Tarun Bharat

तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजारपेठेत गर्दी

वाहतुक कोंडीमुळे बाजारपेठेतील रस्ते बंद

बेळगाव / प्रतिनिधी

विकेंड कर्फ्यूमुळे दोन दिवस बंद असलेल्या बाजारपेठेत सोमवारी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली. अशातच महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. कोनवाळ गल्ली, गोवावेस आदी ठिकाणी अर्ज भरण्यासाठी समर्थकांच्या गर्दीत जाणाऱया उमेदवारांमुळे रस्ते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

शुक्रवारी मोहरमची सुटी आणि शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू असल्याने बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. रक्षाबंधन सणानिमित्त काही व्यवसाय वगळता सर्व बाजारपेठ थंडावली होती. तसेच सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी बाजारपेठेत एकच गर्दी झाली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणाऱयांची गर्दी झाली होती. सर्वांचीच धावपळ सोमवारी सकाळपासून सुरू झाल्याने बाजारपेठेत  वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले.

तीन दिवसांनंतर बाजारपेठ पूर्णपणे खुली झाल्याने खरेदीसाठी येणाऱया नागरिकांची संख्या वाढली होती. एरव्ही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमिवर मोठय़ा प्रमाणात खरेदी व्यवहार होत असतात. पण मोहरम आणि विकेंडमुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना खरेदी करता आली नाही. त्यामुळे सोमवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. परिणामी बाजारपेठेतील प्रत्येक गल्लीत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध कार्यालयात गर्दी होती. त्यामुळे निवडणूक कार्यालयासमोरील रस्त्यांवर आणि कार्यालयाच्या आवारात बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पण शहरातील रहदारी कोंडीची समस्या निवारणासाठी रहदारी पोलीस उपलब्ध नव्हते. वाहतूक कोंडीमुळे व्यावसायिक आणि नागरिकांना गर्दीत अडकून पडावे लागले. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. प्रत्येक सोमवारी बाजारपेठेत अशाप्रकारे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि रहदारी पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

मैदानांना पुनरुज्जीवन देण्यासाठी हवे प्रयत्न

Patil_p

बेळगावातून क्वारंटाईन मधून 79 जणांची सुटका

Tousif Mujawar

बेंगळूरसाठी सकाळीही 30 पासून विमानफेरी

Omkar B

पिरनवाडी येथील उरुसाला अखेर जिल्हाधिकाऱयांची परवानगी

Amit Kulkarni

प्रिंटींग व्यावसायिकांना विशेष पॅकेज द्या

Patil_p

प्रभूनगरजवळ एक टन तांदूळ जप्त

Omkar B