Tarun Bharat

तुम्ही लगेच थांबू नका

Advertisements

आचार्य अत्र्यांच्या आत्मकथनात एका विक्षिप्त शिक्षकांचा उल्लेख आहे. एखाद्या विद्यार्थ्यावर रागावले की ते त्याच्या आईचा उल्लेख असलेला शब्दप्रयोग वापरीत. मात्र प्रत्यक्ष शिवी देत नसत. मुले बिचारी ऐकून घेत. एकदा एका मुलाने ही गोष्ट घरी सांगितली. त्याचे वडील सरकारी अधिकारी होते. ते तावातावाने शाळेत आले. शिक्षकांचा वर्ग चालू असताना त्यात शिरून मुलांना म्हणाले, “मुलांनो सगळेजण उभे रहा आणि हे गुरुजी तुम्हाला आईवरून जे बोलतात ते एका सुरात म्हणा.’’ मुलांनी तसे केल्यावर शिक्षक रडवेले झाले. त्यांनी त्या पालकांची माफी मागितली. यानंतर त्यांनी मुलांना उद्देशून तो शब्दप्रयोग वापरणेच काय, साधे रागावणे देखील सोडून दिले. तेव्हा मुलांनाच वाईट वाटले. एके दिवशी सगळय़ा मुलांनी शिक्षकांना विनंती केली, “गुरुजी, तुम्ही आम्हाला रागवायला सुरुवात करा. हवं तर कितीही शिव्या द्या. आम्ही आमच्या घरी जाऊन काही सांगणार नाही.’’

हा प्रसंग आठवण्याचे कारण मजेदार आहे. कोरोनाचा कहर अद्याप कमी झाला नसला तरी लॉकडाऊन शिथिल झाला आहे. जरूरीच्या कामासाठी बाहेर पडायचे झाले तर रिक्षानेच जातो-येतो. पण रिक्षाने प्रवास करण्यात पूर्वीचा थरार राहिला नाही. हल्ली रिक्षाला हात केला की रिक्षाचालक लगेच थांबतात. “कुठे जायचं?’’ हा प्रश्न विचारत नाहीत. आपण रिक्षात बसल्यावर विचारतात. आपण इच्छित स्थळ सांगितलं की लगेच मीटर टाकतात आणि रिक्षा चालू करतात. इच्छित स्थळ आल्यावर मीटरप्रमाणे पैसे घेतात. सुट्टय़ा पैशांकरिता अडवत नाहीत. काळजात अगदी गलबलून येते.

अत्र्यांच्या कथनातल्या मुलांप्रमाणे तमाम रिक्षाचालकांना ओरडून सांगावंसं वाटतं, “अहो दादा, आम्ही हात केल्यावर तुम्ही लगेच थांबू नका. डाव्या हाताने नाही-नाहीची खूण करून सुसाट निघून जा. चुकून थांबलात तरी आम्हाला कुठं जायचंय ते खेकसून विचारा. भाडं नाकारा. पाऊस पडत असताना मीटरपेक्षा जास्त पैसे हक्कानं मागा. लांबचं भाडं असेल तर भर दिवसादेखील हाफ रिटर्न घ्या. भर चौकात किंवा स्टॅन्डवर गाडी उभी करून वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवा. अशा वेळी गिऱहाईक आलं तर त्याला तुच्छतेनं हाकून लावा. आम्ही नाही तुमच्याबद्दल तक्रार करणार.’’

खरं सांगू, रिक्षावाले दादा? तुम्ही असं वागायला सुरुवात कराल त्या दिवशी आम्ही समजू, की परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.

विजय तरवडे

Related Stories

अर्थमंत्री ते पंतप्रधान…

Patil_p

निश्चयपूर्वक वर्तन एक कौशल्य

Patil_p

युक्रेन युद्ध आणि आफ्रिकन देश

Patil_p

विसावा गुरु कुमारी भाग 2

Patil_p

निर्विकल्प समाधी

Patil_p

आता कोणाचेच लाड नकोत!

Patil_p
error: Content is protected !!