Tarun Bharat

तिस्क पीडीए मार्केटमधील व्यापाऱयांच्या डोक्यावर टांगता धोका

वार्ताहर /उसगांव

तिस्क उसगांव येथील पीडीए मार्केटच्या छप्पराकडील स्लॅबचा काही भाग बुधवारी रात्री कोसळून त्यात एक युवक जखमी झाला. या घटनेमुळे या इमारतीमध्ये बसणारे व्यापारी व खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांना धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या लोखंडी सळय़ा गंजून स्लॅबचे तुकडे पडू लागले आहेत.

व्यापारांच्या मागणीकडे दुर्लक्ष

गेल्या साधारण 14 वर्षांपासून या मार्केट प्रकल्पातील व्यापारी ईमारतीची डागडुजी करण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. खासदार, मंत्री, आमदार, पीडीए अध्यक्ष, सदस्य सचिव या सर्वांना पत्रे, स्मरणपत्रे पाठवूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्लॅबचे तुकडे पडणे सुरुच आहे. लोखंडी सळय़ांना गंज चढला आहे. छप्परावरील पत्रे फुटल्याने पाणी दुकानात साचत आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन नवीन प्रकल्प उभारण्याची मागणी केली जात आहे.

29 वर्षांपूर्वीचा जूना प्रकल्प

राजकीयदृष्टय़ा उसगांव हा भाग पूर्वी फोंडा मतदारसंघात होता. सन् 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदारसंघ फेररचना होऊन हा भाग वाळपई मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला. खनिज व्यवसाय, औद्योगिक वसाहत यामुळे वाढत चाललेली लोकसंस्था व उसगांव भागाची शहरीकरणाकडे होणारी वाटचाल तसेच भविष्यातील गरज ओळखून या भागाचे तत्कालीन आमदार रवी नाईक यांनी मुख्यमंत्री असताना 1992 साली या मार्केट प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

पीडीएची अनास्था व दुर्लक्ष

येथील प्रकल्प व काही खुली जागा पीडीएच्या मालकीची आहे. या प्रकल्पात 36 दुकाने, 900 आसन व्यवस्था असलेले भव्य सभागृह, फळ, भाजी, मासळी विक्रेत्यासाठी जागा अशी व्यवस्था आहे. सोपो कर, हॉलमध्ये होणार लग्न समारंभ, व्यावसायिक नाटके, ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग यामुळे बऱयापैकी मिळकतही पीडीएला मिळत होती. पण अचानक 15 वर्षांपूर्वी पीडीएने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. सोपो घेणेही बंद केले. हॉल भाडेपट्टीवर देणेही बंद झाले. प्रकल्पाच्या वार्षिक दुरुस्तीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या भागात कचऱयाची समस्या निर्माण झाली व प्रकल्प डबघाईस आला. उसगांव पंचायत क्षेत्रात हा प्रकल्प येत असल्याने व एका चांगल्या प्रकल्पाची चाललेली दुरावस्था लक्षात घेऊन तो पंचायतीच्या ताब्यात द्यावा असा प्रस्ताव त्यावेळच्या उसगांव पंचायत मंडळाने मांडला होता. पण या प्रस्तावाला पीडीएने केराची टोपली दाखविली.

प्रकल्प अडकला राजकीय अहंकारात

2018 साली प्रकल्पाचा काही स्लॅब पुन्हा कोसळल्याने प्रसारमाध्यमानी त्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. निवृत्त पोलीस अधिकारी व उद्योजक तथा समाजसेवक संतोबाराव देसाई जे पीडीएचे सदस्य होते, त्यांनी येथील व्यापाऱयांची भेट घेऊन नवीन प्रकल्प बांधण्याबाबत चर्चा केली. या भागाचे आमदार विश्वजीत राणे यांनी नवीन प्रकल्पाची गरज असून त्याबाबत लवकरच पावले उचलली जातील असे सांगितले होते. पण अद्याप प्रगती मात्र काहीच झालेली नाही.

व्यापाऱयांनीच केली वर्गणी गोळा

सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही व्यापाऱयाच्या पदरी निराशाच पडली आहे. छप्परावरील पत्रे फुटल्यामुळे पाणी दुकानात पाझरत होते. गटारे तुंबत होती. सर्वत्र कचरा व दुर्गंधी पसरली होती. 2019 साली येथील व्यापाऱयांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची वर्गणी गोळा करून साफसफाई केली व दुरुस्तीचे काम केले. आता तरी आमदारांनी व सरकारने इमारत कोसळण्याची वाट न पाहता त्वरित याबाबत हालचाल करण्याची गरज आहे.

Related Stories

सांगे पालिका मंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी

Amit Kulkarni

45 वर्षांवरील प्रत्येकाने लस घ्यावी

Patil_p

नलीनी जहाज प्रकरणात गुंतलेल्या अन्य संशयीतांविरूध्द कारवाई व्हावी

Patil_p

वीज वाहिन्याशी संपर्क आल्याने सांगेत एकाचा बळी

Omkar B

मडगावातील 11 क्षयरोग रुग्ण दत्तक

Amit Kulkarni

ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

Amit Kulkarni