रशियन एस-400 यंत्रणेच्या रडारद्वारे एफ-16 चा शोध : दोन्ही देशांमधील तणाव वाढणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
तुर्कस्तान आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या तणावात रशियाच्या संबंधाची भर पडली आहे. तुर्कस्तानच्या सैन्याने एस-400 सुरक्षा यंत्रणेला सक्रीय केले आहे. तुर्कस्तानचे सैन्य या रशियन सुरक्षा यंत्रणेच्या रडारचा वापर एफ-16 लढाऊ विमानांचा थांगपत्ता लावण्यासाठी करत आहे. याच मुद्दय़ावरून अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी तुर्कस्तानच्या विरोधात निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.
डेमोक्रेटिक सिनेटर क्रिस वान होलेन आणि रिपब्लिकन सिनेटर जेम्स मॅनकफोर्ड यांनी विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. तुर्कस्तान रशियाकडून खरेदी करण्यात आलेल्या एस-400 यंत्रणेच्या रडारद्वारे नाटोच्या यूनुमिया सैन्यसरावात सामील फ्रान्स, इटली, ग्रीस आणि सायप्रसच्या एफ-16 लढाऊ विमानांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे. याचमुळे कायद्यानुसार तुर्कस्तानवर निर्बंध लादले जाऊ शकतात असे या दोन्ही खासदारांनी म्हटले आहे.
तुर्कस्तानकडेही अमेरिकन विमान
तुर्कस्तानकडेही अमेरिकेकडून खरेदी करण्यात आलेले एफ-16 लढाऊ विमान आहे. सद्यकाळात तुर्कस्तान आणि अमेरिका यांचे संबंध सुरळीत नाहीत. तुर्कस्तान रशियन यंत्रणेचा वापर अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या विरोधात करत आहे. अमेरिकेने यापूर्वीच तुर्कस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे तुर्कस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
एस-400 तैनात
काळय़ा समुद्रानजीकच्या सॅमसन प्रांतात एस-400 यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. परंतु तुर्कस्तानच्या अधिकाऱयांनी अमेरिकेच्या आक्षेपांबद्दल माहिती देण्यास नकार दिला आहे. आगामी काळात दोन्ही देशांमधील तणा वाढणार असल्याचे मानले जात आहे.