Tarun Bharat

तिनईकरांवर हल्ल्यासाठी दीड लाखाची सुपारी

हॉटेल व्यावसायिकासह 9 जणांना अटक : जागेच्या वादातून हल्ला केल्याचे उघड

प्रतिनिधी बेळगाव

खानापूर येथील माहिती हक्क कार्यकर्ते जयंत मुकुंद तिनईकर (वय 64) यांच्यावरील जीवघेणा हल्ला दीड लाखाची सुपारी घेऊन करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी खानापूर येथील हॉटेल व्यावसायिकासह 9 जणांना अटक केली असून सरकारी जागेच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

शुक्रवार दि. 4 मार्च रोजी सायंकाळी झाडशहापूरजवळ ही घटना घडली होती. बेळगावहून खानापूरला जाताना जयंत यांची कार अडवून त्यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. घटनेनंतर केवळ आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस दलाला यश आले आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी 9 जणांना अटक केली असून त्यांना गुरुवारी दुपारी खानापूरला नेण्यात आले होते.

हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण बाबुराव शेट्टी (वय 55, रा. रुमेवाडी क्रॉस), लोकेश तिप्पाण्णा कलबुर्गी (वय 34, रा. चौराशी गल्ली-खानापूर), गंगाप्पा रामाप्पा गुजनाळ (वय 34), भरमा कऱयाप्पा दासनट्टी (वय 35, दोघेही रा. मार्कंडेयनगर, बेळगाव), सुनील गोविंद दिवटगी (वय 24, रा. गजानननगर उद्यमबाग), सचिन प्रभू यरझरवी (वय 21, रा. तिसऱया रेल्वेगेटजवळ, उद्यमबाग), ईश्वर महादेव हुब्बळ्ळी (वय 23, रा. शिवशक्तीनगर, अनगोळ), मंजुनाथ सोमशेखर होसमनी (वय 24, रा. गजानननगर, उद्यमबाग), अखिलेश अंबिकाप्रसाद यादव (वय 22, रा. ब्रह्मनगर, उद्यमबाग) अशी अटक करण्यात आलेल्या 9 जणांची नावे आहेत.

गुरुवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून सर्व 9 जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण शेट्टीने हल्ल्यासाठी दीड लाखाची सुपारी दिली होती. 50 हजार रुपये आगाऊ रक्कम दिली होती. खानापूर येथील क्रीडा मंडळ, कॅन्टीनच्या जागेच्या वादातून ही घटना घडली आहे.

पाठलाग करून हल्ला…

शुक्रवार दि. 4 मार्च रोजी जयंत तिनईकर कामानिमित्त बेळगावला आले होते. याची माहिती लोकेश कलबुर्गी याने हल्लेखोरांना दिली होती. त्यादिवशी लक्ष्मण शेट्टीही बेळगावात होता. लक्ष्मणने पाठलाग करून हल्लेखोरांना माहिती पुरविली आहे. त्यामुळे झाडशहापूरजवळ कार अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. क्रीडा मंडळ कॅन्टीनची जागा सरकारने ताब्यात घ्यावी, यासंबंधी प्रांताधिकाऱयांनी आदेश बजावला होता. यासाठी जयंत तिनईकर यांनी पत्रव्यवहार केले होते. याच कारणातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Related Stories

स्वातंत्र्य सैनिक संघटनेतर्फे ऑगस्ट क्रांती दिन साजरा

Patil_p

विधानसभेत गदारोळ, जोरदार घोषणाबाजी

Amit Kulkarni

पं. कुमार गंधर्व संगीत संमेलनाला प्रारंभ

Patil_p

बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Amit Kulkarni

उड्डाणपुलाच्या खड्डय़ामध्येच वृक्षारोपण

Amit Kulkarni

शिंदोळी येथे तीन लाखाची घरफोडी

Patil_p