स्पॅन बनविण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च : एप्रिल अखेरपर्यंत उड्डाणपूल खुला करण्याची कंत्राटदारांची माहिती


प्रतिनिधी /बेळगाव
तिसरे रेल्वेगेट येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे 180 फुटी स्पॅन लवकरच पुलावर ठेवण्यात येणार आहे. स्पॅनचे वजन 320 टन असून स्पॅन ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत असून पेन आणि हैड्रोलिक जॅकच्या साहाय्याने हे काम करण्यात येणार आहे.
स्पॅन ठेवल्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत उड्डाणपूल खुला करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदार मंजुनाथ यांनी दिली.
तिसऱया रेल्वे फाटकावर रेल्वे खात्यातर्फे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून सदर काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे मार्गादरम्यान 180 फूट लांबीचे स्पॅन बसविण्यात येणार असून त्याचे वजन 320 टन आहे. सहा महिन्यांपासून स्पॅन बनविण्याचे काम सुरू आहे. रात्रंदिवस काम करण्यात येत असून हा स्पॅन सज्ज झाला आहे. स्पॅन बनविण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या स्पॅन पुलावर ठेवण्याच्यादृष्टीने कंत्राटदारांनी तयारी चालविली असून आठवडाभरात हा स्पॅन बसविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यापूर्वी गोगटे चौकात 120 फूट लांबीचा स्पॅन बसविला होता. पेनच्या साहाय्याने स्पॅन ठेवला होता. पण या फाटकावरील स्पॅनची लांबी 180 फूट असल्याने पेन व हैड्रोलिक जॅक तसेच स्पॅन ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे.
रॅम्प बनविण्याचे काम युद्धपातळीवर
स्पॅन पुलावर ठेवल्यानंतर स्लॅब घालण्यात येणार आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूने रॅम्प बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुलावरील पथदीपाचे काम, फूटपाथ आणि विविध कामे पूर्ण करण्यात येत आहेत. येत्या महिनाअखेरपर्यंत स्पॅन ठेवण्याचे काम आणि रॅम्प निर्माण करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित कामे पूर्ण करून एप्रिल अखेरपर्यंत उड्डाणपूल खुला करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदारांनी दिली.