वार्ताहर /किणये


तालुक्यात रविवारी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावांमध्ये सामूहिक पद्धतीने व घराघरांमध्ये रक्षाबंधन झाले. बहिणींनी आपल्या भावांना मनोभावे राख्या बांधल्या. कोरोनामुळे रविवारी विकेंड कर्फ्यू होता. तरीही सकाळच्या सत्रात बहीण-भावांची एकमेकांच्या घरी ये-जा सुरू होती.
श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव साजरे करण्यात येतात. दि. 9 रोजीपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला. श्रावणातला दुसरा सण नारळी पौर्णिमा रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागात नारळी पौर्णिमेनिमित्त शेतकरी बांधव शेत-शिवारातील कामे बंद ठेवून ही पौर्णिमा साजरी करतात. यंदाही त्याचे पालन शेतकऱयांनी करत ही परंपरा जपली.
बहिणीचे रक्षण करण्याठी बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन होय. रविवारी सकाळपासूनच गावागावांमध्ये बहिणी भावांना राख्या बांधतानाची लगबग दिसून येत होती. बहीण भावाला राखी बांधून भावाच्या सुखी, निरोगी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत होत्या.
काही ठिकाणी कूळ घरांमध्ये सामूहिक पद्धतीने रक्षाबंधन करण्यात आले. घरगुती कार्यक्रमही आनंदाने साजरे करण्यात आले. घरांमध्ये पाट व त्याच्या सभोवती आकर्षक रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. लाकडी पाटावर भावांना बसवून आरती ओवाळून बहिणी भावांना राख्या बांधत होत्या. यानिमित्त घरांमध्ये गोड पदार्थ करण्यात आले होते.
लहान बालकांमधील भाऊ-बहिणी अगदी निरागसपणे व आनंदात आरती ओवाळून, राखी बांधतानाचे दृश्य पाहण्यासाठी घरातील वडीलधारी मंडळीही उत्सुकतेने पाहत होती.
सासरवाडीला गेलेल्या मुलीही रक्षाबंधनानिमित्त माहेरी आल्या होत्या. काही बंधूही आपल्या बहिणीच्या घरी जावून राख्या बांधून घेत होते. रक्षाबंधनानंतर भाऊ जमेल त्या पद्धतीने बहिणीला भेटवस्तू देत होते.रक्षाबंधनानिमित्त सोशल मीडिया, व्हॉट्सऍप, फेसबूक आदींच्या माध्यमातूनही भाऊ-बहिणी एकमेकांना शुभेच्छा देत होते.