Tarun Bharat

तृणमूल काँगेसमध्ये उफाळला संघर्ष

ममता बॅनर्जींनी स्वतःचे पद वगळून सर्व पदे केली रद्द, भाचा अभिषेक बॅनर्जीलाही फटका

कोलकाता / वृत्तसंस्था

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकलेल्या तृणमूल काँगेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि त्यांचा राजकीय वारसदार मानला जाणारा त्यांचाच भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्यातील सुप्त संघर्ष आता चव्हाटय़ावर आला आहे. हा संघर्ष प्रशांत किशोर या राजकीय सल्लागारावरुन निर्माण झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षावरील आपला प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी स्वतःचे सोडून इतर सर्व पदे रद्द केली आहेत. आपला भाचा आणि राजकीय वारसदार अभिषेक बॅनर्जी यांचे महासचिवपदही त्यांनी काढून घेतले आहे. त्यामुळे भविष्यकाळात हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

प्रशांत किशोर कारण

तृणमूल काँगेसला विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोलाचे साहाय्य केलेले प्रशांत किशोर यांच्याशी पक्षाचे संबंध कसे असावेत यावरुन ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे सांगितले जाते. किशोर यांना अधिक महत्व देऊ नये, असे पक्षातील जुन्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर अभिषेक बॅनर्जी किशोर यांचे खंदे समर्थक आहेत. पक्षातील या नवे विरुद्ध जुने या वादामुळे ममता बॅनर्जी यांची कोंडी झाली असून त्या जुन्यांच्या बाजूच्या आहेत, असेही बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातही वाद आहे.

पक्षशिस्तीचा बडगा

पक्षातील अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या रचनेत अमूलाग्र परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी सर्व पदे तत्काळ रद्द करुन टाकली आहेत. केवळ त्यांनी स्वतःचे पद कायम ठेवले आहे. अभिषेक बॅनर्जी हे महासचिव आहेत. त्यांचेही पद रद्द झाले आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षात ‘ एक व्यक्ती, एक पद’ हा नियम असावा असा आग्रह धरला आहे. त्याला युवा नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र जुने नेते यासाठी तयार नाहीत.

मुकुल रॉयही कारणीभूत

निवडणुकीनंतर भाजपमधून तृणमूलमध्ये गेलेले नेते मुकुल रॉय यांच्या पक्षातील स्थानावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. त्यांना जवळ करु नये असे एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट त्यांचा समर्थक आहे. त्यामुळे आता या दोन गटांमध्येही एक सुप्त संघर्ष होत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

एसएमएस युद्ध

अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आता एसएमएस युद्ध सुरु झाल्याची माहिती आनंद बझार पत्रिका या वृत्तपत्राने दिली आहे. अभिषेक बॅनर्ची यांनी ममता बॅनर्जींना संदेश पाठवून आपण पश्चिम बंगाल, मेघालय आणि ओडिशा राज्यात पक्षासाठी काम करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यावर ममता बॅनर्जी यांनी ‘धन्यवाद’ असे प्रत्युत्तर दिल्याचे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे.

Related Stories

जम्मू काश्मीर : कोरोना रुग्णांनी ओलांडला 92 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

“ऑक्सिजनच्या संकटामुळे ७ दिवस झोपू शकलो नाही”

Archana Banage

..तर कोणत्याही क्षणी जलआंदोलन!

Patil_p

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदाराचा दावा धक्कादायक”

Archana Banage

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 10 हजार 630 वर

Tousif Mujawar

इंडिया पेस्टिसाइडचा येणार 23 ला आयपीओ

Patil_p