Tarun Bharat

तुरमुरीतील ‘त्या’ पाण्याचा निचरा न केल्यास रास्तारोको

कॉर्पोरेशन बँकेसमोरील रस्त्यावर तीन फूट पाणी साचत असल्याने अनेक अपघात

वार्ताहर /उचगाव

तुरमुरी येथील कॉर्पोरेशन बँकेसमोर रस्त्यावर तीन फूट पाणी साचल्याने प्रवाशांबरोबर स्थानिक नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. या पाण्याचा प्रवासी वर्गाला अंदाज येत नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अशा घटना गेल्या दोन-चार दिवसांमध्ये घडल्या आहेत.

 पावसाला पुन्हा सुरू होण्यापूर्वी या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

गेल्या आठवडय़ाभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तुरमुरी गावाच्या पश्चिमेकडील असलेल्या डोंगराळ भागातून येणारा पाण्याचा लोंढा बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरून वाहत असतो. सदर पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी असलेले सर्व मार्ग बंद पडल्याने सदर पाणी कॉर्पोरेशन बँकेच्यासमोर साचत असते. त्यामुळे त्या ठिकाणी तलावाचे स्वरुप येते.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर सातत्याने मोठी रहदारी असते. मात्र या ठिकाणी पाणी साचत असल्याने दुचाकी वाहनांना या पाण्याचा अंदाज येत नाही. या पाण्यात वाहने घातल्यानंतर बंद पडणे, खड्डय़ात जाणे असे प्रकार घडत आहेत. कधी कधी या खड्डय़ांमुळे अपघातही होत आहेत. रस्त्यालगत असलेल्या तलावांमध्ये सदर पाणी जात होते. मात्र नागरिकांनी सदर पाण्याचा मार्ग बंद केल्याने पाणी तेथेचे थांबून तलावाचे स्वरुप प्राप्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील अनेक प्रवाशांतून तसेच तुरमुरी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

या संदर्भात अनेकवेळा वृत्तपत्रांमधून आवाज उठवला. ग्राम पंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारी, निवेदन देऊन देखील याकडे कानाडोळा केल्याने या भागातील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

Omkar B

कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर शेतकऱयांचा धडक मोर्चा

Amit Kulkarni

बेळगावमध्ये पहिल्यांदाच आज येणार एअर बस

Amit Kulkarni

किणये येथे उद्या श्री शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना

Patil_p

भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचे थाटात उद्घाटन

Omkar B

मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni