प्रतिनिधी / उस्मानाबाद
अनेकांची श्रध्दास्थाने, स्फुर्तीस्थाने असलेली धार्मिक स्थळे मार्च महिन्यापासून बंद आहेत. अनलॉकच्या विविध टप्प्यामध्ये दुकाने, व्यवसाय, मॉल्स, प्रवास, कार्यालये, औद्योगिक संस्था चालू करण्यात आल्या. इतकेच काय तर दारुची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरन्टस् देखील चालू करण्यात आली आहेत. परंतु दुर्दैवाने धार्मिकस्थळे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी विविध आंदोलने देखील करण्यात आली. इतर राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली असून महाराष्ट्र सरकार मात्र आकसबुध्दीने वागत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने महाराष्ट्राचे महामाहिम राज्यपाल महोदयांना भेटून अध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे खुली करण्याची मागणी केली होती. दि. 1 नोहेंबर 2020 पर्यंत धार्मिकस्थळे खुली न केल्यास राज्यबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
या अनुषंगाने तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर दिनांक 5 नोव्हंबर 2020 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय अध्यात्मिक समन्वय आघाडीने घेतला आहे. जोपर्यंत सरकार मंदिर उघडण्याची सरकार करत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे. आई तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, साईबाबा मंदिर शिर्डी, विट्ठल-रुक्मीनी मंदिर पंढरपूर यासारख्या अनेक देवस्थानाशी निगडित तेथील अर्थव्यवस्था आहेत. अनेक कुटुंबाच्या उपजिवीका यावर अवलंबून आहेत.
राज्य सरकार फक्त स्वत:च्या उत्पन्नाचा विचार करत आहे. ज्या ठिकाणाहून शासनाला महसूल मिळतो त्या सर्व आस्थापना चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बस, रेल्वे, विमान या सेवांना परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी जवळबसून अनेक तासांचा एकत्रित प्रवास सरकारला चालतो मात्र शिस्तप्रिय भाविकांना मास्क, स्ॉनिटायझर, सोशल डिस्टन्सींगचे कठोर पालन करुन दर्शनास/धार्मिक विधीस परवानगी देण्यात येत नाही. हा मोठा अन्याय आहे.
त्यामुळे या अन्यायाविरोधात जनसामान्याचा आक्रोश वाढला असून त्याचा वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साधुसंत, धर्माचार्य या आंदोलनास सहभागी होणार आहेत.
आई तुळजाभवानीचे मंदिर हे तुळजापूर वासीयांसह समस्त देशवासियांच्या श्रध्देचा विषय आहे. अनेक भाविकांचे श्रध्दास्थान, प्रेरणास्थान, स्फुर्तीस्थान, सकारात्मक उर्जेचे स्त्रोत असलेली मंदीरे उघडावीत या मागणीसाठी अनेक लोकप्रतिनीधीनीही या आंदोलनास पाठिंबा दिला असून तसा संपर्क ही त्यंानी केला आहे. या आंदोलनामध्ये सर्व धार्मिक, आध्यात्मिक संघटना, स्थानिक व्यावसायिक तसेच सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधीनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.


previous post