Tarun Bharat

तालुक्यात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्रीचा जागर

विविध ठिकाणी आज महाप्रसादाचे आयोजन : शिवमंदिरे भाविकांनी फुलली : तीर्थकुंडयेत उद्या जंगी कुस्त्यांचे आयोजन

वार्ताहर /किणये

तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये मंगळवारपासून महाशिवरात्रीच्या उत्सवाला मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेक, अभिषेक, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. दोन दिवस शिवमंदिरांमध्ये महादेवाचा जागर होणार आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामेश्वर, रामलिंग, ब्रह्मलिंग आदी शिवस्वरुप मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा जागर सुरू आहे.

महाशिवरात्रीची तयारी गेल्या चार-पाच दिवसांपासून करण्यात आली आहे. मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही गावांमध्ये बुधवारी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांमध्ये मंगळवारी भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. हा महाशिवरात्रीचा उत्सव काही गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

तीर्थकुंडये येथील रामलिंग मंदिरात महाशिवरात्रीच्या उत्सवाला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे काकड आरती करण्यात आली. हभप लक्ष्मण महाराज व गावातील सर्व भजनी मंडळांनी काकड आरती केली. सकाळी 6 वाजता देवस्थान कमिटीचे चेअरमन किशोर देशपांडे यांच्या हस्ते रामलिंग पिंडीचे पूजन करण्यात आले. बसवाण्णा मूर्तीचे पूजन देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष बाळू मुत्तेनट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तुळसी पूजा ता. पं. उपाध्यक्षा श्वेता मजगावी यांनी केली. ध्वजारोहण शरद देशपांडे यांनी केले. त्यानंतर हरिपाठ भजन झाले. सिद्धकला बाल भजनी मंडळ तीर्थकुंडये व कौलापूरवाडा यांनी बालोपासना केली. त्यानंतर संतिबस्तवाड, रणकुंडये, तीर्थकुंडये, कौलापूरवाडा आदी गावातील भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम झाले.

रात्री राधानगरी येथील हभप उदय पाटील (शास्त्री) यांचे कीर्तन निरुपण झाले. रात्री विविध गावातील भजनी मंडळांचे जागर भजन झाले.

बुधवार दि. 2 रोजी पहाटे काकड आरती होणार आहे. दुपारी 2 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 3 रोजी दुपारी 2 वाजता रामलिंग मंदिराशेजारी खळय़ाच्या जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. राकसकोप येथील शिवशंकर मार्कंडेय तीर्थक्षेत्र येथे महाशिवरात्रीचा जागर सुरू आहे. मंगळवारी सकाळी अभिषेक व पूजा-अर्चा करण्यात आली. दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

बिजगर्णी येथील ब्रह्मलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. बुधवारी सकाळी अभिषेक व दुपारी 12 नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. नावगे येथील रामलिंग मंदिरात मंगळवारी सकाळी 9 वाजता अभिषेक करण्यात आला. दिवसभर भजन व इतर कार्यक्रम झाले. मंगळवारी रात्री पुन्हा अभिषेकचा कार्यक्रम व ओम नमः शिवाय नाम जप करण्यात आला.

बुधवारी दुपारी 12 नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कडोली येथील दूरदुंडेश्वर मठात आणि तारीहाळ येथील बडेकोळ्ळ मठात महाशिवरात्रीचा उत्सव मोठय़ा उत्साहात सुरू झाला आहे.

श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थानात महाशिवरात्री साजरी

वार्ताहर /कुद्रेमनी

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान मंदिरात यंदा भाविकांनी देवदर्शन घेऊन महाशिवरात्रोत्सव साजरा केला. कोरोना परिस्थितीचे भान राखून शासकीय नियमांचे पालन करून साधेपणाने हा यात्रोत्सव साजरा झाला.

