Tarun Bharat

तुर्कस्तानवर बहिष्काराची सौदी अरेबियाची घोषणा

अध्यक्ष एर्दोगानच्या विधानामुळे संतप्त

वृत्तसंस्था/ रियाध

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेचेपे तैय्यप एर्दोगान यांच्या एका विधानामुळे सौदी अरेबियाचा संताप अनावर झाला आहे. सौदी अरेबियाने तुर्कस्तानवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. आखातातील काही देश तुर्कस्तानला लक्ष्य करत असून अस्थैर्य निर्माण करणारी धोरणे राबवत असल्याचे एर्दोगान यांनी संसदेत बोलताना म्हटले होते.

जे देश आज संशयाच्या भोवऱयात आहेत, ते यापूर्वी अस्तित्वातच नव्हते आणि बहुधा भविष्यात अस्तित्वात नसतील हे विसरू नये असे एर्दोगान यांनी म्हटले होते. एर्दोगान यांचे हे विधान थेटपणे सौदी अरेबियाशी जोडून पाहण्यात आले. सौदी अरेबिया हा देश 1932 मध्ये अस्तित्वात आला होता. तुर्कस्तान आणि सौदी अरेबियाकडून होत असलेली विधाने पाहता दोन्ही देशांचे संबंध बिघडण्याची दाट चिन्हे आहेत. तुर्कस्तानच्या अध्यक्षांच्या या विधानानंतर सौदी अरेबियाच्या चेम्बर ऑफ कॉमर्सच्या प्रमुखाने तुर्कस्तानच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

एर्दोगान यांनी अलिकडेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरही सौदी आणि त्याच्या शेजारी देशांवर निशाणा साधला होता. एर्दोगानच्या विधानाने संतप्त सौदी अरेबियाने स्वतःच्या नागरिकांना तुर्कस्तानच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. सौदीने जुलै महिन्यात तुर्कस्तानमधून 18.5 कोटी डॉलर्सची आयात केली होती.

आमच्या नेतृत्वाच्या विरोधात तुर्कस्तानच्या सरकारच्या निरंतर शत्रुत्वाच्या प्रत्युत्तरादाखल त्याच्या प्रत्येक उत्पादनावर बहिष्कार टाकणे ही सौदीतील व्यापारी आणि ग्राहकांची जबाबदारी असल्याचे चेम्बर ऑफ कॉमर्सचे प्रमुख अजलान यांनी म्हटले आहे.

जमाल खशोगी हत्याकांडाची पार्श्वभूमी

2018 मध्ये इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येपासूनच दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण झाले होते. खशोगी यांची हत्या करण्याचा आदेश सौदी सरकारच्या सर्वोच स्तरावरून प्राप्त झाला होता, असे एर्दोगान यांनी म्हटले होते. परंतु त्यांनी कधीच युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा थेट उल्लेख केला नव्हता.

Related Stories

सुशीलकुमार मोदींना राज्यसभेची ‘लॉटरी’

Patil_p

देशात 15 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन?

datta jadhav

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैसे वाढ

Patil_p

मेरठमध्ये नव्या स्ट्रेनचे आणखी 4 रुग्ण

datta jadhav

कूपनलिकेमध्ये कोसळलेल्या मुलाला वाचविण्यास यश

Patil_p

लडाख सीमेवरून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे हटले

datta jadhav
error: Content is protected !!