Tarun Bharat

तालुक्यात म.ए.समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

काळय़ा दिनी कडकडीत हरताळ पाळून गावागावांमधून निषेध : कर्नाटक सरकारकडून संविधानाचाही अवमान : …तोपर्यंत काळा दिन म्हणूनच पाळण्याचा निर्धार

वार्ताहर /किणये

तालुक्यात सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळण्यात आला. म. ए. समितीच्या धरणे आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. काळी टी-शर्ट घालून व दंडाला काळी पट्टी बांधून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

बेळगाव आधी मुंबई प्रांतात होते. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यावेळी अन्यायाने मराठीबहुल असलेला सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. हा मराठी भाषिकांवर अन्याय झाला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1956 सालापासून सीमाबांधव त्या विरोधात लढा देत आहेत.

गेली 65 वर्षे आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला आमच्या मातृभाषेच्या महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करून आम्हाला न्याय द्या, असा मुद्दा धरून सीमावासीय लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाचा लढा देत आहेत.

दरवषी केंद्र शासनाचा निषेध म्हणून बेळगाव शहरासह तालुक्मयात व सीमाभागामध्ये कडकडीत हरताळ पाळून आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला न्याय द्या, हीच भूमिका मांडतात.

1 नोव्हेंबर काळा दिवस पाळून मूक सायकलफेरी काढून त्यानंतर सभा घेण्यात येते. यंदा मात्र मूक सायकलफेरीला कोरोनाचे कारण सांगून प्रशासनाने परवानगी दिली नाही. अखेर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा मंगल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले. या धरणे आंदोलनाला तालुक्मयातून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

गावागावांमध्ये पोलिसांची वाहने फिरत होती. प्रत्येकाची पोलीस चौकशी करीत होते. मात्र, पोलीस प्रशासनाला झुगारून तरुण व म. ए. समितीचे कार्यकर्ते गावागावांमधून धरणे आंदोलनाला निघाले. सीमालढय़ासाठी ग्रामीण भागातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान अद्यापही आजची तरुणपिढी विसरली नाही, याची प्रचिती सोमवारी पुन्हा एकदा तरुणांनी दाखवून दिली.

तालुक्मयातील गावागावांमध्ये कडकडीत हरताळ पाळण्यात आला. मराठीभाषिक बांधवांनी आपापली सर्व दुकाने-व्यवहार बंद ठेवून म. ए. समितीच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

हिंडलगा परिसरात कडकडीत

1 नोव्हेंबर काळय़ा दिनानिमित्त हिंडलगा परिसरात सोमवारी नागरिकांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळला. त्यामुळे हिंडलग्यासह परिसरातील गावांमध्ये शुकशुकाट पसरला होता.

तालुक्मयाचा पश्चिम भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला मानला जातो. आजतागायत सीमाप्रश्नासाठीच्या प्रत्येक आंदोलनात पश्चिम भागातील नागरिक व समिती कार्यकर्त्यांनी हिरीरीने भाग घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाचे या भागावर नेहमीच लक्ष असते. त्यानुसार 1 नोव्हेंबर काळय़ा दिनी हिंडलग्यासह मण्णूर, आंबेवाडी, गोजगा, बेनकनहळ्ळी, गणेशपूर, सावगाव, मंडोळी, हंगरगा, सुळगा (हिं.) आदी गावांतील नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनाला साथ देत आपले दैनंदिन  व्यवहार बंद ठेवत कडकडीत हरताळ पाळून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला.

ठिकठिकाणी समिती कार्यकर्त्यांनी हातात काळे ध्वज घेऊन धरणे आंदोलनात भाग घेतला होता. बहुतांश कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून बेळगावच्या दिशेने काळे ध्वज घेऊन जाताना दिसत होते. पण कर्नाटकी पोलिसांनी मात्र प्रत्येक गावामध्ये पोलीस वाहने थांबवून कार्यकर्त्यांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. तरीदेवील कार्यकर्ते पोलिसांचा बंदोबस्त चुकवून बेळगावच्या दिशेने रवाना झाले.

कडोलीत सर्व व्यवहार बंद

कडोली येथे सोमवारी मराठी भाषिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध करीत काळा दिन गांभीर्याने पाळला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषिक प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी दरवषी मराठी भाषिक नागरिक या दिवशी काळा दिन म्हणून सर्व व्यवहार बंद ठेवतात. सोमवारीही कडोली येथे प्रमुख पेठ गल्लीतील व्यापाऱयांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध केला.

