Tarun Bharat

तृणमूलला मडगावातील उमेदवार महेश आमोणकर यांची सोडचिठ्ठी

पक्षाने शेवटच्या क्षणी वाऱयावर सोडल्याची टीका

प्रतिनिधी /मडगाव

विधानसभा निवडणुकीत सपशेल सफाया झालेल्या तृणमूल काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून पक्षाचे मडगावातील उमेदवार महेश आमोणकर यांनी पक्षाने शेवटच्या क्षणी कोणत्याही प्रकारचे नैतिक सहकार्य न करता आपणास वाऱयावर सोडले अशी टीका करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती देताना यासंदर्भात आपण ई-मेलवर पत्र पाठविले असल्याचे सांगितले. आपल्या बँक खात्यावर 25 लाख रु. पक्षाने जमा केले होते. त्यानंतर एकही पैसा आपणास दिला नाही. मतदानाला दोन दिवस असताना आपणास नैतिक पाठिंबा देण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते हजर नव्हते, असा दावा त्यांनी केला.

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी व्हिटामिन-एमचा मोठय़ा प्रमाणात वापर केला. त्यामुळे आपल्या मतांवर परिणाम झाला. काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांनी याचा फायदा घेताना आपण त्यांच्याशी सेटिंग केल्याचा अपप्रचार करून आपले नाव घाण केले व आपली मते स्वतःच्या पारडय़ात पाडून घेतली, असा दावाही आमोणकर यांनी केला. कामत यांनी अपप्रचार करून आपल्या पारडय़ात मते पाडून घेतली असली, तरी देवाने त्यांना माफ केले नाही व त्यांचे मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न भंग झाले. कामत हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहतच राहिले, असा टोला त्यांनी हाणला.

आपल्या कार्यकर्त्यांना विचारूनच आपण राजकीय कारकिर्दीविषयी पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी भाजपात प्रवेश करणार काय या प्रश्नावर बोलताना सांगितले. आपण नगरसेवक म्हणून कब्रस्तानच्या विषयावर उपोषण केले होते. सोनसडा येथील कब्रस्तानसाठीच्या जागेचा झोन बदलण्याची आपली मागणी कायम आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी आपणास भ्रमणध्वनीवरून आश्वासन दिल्यानंतर आपण ते उपोषण मागे घेतले होते. ते आश्वासन पूर्ण करून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

Related Stories

..अन् लईराई देवीने पूर्ण केला आपला पण

Omkar B

‘योद्धा संन्यासी विवेकानंद’ पुस्तक प्रत्येकाने वाचावे

Amit Kulkarni

काणकोणात 4 नवीन पॉझिटिव्ह

Omkar B

कांदोळकर यांचा राजीनामा धक्कादायक – सरदेसाई

Patil_p

तब्बल 25 वर्षांनंतर शेतात पिकले सोने

Patil_p

‘नागेश फडते’सारख्या निस्वार्थी कार्यकर्त्यांमुळेच संस्था मोठ्या होतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!