Tarun Bharat

तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व

चतुर्मासाच्या शेवटच्या कार्तिक महिन्यातील उत्थान एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. पण या दिवसाचे महत्त्वच काही लोकांना माहिती नाही, विशेषतः तरुण पिढीला. म्हणून काही वाचकांनी या दिवसाचे महत्त्व जाणण्यासाठी माहिती देणारा लेख लिहावा अशी विनंती केली. गेल्या आठवडय़ात हा सण साजरा केला गेला. याच दिवशी तुळशीचा विवाह शालिग्राम रूपातील विष्णूशी झाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तुळशी ही नित्य भगवान विष्णूच्या चरणाशी स्थित असते आणि तुळशीशिवाय कोणताही नैवेद्य विष्णू स्वीकारत नाहीत. म्हणून तुळशीला वैदिक संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन बांधले होते. आज अपार्टमेंटच्या जमान्यात ही संस्कृती लुप्त होत चालली आहे व तुळस फक्त एक औषधी झाड म्हणून जोपासली जाते फारतर कार्तिक महिन्यात दररोज तुळशीसमोर दिवा लावला जातो या पलीकडे जास्त महत्त्व दिले जात नाही.

तुळशी ही भगवंताच्या चरणाशी स्थित असते म्हणून वैष्णवांना अतिशय प्रिय आहे. गौतमीय तंत्रमध्ये म्हटले आहे तुळशी दल मात्रेनं जलस्य चुळूकेन वा । विकृणिते स्वम आत्मानं भक्तेभ्यो भक्त वत्सला ।।  अर्थात जे भक्त भक्तिभावाने भगवान कृष्णाला तुळशीचे एक पान आणि ओंजळभर पाणी अर्पण करतात त्यांना भगवंत  स्वतःला विकून टाकतात. तुळशीचे आणखी एक नाव आहे वृन्दा आणि ती आध्यात्मिक जगतामध्ये कृष्णाच्या अनेक लीलांचे आयोजन करते म्हणून त्या धामाचे नाव वृंदावन आहे. पद्मपुराण व इतर अनेक शास्त्रामध्ये तुळशीची महती वर्णन केली आहे. थोडक्मयात त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

