Tarun Bharat

तामिळनाडूत कमळ फुलणार

एमके अलागिरी यांच्यावर शाह यांची नजर केंद्रीत

दक्षिण भारतातील सर्वात मोठे राज्य तसेच औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीवर असलेल्या तामिळनाडूने आता देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूचे राजकारण नवे वळण घेत आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा राहिलेले दिवंगत नेते करुणानिधी यांचे पुत्र एमके अलागिरी आता स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूचा दौरा करत पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. शाह यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत तसेच अलागिरी यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात भाजप आणि अलागिरी यांच्या नव्या पक्षात आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकूण चित्र पाहता अलागिरी सद्यस्थितीत तामिळनाडूच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. अलागिरी कोण, द्रमुकला ते किती फटका पोहोचवू शकतात, राज्याच्या राजकारणात यामुळे कोणता बदल घडणार हे समजून घेणे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.

भावाशीच लढाई

अलागिरी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कडगम (द्रमुक) सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी आणि त्यांच्या दुसऱया पत्नी दयालु अम्मल यांचे पुत्र आहेत. अलागिरी हे तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाचे सदस्य राहिले आहेत. 2009 मध्ये मदुराई मतदारसंघातून विजयी होत संसदेत पोहोचलेल्या अलागिरी यांना केंद्रात कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही मिळाला होता. करुणानिधी नेहमीच राजकीय प्रकरणांमध्ये स्टॅलिन यांना पुढे करत राहिले होते. करुणानिधींच्या या दुजाभावामुळे अलागिरी यांची नाराजी वाढतच राहिली. 2014 मध्ये करुणानिधी यांनी अलागिरी यांना पक्षातून बाहेर काढले होते. 2018 मध्ये करुणानिधी यांचे निधन झाले असता अलागिरी यांनी स्टॅलिन यांच्या नेतृत्वात पक्षाचे अस्तित्व संपणार असल्याची टिप्पणी केली होती.

स्टॅलिन अन् अलागिरीत वैर

तामिळनाडूच्या राजकारणात करुणानिधी यांचा राजकीय वारसदार स्टॅलिन यांच्या स्वरुपात मिळाला आहे. पक्षाचे सर्व कामकाज स्टॅलिन हेच हाताळत राहिले आहेत. अलागिरी आणि स्टॅलिन यांनी मदुराईतही राजकारणाची सुरुवात केली होती. एमजीआर यांच्या मृत्यूनंतर स्टॅलिन यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीने पावले टाकली, परंतु अलागिरी यांनी मदुराईतून बाहेर पडणे टाळले. तर स्टॅलिन यांनी चेन्नईत ठाण मांडून पक्षात स्वतःचे प्रभुत्व निर्माण केले. स्टॅलिन हे वडिल म्हणजेच करुणानिधी यांच्यासोबतच राहत होते, याचमुळे त्यांनी पक्षाचे कामकाज पाहण्यास प्रारंभ केला. परंतु अलागिरी यांचे मदुराई प्रेम काही दूर झालेले नाही. अलागिरी बहुतांश वेळ मदुराईतच असतात. करुणानिधी हयात असतानाच दोन्ही भावांमधील वैर टोकाला पोहोचले होते. अनेकदा तडजोडीचा प्रयत्न झाला, परंतु काहीच निष्पन्न झाले नाही. अखेरीस 2014 मध्ये पक्षविरोधी कारवायांचे कारण पुढे करत अलागिरी यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले.

कुटुंब दुभंगल्याने द्रमुक पराभूत

करुणानिधी कुटुंबातील दुहीचा प्रभाव 2016 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाला होता. आलटून-पालटून सत्तेवर आणणाऱया तामिळनाडूने कित्येक दशकांनी स्वतःची परंपरा मोडली होती. सत्तारुढ अण्णाद्रमुकला 134 तर विरोधी पक्ष राहिलेल्या द्रमुकला 89 जागांवर विजय मिळाला होता. एखादा पक्ष सत्ता राखण्यास यश मिळविण्याचा हा प्रकार 1984 नंतर तामिळनाडूत घडला होता. द्रमुकच्या या पराभवामागे स्टॅलिन आणि अलागिरी या भावांमधील दुहीच कारणीभूत असल्याचे मानले गेले होते.

नवा पक्ष स्थापण्याची तयारी, द्रमुक निश्चिंत

जर सर्वकाही सुरळीत राहिल्यास अलागिरी हे मदुराईमध्ये स्वतःच्या समर्थकांच्या साक्षीने नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. याचे नाव ‘कलैगनार द्रमक’ असू शकते. परंतु अलागिरी यांच्या या योजनेमुळे स्टॅलिन यांना कल्पना असूनही याकडे ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. अलागिरी यांना भाजपमध्ये जाऊ द्या. अलागिरी 6 वर्षांपर्यंत कुठेच सक्रीय नव्हते, त्यांचा स्वतःचा मतदारसंघही नाही, समर्थक देखील नाहीत, तसेच आर्थिक बळही त्यांच्याकडे नाही. अलागिरी यांच्या नव्या पक्षामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर कुठलाच प्रभाव पडणार नाही, केवळ एक-दोन दिवस हेडलाईन तेवढय़ा मिळतील अशी टिप्पणी द्रमुकच्या एका नेत्याने केली आहे.

