Tarun Bharat

तीन सिलिंडर मोफत, ‘दयानंद’ रु. तीन हजार

भाजपचा संकल्पनामा जाहीर : सहा महिन्यात खाणी सुरु,कमी व्याजाने देणार गृहकर्ज

प्रतिनिधी /पणजी

वर्षाला तीन गॅस सिलिंडडर मोफत, दयानंद सुरक्षा योजनेखालील मानधन 3 हजार रुपये, तसेच सहा महिन्यात कायदेशीर मार्गाने खाणी सुरु करणार आहे. महिलांसाठी 2 टक्के तर पुरुषांसाठी चार टक्के व्याजदराने गृह कर्ज देणार अशी प्रमुख आश्वासने भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.

भाजपने 22 व्या सालात 22 कलमी संकल्पनामा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित केला. भाजपचा जाहीरनामा हा वचननामा आहे. मागील निवडणुकीत सादर केलेल्या जाहीरनाम्यातील 80 टक्के कामे पूर्ण करून त्याचा अहवाल जनतेसमोर सादर केला आहे. या वचननाम्यातील अधिकाधिक कामे पूर्ण करून जनतेला अहवाल सादर करणार असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार विनय तेंडुलकर, केंद्रीयमंत्री दर्शना जरदोष, श्रीपाद नाईक, किशन रेड्डी, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सुभाष शिरोडकर व दत्ता खोलकर व्यासपिठावर उपस्थित होते.

दिगंबर कामतनी अगोदर उत्तरे द्यावीत

राज्यात अनेक नवे पक्ष आले असून गोव्यात खाते खोलण्याच्या मोहापायी मतदारांना खोटी आश्वासने देत आहेत. काही पक्ष दुसऱया पक्षांचा टेकू घेऊन सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. विरोधी पक्षाने 2007 साली दिलेल्या जाहीरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली होती ते दिगंबर कामत यांनी सांगावे. नपेक्षा काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले त्याची यादी आमच्याजवळ आहेत असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

भाजपमुळे गेल्या दहा वर्षांत गोव्याचा विकास

गेल्या दहा वर्षापूर्वी गोव्यातील राजकारणाला अस्थिरतेची कीड लागली होती, नंतर भाजपाने दहा वर्षे गोव्याला स्थिर सरकार दिले आहे. भाजप सरकारच्या काळात गोव्याचा झपाटय़ाने विकास झाला आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले. गेल्या पन्नास वर्षात जे गोव्यात झाले नाही ते अवघ्या दहा वर्षात भाजपने करून दाखविले आहे. हे शक्य झाले कारण गेली दहा वर्षे गोव्यात भाजपाचे स्थिर सरकार होते. त्याला जोड म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार, डबल इंजिन सरकारमुळे गोव्यात खऱया अर्थाने विकास झाला आहे. गोव्याच्या विकासाला स्व. मनोहर पर्रीकर यांनी एक वेगळी दृष्टी दिली होती. उद्योग, पर्यटनाला चालना देण्याचे काम पर्रीकरांनी केले होते. तेच धोरण डॉ. प्रमोद सावंत पुढे चालवत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

आपवाल्यांनी अगोदर गोवा समजून घ्यावा  

देशातील कुठल्याही राज्यात नाही असे गोव्यात सरकारी इस्पितळ असून तिथे सर्व प्रकारचे मोफत उपचार केले जातात. गोव्याच्या  लोकांच्या रहाणीमानाला साजेसेच ते इस्पितळ आहे. काही राजकीय नेत्यांना संपूर्ण गोवाच माहीत नाही, त्यांनी अगोदर संपूर्ण गोवा पहावा समजून घ्यावा आणि नंतर गोव्याला काय द्यावे याचा विचार करावा, असेही गडकरी म्हणाले.

गोव्य़ात पेट्रोल कोणी वापरणारच नाही

काही राजकीय पक्ष पेट्रोलचे दर 80 रुपये करण्याच्या गोष्टी करीत आहेत. वास्तविक कालांतराने गोव्यात कुणी पेट्रालचा वापरच करणार नाही. गोवा प्रदुषणविरहित करण्यासाठी पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार आहे. इथेनॉल 62 रुपये असताना 80 रुपये लिटर असल्यास पेट्रोल कोण घेणार, असेही गडकरी म्हणाले. शिवाय इथेनॉलमुळे प्रदुषण हेणार नाही. आम्हाला गोवा पाणी, आवाज व हवा प्रदुषणमुक्त  करायचे आहे. येत्या काही दिवसात गोव्यातील वाहतूक इलेक्ट्रक होणार असून मिनीबस, टॅक्सी खरेदीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाईल. असेही गडकरी यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी जाहीरनामा कशा पध्दतीने तयार करण्यात आला, त्याबाबत सविस्तर माहिती दिली. 22 डिसेंबरपासून जाहीरनामा समितीसह भाजप कार्यकर्ते संकल्परथ घेऊन प्रत्येक मतदारसंघात फिरले. जनतेकडून सूचना घेतल्या. तसेच एसएमएसद्वारे 8 हजार 500 व इमेलद्वारे 10 हजार सूचना आल्या होत्या. जनेतेकडून आलेल्या सूचनांचा अभ्यास करून जनहित आणि जनकल्याण लक्षात घेऊन हा संकल्पनामा तयार करण्यात आला आहे.

सुभाष शिरोडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ कुंकळीकर यांनी केले.

भाजपचे 22 संकल्प

 • सक्षम गोमंतकीय गृहिणी
 • सर्व गोमंतकीयांसाठी घरे
 • सामान्य माणसांचे सरकार
 • सर्वंसाठी आरामदायी जीवन
 • वैशिष्टय़पूर्ण गोमंतकीय पर्यटन
 • गोव्याचे भविष्य सक्षमीकरण
 • गोवा परिपूर्ण पर्यटनस्थळ
 • गोवा बैठका, संमेलने आणि प्रदर्शनाचे आशियातील केंद्र
 • खनिज व्यवसायाचे पुनरुत्थान
 • स्वयंपूर्ण युवा
 • गोव्याचा सुवर्ण क्षण
 • गोवा आंतरराष्ट्रीय फुटबॉल डेस्टिनेशनमध्ये रुपांतरण
 • गोमंतकीय अर्थव्यवस्था 50 अब्ज डॉलरमध्ये रुपांतरण
 • काम करा समृध्द व्हा
 • एकत्र वाढू एकत्र समृद्ध होऊ
 • सर्व गोमंतकीयांसाठी आरोग्य सुविधा
 • गोमंतकीय अन्नदात्याची उत्पन्न वृद्धी
 • मत्स्योद्योगाला आधार
 • महिलांचे स्वावलंभीकरण
 • गोमंतकीय महिलांचे सक्षमीककरण
 • हरित गोव्यासाठी स्वच्छ वाहतूक

Related Stories

इंज्युरी वेळेतील राहुलच्या गोलने ब्लास्टर्सची बेंगलोरवर मात

Amit Kulkarni

दुधसागरच्या विलोभनीय सौंदर्यांची विद्यार्थ्यांना भुरळ

Patil_p

काँग्रेसच्या 26 कार्यकर्त्यांना अटक-जामिनावर सुटका

Omkar B

मोरजी, मांद्रे किनारी भागातील कर्णकश आवाजाने नागरिक त्रस्त

Patil_p

सरकारने खाणी चालवल्यास कोणाचाच विरोध नसेल

Patil_p

वरिष्ठ अधिकाऱयांच्या बदल्या

Patil_p