वर्षभरात दवणी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री असे मोठे उत्सव साजरे केले जातात. मात्र, कोरोना रोगाच्या कालावधीत उत्सव साजरे झाले नव्हते. मंगळवारी पहाटे स्थानिक देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष नारायण भोगण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, खजिनदार बाळाराम करडे, सचिव बसवराज पुजारी, अमृत भोगण, शंकर गुंडप, आप्पाजी आढाव, वैजू केसरकर, दशरथ कांबळे, अरुण कटांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने मंदिरात पूजेचा विधी झाला. पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवलिंगावर दूध-तुपाचा अभिषेक, पार्वती देवीचे पूजन, बेलपत्र वाहून आरत्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी रोगराईचा नाश करून सर्व मानवांसह प्राणीमात्राला सुख, समृद्धी, समाधान देण्याविषयी देवाकडे मागणी करून साकडे घालण्यात आले. यावेळी हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला.

विद्युत रोषणाई, पताका लावून मंदिर परिसर आकर्षक करण्यात आला. वाहन पार्किंग, पाणी व्यवस्था सोय चांगली ठेवण्यात आली होती. सकाळपासून भाविकांची देवदर्शनासाठी ये-जा सुरू होती. सर्वांना देवदर्शन सुरळीतपणे व्हावे याची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

बुधवारी दुपारी 12 वाजता महाप्रसादाने महाशिवरात्रोत्सवाची सांगता होणार असल्याचे देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष नारायण भोगण यांनी कळविले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त आज उचगाव परिसरात महाप्रसाद

वार्ताहर /उचगाव

उचगाव परिसरामध्ये मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाना प्रारंभ झाला. मंदिरामधून शिवमूर्तीवर अभिषेक, पूजा व महाआरती असे कार्यक्रम पार पडले.

 या भागातील उचगाव, गोजगे, तुरमुरी, कल्लेहोळ गावांमधून बुधवार दि. 2 मार्च रोजी सकाळपासूनच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे स्थानिक उत्सव कमिटीने कळविले आहे.

मंगळवारी उचगाव येथील रामलिंग मंदिरामध्ये पूजा, शिव नामस्मरण, शिव भजन, जागर, महिलांचे भजन, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या मंदिरामध्ये बुधवारी सकाळपासूनच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तुरमुरी येथील रामलिंग देवस्थानमध्ये भाविक भक्तांनी मंगळवारी पहाटेपासूनच देव दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून येत होते. रात्री विविध पूजा, पारायण, जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे.

बेकिनकेरे येथील महादेव मंदिरामध्ये मंगळवारी पहाटेपासून देव देर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंगळवारी रात्री विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी या महाशिवरात्रीचा समारोप होणार आहे. बुधवारी महाप्रसादाने या महाशिवरात्रीचा समारोप कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे स्थानिक कमिटीने कळविले आहे.

कणबर्गी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

वार्ताहर /सांबरा

कणबर्गी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

येथील डोंगरमाथ्याच्या कुशीत श्री सिद्धेश्वर मंदिर वसलेले आहे. अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. तत्पूर्वी महाशिवरात्रीनिमित्त सोमवार दि. 28 रोजी दुपारी गावातून गाडा मिरवणूक निघाली. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पुन्हा मठ गल्ली येथून गाडे मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

गाडा मिरवणूक रात्री मंदिर परिसरात पोहोचली. महाशिवरात्रीनिमित्त रात्री भजन सेवा करण्यात आली. मध्यरात्री 12 नंतर अभिषेक घालण्याचा कार्यक्रम झाला. अभिषेक घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक हजेरी लावत असतात. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आज महाप्रसाद

मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंदिर कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

Related Stories

हिंडलगा श्री महालक्ष्मी यात्रेला जिल्हाधिकाऱयांचा हिरवा कंदिल

Amit Kulkarni

इंडी तालुक्मयातील अधिकाऱयांना शंकरगौडा पाटील यांचे मार्गदर्शन

Patil_p

अलोन स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

Patil_p

बागलकोटमध्ये 75 वर्षीय वृद्ध कोरोनाचा बळी

Patil_p

महिलेच्या गळय़ातील साडेचार तोळय़ाचे दागिने चोरटय़ांनी भरदुपारी लांबविले

Amit Kulkarni

कंत्राटदार संघटनेने केलेले आरोप बिनबुडाचे

Amit Kulkarni