भाजपसोबत जाऊ शकतात अलागिरी

भाजपने 2014 मध्ये केंद्रात सत्ता प्राप्त केल्यापासूनच देशभरात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची कवायत गतिमान केली होती. दक्षिणेत पक्ष अद्याप काही अपवाद वगळता स्वतःचे प्रभुत्व निर्माण करू शकलेला नाही. तामिळनाडू आणि केरळ दोन्ही ठिकाणी भाजपला स्वतःची मूळे रुजवावी लागणार आहेत. भाजपने काँग्रेसच्या नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर यांना पक्षात प्रवेश देत या दृष्टीने पावलेही टाकली आहेत. भाजपची नजर आता एमके अलागिरी यांच्यावर आहे. आघाडी करण्याच्या दृष्टीने भाजप आणि अलागिरी यांच्यात चर्चाही सुरू आहे. भाजपचे नेतृत्व आणि अलागिरी यांच्यात थेट चर्चा होऊन तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठय़ा आघाडीला मूर्त स्वरुप दिले जाऊ शकते. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनाही स्वतःसोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

राजकारण वळण घेणार

अलागिरी दीर्घकाळापर्यंत प्रकाशझोतापासून दूरच राहिले आहेत. करुणानिधी यांच्या मृत्यूच्या महिन्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी चेन्नईमध्ये अखेरची मोठी सभा घेतली होती. तर स्टॅलिन यांचा पक्षाच्या नेत्यांवर आणि कुटुंबावर अधिक प्रभाव आहे. दयानिधी मारन यांच्यापासून कनिमोळी यांचे समर्थन स्टॅलिन यांना प्राप्त आहे. तर एका तमिळ पक्षासोबत मिळून निवडणूक लढविण्याची भाजपची योजना आहे. अलागिरी यांच्यासोबत समीकरणे जुळून आल्यास दोघेही एकत्रिपणे निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. अलागिरी यांच्या नव्या पक्षाने द्रमुकच्या मतपेढीला भगदाड पाडल्यास अण्णाद्रमुकला लाभ होणार आहे. भाजपला या नव्या स्थितीत कुठलाच तोटा होणार नाही, परंतु अलागिरी यांचे काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दक्षिण तामिळनाडूत प्रभाव

द्रमुकमध्ये कार्यरत असताना अलागिरी यांच्याकडे दक्षिण विभागाची धुरा देण्यात आली होती. परंतु ते मागील 6 वर्षांपासून राजकीय पटलापासून दूर आहेत. भाजपने 2021 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पराभूत करण्याचे लक्ष्य बाळगले असून याकरता अलागिरी उपयुक्त ठरू शकतात. मदुराईशी संबंधित भागावर अलागिरी यांचा मोठा प्रभाव आहे. स्टॅलिन यांच्यासमोर अलागिरी सर्वात मोठे आव्हान दक्षिण तामिळनाडूतच उभे करू शकतात. तेथे भाजपची साथ मिळाल्यास अलागिरी यांचे बळ अधिकच वाढणार आहे. अलागिरी स्वबळावर किती मते मिळवू शकतात किंवा द्रमुकच्या मतांमध्ये फूट पाडू शकतात हे पहावे लागणार आहे. दक्षिण तामिळनाडूत अलागिरी लाभदायक ठरणार असल्यानेच भाजपने आघाडीची चर्चा पुढे नेण्यास स्वारस्य दर्शविले आहे. तामिळनाडूत दर 5 वर्षांनी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात सत्ता बदलत राहते. अशा स्थितीत भाजप अलागिरी यांना सोबत घेऊन तिसरी शक्ती उभी करू पाहत आहे.

रामलिंगम भाजपवासी

अलागिरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी राहिलेले परंतु द्रमुकचे नेते के.पी. रामलिंगम यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.  चालू वर्षात भाजपमध्ये सामील होणारे रामलिंगम हे द्रमुकचे तिसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी द्रमुकचे नेते वी.पी. दुरिसामी आणि के. सेल्वम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. करुणानिधी यांच्यानंतर पक्षप्रमुख म्हणून कुणाला स्वीकारण्याची माझी तयारी नसल्यानेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझा राजकीय पक्ष आता भाजपमधून सुरू होणार आहे. देशाला सुरक्षित ठेवणारा आणि आर्थिक विकास सुनिश्चित करणारा नेता असलेल्या पक्षात सामील झाल्याने आनंद वाटत असल्याचे उद्गार रामलिंगम यांनी काढले आहेत. करुणानिधी यांच्या निधनानंतर अलागिरी यांना द्रमुकचा अध्यक्ष करण्यासंबधी रामलिंगम यांनी मोहीम चालविली होती. रामलिंगम यांना स्टॅलिनविरोधी मानले जाते. 1996 मध्ये द्रमुकतर्फे रामलिंगम यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. पक्षाने 2010 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. 1980 आणि 1984 मध्ये रासीपुरम येथून अण्णाद्रमुकचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. अलागिरी यांना समर्थन दर्शविल्याप्रकरणी रामलिंगम यांना द्रमुकमधून 2014 मध्ये हाकलण्यात आले होते.

अलागिरी यांच्यासमोर अंतिम संधी

भाजपसोबतची चर्चा दीर्घकाळापासुन सुरू आहे. एम.के. स्टॅलिन यांना हे ठोस प्रत्युत्तर असणार आहे. स्टॅलिन यांनी पक्ष आणि कुटुंबातून स्वतःच्या मोठय़ा भावालाच बेदखल केल्याचे अलागिरी यांच्या समर्थकाने म्हटले आहे. तसेच अलागिरी यांच्यासमोर स्वतःचा प्रभाव दाखवून देण्याची ही अंतिम संधी असणार आहे. द्रमुक सत्तेवर आल्यास अलागिरी यांच्या व्यवसायाला अधिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

Related Stories

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (9)

Patil_p

जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई!

Patil_p

अपरिचित स्वामी विवेकानंद

Patil_p

भारतातला स्थानिक पर्यावरणाविषयाचा बेफिकीरपणा

Patil_p

स्पेस जपताना…2

Patil_p

प्रभु तू दयाळू कृपावंत दाता

Amit Kulkarni