Tarun Bharat

तिसऱया आघाडीचे बेगडी नाटक

भाजपविरोधात अविश्वासाची भावना इतर पक्षात दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. तिचे पर्यवसान हे एका मजबूत आघाडीत झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा नेता कोण आणि कोणाला किती हिस्सेदारी या गोष्टी पुढील दोन वर्षात मोदी-शहा यांच्याविरोधात सर्वात जास्त कोण मर्दुमकी गाजवणार त्यावर ठरणार आहेत.

शरद पवार म्हणजे सध्याच्या काळातील मुरलेले राजकारणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील एकदा सुचवले होते की पवारांचे बोट पकडून आपण खूप शिकलो. त्याबाबत स्वतः पवारांनी ‘असे काही झालेले नाही’ असे काहीतरी सांगितले होते. तात्पर्य काय तर  ट्विटरच्या जमान्यात पवारांसारखे नेते फारच कमी उरले आहेत. पण गेल्या आठवडय़ात पवारांच्या दिल्लीच्या घरात गैरभाजप नेत्यांची आणि विचारवंतांची बैठक झाली. त्याने विरोधी पक्षांच्या राजकारणाविषयी नवे प्रश्नच निर्माण केले. या बैठकीला काँग्रेसकडून कोणीच उपस्थित नसल्याने तो फुसका बार ठरला नसता तरच नवल होते. काँग्रेसच्या मनीष तिवारींसारख्या दुय्यम पाच नेत्यांना या बैठकीला निमंत्रण होते खरे, पण काँग्रेसची रचनाच अशी आहे की हायकमांडला ज्या बैठकीला बोलावले नाही तिथे जाऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा नाही. हे शहाणपण सामान्य काँग्रेसीलादेखील उपजतच असते. उडत्या पाखराचे पंख मोजायला येत असल्याने ‘त’ म्हटले की ताकभात’ ओळखणे त्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. ज्या दिवशी शरदरावांकडे ही बैठक झाली त्यादिवशी सकाळीच राहुल गांधींनी कोव्हिडसंबंधी एक पत्रकार परिषद संबोधित केली होती. त्यात पवारांच्या घरच्या बैठकीला त्यांनी अनुल्लेखाने मारून त्यातील हवा काढून घेतली. ‘माझी पत्रकार परिषद ही कोव्हिडसंबंधी असल्याने इतर कोणत्याही विषयावर बोलून मी तिचे महत्त्व कमी करू शकत नाही’ असे राहुल यांनी सांगितले. आता ‘त्या’ नेत्यांनी आमची बैठक म्हणजे शेतकऱयांच्या आंदोलनासंबंधी होती असा खुलासा करून वेळ मारून नेली आहे खरी, पण ज्या पद्धतीने हे सारे झाले ते काही बरोबर झाले असे नाही. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयाने राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसचा पाणउतारा करण्याचा प्रयोग म्हणजे पवारांकडील बैठक होती. भाजप विरुद्ध विरोधकांची जंगी युती उभी करावयाची असेल तर सामूहिक नेतृत्वाची गरज आहे, ही दिली गेलेली हाक म्हणजे आता काँग्रेसची सद्दी संपली आहे आणि सोनिया व राहुल गांधींनी काळ बदलला आहे हे समजून चालावे हे सांगण्यासाठी आहे. राजकारणात ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ ची प्रॅक्टिकल पद्धत असल्याने कोणी कोणाला उगीचच नेता मानायला तयार होत नाही.  