1. तुळशी ही सर्व भक्तिमय कार्याचे सार आहे. 2. तुळसीदले, मंजिऱया, तिचे मूळ, खोड, फांद्या आणि तिची सावलीही पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची आहे. 3. जो कोणी तुळशी का÷ाचा लेप भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला लावेल तो शाश्वतरित्या भगवान श्रीकृष्णाच्या निकट निवास करेल. 4. तुळशी उगवलेल्या जागेवरील माती आपल्या माथ्यावर धारण करून जो कोणी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची आराधना करेल, त्याला दररोज शंभर दिवस आराधना केल्याचे फळ मिळेल. 5. जो कोणी श्रीकृष्णाला तुळशी मंजिरी अर्पण करतो, त्याला सर्व प्रकारची फुले अर्पण करण्याचा लाभ मिळतो आणि तो भगवंताच्या शाश्वत धामात प्रवेश करतो. 6. तुळशीचे झाड असलेल्या घराजवळ किंवा बागेजवळ एखादा तिचे दर्शन घेईल किंवा नुसते जवळून गेला तरी त्याच्या सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळेल. 7. तुळशी असलेल्या घरात, शहरात किंवा वनात श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्नतेने निवास करतात. 8. तुळशी असलेले घर कधीच आपत्तीग्रस्त होत नाही आणि ते तीर्थस्थळाहूनही अधिक पवित्र बनते. 9. तुळशीचा सुगंध घेणारा त्वरित शुद्ध बनतो. 10. तुळशी उगवलेल्या मातीजवळ श्रीकृष्ण तसेच सर्व देवदेवता निवास करतात. 11. तुळसीदलाशिवाय श्रीकृष्ण फुले, स्वादिष्ट पदार्थाचा नैवेद्य, चंदन लेप, या सर्व पदार्थांचा स्वीकार करीत नाहीत. 12. दररोज तुळसीदलानी श्रीकृष्णाची आराधना करणाऱया भक्तास सर्व प्रकारच्या यज्ञ, दान, तप इत्यादींचे फळ प्राप्त होते. वास्तविक त्याला कोणत्याही इतर धार्मिक क्रिया करण्याची आवश्यकता नसते, कारण त्याने सर्व शास्त्रांचे सार तुळशी सेवा आहे हे जाणलेले असते. 13. भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेल्या तुळशीचा जो कोणी भक्तिभावाने स्वीकार करतो अथवा आपल्या मस्तकावर धारण करतो, त्याला भगवान श्रीकृष्णाचे शाश्वत धाम प्राप्त होते. 14. कलियुगात जो कोणी तुळशीची आराधना करतो, तिचे स्मरण करतो, तिच्या रोपाची लागवड करतो, तिची निगराणी राखतो आणि तिच्यासमोर कीर्तन करतो, जप करतो तो सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होऊन त्याला भगवान श्रीकृष्णाचे पवित्र धाम प्राप्त होते. 15. जो कोणी तुळशीदलासह भगवान श्रीकृष्णाची आराधना करतो, तो आपल्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतो. 16. जो कोण तुळशीच्या महतीचे स्मरण करतो, त्याचे इतरांना वर्णन करतो, त्याला पुन्हा या भौतिक जगात जन्म घ्यावा लागत नाही.   ‘शिवोपाख्यान’ मध्ये शिवजी वर्णन करतात ‘सर्व प्रकारची फुले आणि पानांपेक्षा तुळशी श्रे÷ आहे. ती परम मंगलदायी समस्त कामनांना पूर्ण करणारी, शुद्ध, श्री विष्णूंना अत्यंत प्रिय तसेच वैष्णवी नाम धारण करणारी आहे. ती संपूर्ण लोकात श्रे÷, शुभ, तथा भोग आणि मोक्ष प्रदान करणारी आहे. प्राचीन काळी भगवान श्रीविष्णुंनी लोकांच्या हितासाठी तुळशी रोप लावले होते. तुळशीची पाने आणि फुले सर्व धर्मात प्रति÷ित आहेत. भगवान श्रीविष्णुंना लक्ष्मी आणि मी (महादेव) दोघेही ज्या प्रकारे प्रिय आहोत, त्याचप्रकारे तुळशीदेवीसुद्धा परम प्रिय आहे. आम्हा तिघांपेक्षा अन्य चौथा कोणी असा नाही की भगवंताला इतका प्रिय आहे. ज्या प्रमाणे पुण्यमयी गंगा मुक्ती प्रदान करणारी आहे, त्याचप्रमाणे तुळशीसुद्धा कृपा प्रदान करणारी आहे. जर मंजिरीयुक्त तुळशीपत्रानी भगवान श्रीविष्णूची पूजा केली तर त्यांच्या पुण्यफळाचे वर्णन करणे असंभव आहे. जेथे तुळशीचे वन आहे तेथे श्रीकृष्णाचा सहवास आहे तथा ब्रह्मा आणि लक्ष्मी जी संपूर्ण देवतांसमवेत विराजमान आहेत. म्हणून आपल्या निकटवर्ती स्थानात तुळशीचे रोप लावून तिची पूजा केली पाहिजे.’  तुळशी ही जरी नित्य भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आध्यात्मिक जगतामध्ये निवास करीत असली तरी विष्णुभक्तावर कृपा प्रदान करण्यासाठी आपल्यासमोर वृक्ष रूपामध्ये उपस्थित आहे म्हणून तिला साधारण वृक्ष समजू नये. तुळशी ही आपल्याला भगवंताच्या चरणाचा आश्रय कसा घ्यावा हे शिकवते. म्हणून याच सेवाभावनेने वैष्णव आपल्या गळय़ामध्ये तुळशीमाला धारण करतात. तुळशी माळ धारण करणे याचा अर्थ आहे आपले जीवन भगवंताला समर्पित करणे. याच समर्पित भावनेचे प्रतीक म्हणून भक्त भगवंताला तुळशीचे हार अर्पण करतात. तिची तुलना कशाशीही होऊ शकत नाही म्हणून तिचे नाव तुळशी आहे.

संत तुकाराम महाराजांनासुद्धा तुळशीहार गळय़ामध्ये परिधान केलेल्या विठ्ठलाचे सुंदर रूप निरंतर पाहत राहावे असे वाटते तुळसीहार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ।। आणखी एका अभंगात ते म्हणतात कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी  हरी ।। अर्थात हे हरी! कमरेवर हात आहेत व गळय़ात तुळशी माळा आहेत असे रूप मला दाखवा. तुकाराम महाराज स्वतःही गळय़ामध्ये तुळशी माळा धारण करायचे. तुळशी माळा गळय़ामध्ये धारण करणे याचा अर्थ पवित्र व पापरहित जीवन भगवंताचा सेवक म्हणून जगणे. असे जीवन जगण्यासाठी तुकाराम महाराजांनी त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा प्रेरणा दिली होती. एका अभंगरूपात लिहिलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।। तुमचे येर वित्त धन ।। ते मज मृत्तिकेसमान ।। कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ।। म्हणावा विठोबाचे दास । तुका म्हणे मज हे आस ।। अर्थात जर तुम्ही विठ्ठल विठ्ठल नाम घ्याल तर आम्ही सुखी होऊ. बाकीची तुमची धनसंपत्ती मला मातीमोल वाटते. तुम्ही गळय़ात तुळशी माळा घाला आणि एकादशी व्रताचे पालन करा. तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणवून घ्याल याची मला आशा आहे. हा उपदेश केवळ छत्रपती शिवाजीराजांसाठीच नाही तर आपणा सर्वासाठीच आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर तुळशी रोप लावावे व नियमित सेवा करत पवित्र व शांतीपूर्ण जीवन जगावे. 

वृंदावनदास

Related Stories

वाढीव शुल्काचे शुक्लकाष्ठ

Patil_p

‘कला अकादमी’ वास्तुची शान जपा!

Patil_p

अफगाणिस्तानः उध्वस्त शिक्षण व्यवस्थेचा काहूर

Patil_p

परमवीरना चपराक!

Patil_p

ऐसें तव गुणकथामृत

Patil_p

विचारांचा गुंता सोडविताना…

Patil_p