाराष्ट्र पालथा घातला. प्रकृती बरी नसतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन भाजप सरकारच्या पराभवासाठी आवाहन करत होता. त्याचवेळी दिर्घकाळ तुमच्याबरोबर राहीलेले व तुमच्या आडून सत्तेचे चव चाखलेले अनेक प्रस्थापित नेते तुमची साथ सोडून निघून जात होते. तुमचा पडता काळ सुरू होताच. त्यातील बहुतेक लोक तुम्हाला सोडून गेले. अशा संकटाच्या काळात शेतकरी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिला. त्यामुळेच बहुमताच्या दिशेने घौडदौड करणारा भाजपचा अश्वमेध रोखला गेला. अनेक नाट्य़मय घडामोडीनंतर तुमच्या अथक परिश्रमामुळे महाविकास आघाडीची निर्मिती झाली. त्याचा मी साक्षीदार आहे.

तर महाविकास आघाडीशी फारकत घ्यावी लागेल

गेल्या दोन वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने आमचा विरोध असतानाही अनेक निर्णय जाणीवपुर्वक रेटून घेतले गेले. ऊस दर नियंत्रण समितीमध्ये संघर्ष करणाऱ्या संघटनांना डावलले. निती आयोगाने एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट घातला. आणि राज्यसरकारने प्रस्तावाचे समर्थन करणारा अभिप्राय कळविला. महापूर व अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करून वाऱ्यावर सोडले गेले. 21 सप्टेंबर 2021 व 6 ऑक्टोबर 2021 या भूमीअधिग्रहणच्या शासन निर्णयाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वाईन निर्मीती प्रकल्पांना राज्य सरकारचे अनुदान व कर्जाला सरकारची हमी हवी होती. म्हणून किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचे धोरण जाहीर करून विनाकारण शेतकऱ्याला बदनाम केले गेले. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनत्नक अनुदान देण्याची घोषणा होऊन 2 वर्षे उलटून गेली तरीही ती शेतकऱ्यांना मिळाली नाही. वीज बिल वसुलीसाठी महावितरणने धडाधड वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पाण्याअभावी पिके करपून जात आहेत. त्यामुळे दुर्देवाने 1999 साली ज्या पद्धतीने स्व. एन. डी. पाटील व गणपतराव देशमुख यांना आपल्या बरोबरच्या आघाडीशी फारकत घ्यावी लागली दुर्देवाने तशीच वेळ आमच्यावर आली की काय असे वाटू लागले असल्याचे शेट्टी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Related Stories

चिपळुणात पेटीएमद्वारे 78 हजाराचा गंडा

Abhijeet Shinde

यशस्वी विद्यार्थी, निवृत्त जवानांचा सत्कार

Patil_p

नायजेर देशात गोळीबारात 137 ठार

Patil_p

खोतवाडीत संतप्त महिलांचा दारु अडुयावर हल्ला बोल

Abhijeet Shinde

इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’, असे नामकरण करा

Sumit Tambekar

Kolhapur; विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!