उचगाव भागात बंद

1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. उचगाव परिसरात या दिवशी कडकडीत हरताळ व काळा दिन पाळण्यात आला. सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

उचगाव परिसरातील सर्व गावांतून व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. उचगाव, तुरमुरी, सुळगा आदी गावांतील दुकानदारांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळून बंद ठेवून निषेध पाळला. पश्चिम भागात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता आणि सकाळपासून सर्वत्र पोलीस फौजफाटा तैनात होता. ये-जा करणाऱया वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मराठी बांधवांच्या नावांची नोंदणी करण्यात येत होती. त्यामुळे पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचे यावेळी दिसून आले.

कंग्राळी खुर्द येथे केंद्र सरकारचा निषेध

1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांच्यावतीने सीमाभागात काळा दिन पाळला जातो. सोमवारी कंग्राळी खुर्द येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळून केंद्र सरकारचा निषेध केला.

गेली 65 वर्षे सीमाबांधव लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत आहेत. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर या-ना-त्या कारणाने डिवचण्याचे काम करत आहे. सरकारी कागदपत्रे कन्नडमध्ये, दिशा फलक, सरकारी कार्यालयांवरील फलक व इतर ठिकाणी सर्वत्र कानडीकरणाचा वरवंटा फिरवत आहेत. सीमाभागात मराठी भाषिक मोठय़ा संख्येने असताना हा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून त्याचा निषेध म्हणून तसेच महाराष्ट्रात जाण्याच्या इच्छेमुळे 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला जातो. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हा दिवस काळा दिन म्हणूनच पाळण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचाही अवमान

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालतो. देशात अनेक जाती-धर्माचे आणि भाषेचे लोक आहेत. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली, त्यावेळी भाषेनुसार राज्ये तयार करण्यात आली. त्यावेळी मराठीबहुल असलेला सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हा सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा, अशी मागणी केली होती.

प्रत्येक भारतीयाला आपापल्या भाषेमध्ये बोलण्याचा आणि  व्यवहार करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी घटनेतच नमूद केले आहे. असे असताना येथील मराठी भाषिकांचे हक्क मात्र हिसकावून घेतले जात आहेत. यावरून कर्नाटक सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचाही अवमान करत आहे, अशाही प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहेत.

कंग्राळी बुद्रुकमध्येही बंद यशस्वी

कंग्राळी बुदुक येथेही मराठी भाषिकांच्यावतीने गावातील व्यवहार बंद ठेवून 1 नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळण्यात आला. कर्नाटक सरकार 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिन म्हणून साजरा करते. मात्र, कर्नाटक सरकारकडून सीमाभागात सुरू असलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ काळा दिन पाळला जातो. गेली 65 वर्षे आम्ही लढा सुरू ठेवला आहे. आम्ही सीमावासीय महाराष्ट्रामध्ये सामील होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहोत, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

येळ्ळूरमध्ये काळा दिनानिमित्त व्यवहार बंद

सीमाप्रश्नासाठी नेहमीच लढवय्ये गाव म्हणून ओळख असलेल्या येळ्ळूरमध्ये 1 नोव्हेंबर रोजी आपापले सर्व व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळण्यात आला. सहकारी संस्थांनी तसेच दुकानदारांनी बंद करून तसेच काही जणांनी दंडाला काळय़ा फिती बांधून आपला निषेध नोंदविला. जोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात जात नाही तोपर्यंत काळा दिन पाळू आणि महाराष्ट्रात जाण्याची इच्छा पूर्ण करू, असे युवा कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरवषी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मूक सायकलफेरी काढली जाते. त्या फेरीमध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिक सहभागी होतात. मात्र, यावषी केवळ धरणे आंदोलन छेडण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे सकाळीच काळा ध्वज घेऊन तरुण बेळगावात दाखल झाले. आणि आपली अस्मिता दाखवून दिली. सध्या सुगीचा हंगाम आहे. यातच दिवाळी सणही सुरू आहे. तरीदेखील सोमवारी सायंकाळपर्यंत व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळण्यात आला. येळ्ळूरवासीय एकजुटीने हा लढा गेली 65 वर्षे लढत आहेत. यापुढेही लढा लढण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे.

Related Stories

स्वातंत्र्यसैनिकांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

Amit Kulkarni

निजामुद्दीन कार्यक्रमाला जिल्हय़ातूनही हजेरी

Patil_p

लोकमान्य सोसायटीतर्फे बालदिना निमित्त नेत्र तपासणी

Amit Kulkarni

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

Patil_p

मण्णूर रस्ता डांबरीकरण काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विकास आवश्यक

Amit Kulkarni