 पुढील वर्षाच्या सुरुवातीस उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचा कशा पद्धतीने निकाल लागतो त्यावर विरोधी पक्षांचे ऐक्मय कसे आणि किती लवकर बनेल ते अवलंबून आहे. हिंदुत्वाच्या मुद्याला परत एकदा धारदार बनवण्याची कवायत भाजपने सुरू केली असली तरी उत्तर प्रदेशातील ढिसाळ राज्यकारभारामुळे भाजपच्या पायाखालील वाळू हळूहळू सरकू लागलेली आहे. योगी आदित्यनाथ विरुद्ध साक्षात मोदी असे शीतयुद्ध सुरू झाल्याने त्याचे परिणाम निवडणुकीत निश्चितच दिसून आले पाहिजेत. कोरोनाच्या महामारीने भाजपला किती नुकसान होणार आहे याचा पहिला अंदाज हा उत्तर प्रदेशात येणार आहे. आजघडीला तरी महामारी हाच उत्तर प्रदेशातील मुख्य मुद्दा आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यात पुढील वषीच्या पहिल्या तिमाहीत निवडणूक आहे तर शेवटच्या तिमाहीत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका आहेत. महामारीने मोदींची लोकप्रियता कमी झालेली असली तरी विरोधी पक्षांमधील कोणत्याही नेत्यांपेक्षा ते फारच पुढे आहेत. पण लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या लोकप्रियतेवर भाजप राज्यातील निवडणुका जिंकू शकत नाही असे त्रांगडे दिवसेंदिवस वाढत आहे. महाभारतातील युद्ध 18 दिवस चालले तसे या महामारीला त्याच्या आत पराभूत करू असे पंतप्रधानांनी म्हटले खरे, पण कोरोनाच्या दुसऱया लाटेने सरकारच्या तोंडचे पाणी पळवले. भाजप आणि मोदी सरकार खिंडीत पकडले गेले असताना विरोधी पक्ष कशी चाल खेळणार यावर पुढील गणित कसे उलगडत जाणार हे अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती खुळखुळा आला तो राहुल गांधींनी रणनीती ठीक न बांधल्याने. केरळमध्ये राहुल यांना अपशकुन करण्यासाठी भाजपने आपले सारे हिंदू मत शिताफीने डाव्या पक्षांना देऊ केले. काँग्रेसला जोपर्यंत हा डाव समजला तोवर उशीर झाला होता. जुन्या-नव्या नेत्यांची मोट बांधण्यात राहुल यशस्वी झाले तर काँग्रेसला कोणालाही डावलता येणार नाही.

 भाजपविरोधात गैरभाजपाई राज्या-राज्यात कशा रीतीने आक्रमक होतात त्यावर मोदी-विरोधी आघाडी कसा आकार घेईल हे दिसणार आहे. बिहारमध्ये स्वतःला मोदींचा हनुमान म्हणवणाऱया चिराग पासवानला भाजपच्या संगनमताने धोबीपछाड टाकणे सुरू आहे असे वाटत आहे. चिराग यांनी तेजस्वी यादव यांच्या बाजूने आपण जाऊ शकतो असा संकेत दिला आहे तो खरा ठरल्यास बिहारचे राजकारण पलटेल. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनादेखील भाजपने आपला विश्वासघात केला आहे असा ग्रह वाढत आहे. उत्तर प्रदेशात भाजपला पदभ्रष्ट करण्यासाठी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे उशिरा का होईना कामाला लागले आहेत. मायावती एक प्रकारे ‘भाजपवासी’ झाल्याने अखिलेशला स्फुरण चढले आहे.

 भाजपविरोधात अविश्वासाची भावना इतर पक्षात दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. तिचे पर्यवसान हे एका मजबूत आघाडीत झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा नेता कोण आणि कोणाला किती हिस्सेदारी या गोष्टी पुढील दोन वर्षात मोदी-शहा यांच्याविरोधात सर्वात जास्त कोण मर्दुमकी गाजवणार त्यावर ठरणार आहेत.

सुनील गाताडे

Related Stories

काँग्रेस कात टाकणार काय?

Patil_p

सायुज्यता प्राप्त झाली असता ब्रह्माशिवाय रिकामी जागाच शिल्लक राहिलेली दिसत नाही

Amit Kulkarni

पाणथळी वाचवा, निसर्ग जगवा!

Patil_p

मोदींचा वारस कोण? लढाई सुरु

Patil_p

गोटय़ाची गंमत

Patil_p

तू सुखकर्ता, तू बुद्धिदाता

Patil_p